Sunday, September 15, 2013

पान ३८. हठयोग


प्रिय नैना,

आशिकी - २ पाहिला आणि सहजच नायिकेच्या ऐवजी रोहिणी ला पाहायला लागलो.  सिनेमातले अतूट प्रेम पाहिले ना की आपणही असेच अतूट प्रेम करावे असे मनातून वाटते.  एक निरिक्षण आहे ते म्हणजे सिनेमातल्या सगळ्या दृष्यांमधे अगदी सकाळी झोपून ऊठण्याच्या सीन मधे सुद्धा नायक आणि नायिका पूर्ण मेकप मधे वावरताना दिसतात.  मला वाटायचे की ह्या असे खऱ्या आयुष्यात नसते म्हणून ते खोटे आहे.  पण आज आशिकी पाहता पाहता एक महत्वाची गोष्ट जाणवली की ते नायक नायिका सतत मेकप मधे आणि सुंदर दाखवल्या जातात यामागे सिनेमा चे व्यावसायिकरण हेच एक कारण नसून अजूनही एक कारण असावे.  प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या नजरेत स्वतःच्या मनात स्वतःच्या आरश्यात जगातील सगळ्यात सुंदर व्यक्तीच असते नाही का?  मग ते नायक नायिकेचे सतत, अगदी झोपेतुन उठतानाही सुंचर मेकप मधे दिसणे हे त्यांच्या मनातली त्यांची छवी दाखवणारे सूचक दृष्य असणार की. 

आजकाल रोहिणीच्या विचारांमुळे स्वतःला आरशात पाहताना उगाचच छान वाटतं.  माझ्या कहाणीतला नायक म्हणजे मी स्मार्ट आणि देखणा आहेच की.  स्वतःच केलेल्या या युक्तिवादावर मी आज जाम खूश आहे. खूश होण्याचे अजून एक कारण पण आहे, माहिताय आज मी हठयोग करून दाखवलाच शेवटी.

गोविंदाग्रजांच्या 'वाग्वैजयंती' पुस्तकातून 'प्रेम आणि मरण' ही तुफान कविता वाचताना नेहमी वाटायचे की या कवितेची शैली किती झकास आहे.  कसे ना कुणीच ती शैली वापरल्याचे इतक्यात वाचायला मिळत नाही.  इतकेच काय त्या शैली ला कोणत्या छंदात घालायचे त्याचाही पत्ता लागत नाही.  माधव ज्यूलियन यांनी त्यांच्या पद्यप्रकाश पुस्तकात ज्या छंदाला नाव नाही त्याला त्या छंदात लिहिल्या गेलेल्या लोकप्रिय कवितेच्या ओळीतूनच एक शब्द धेऊन नावे दिली आहेत.  आज मी पण 'प्रेम आणि मरण' या कवितेला ज्या छंदात लिहिले आहे त्याला आपणच एक नाव दिलेय, आणि ते म्हणजे हठयोग.  त्या कवितेत ती ओळ आहे ना 'हा भोग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग, लागला ज्याला, मरावे लागते त्याला, हे असे' त्यातून हठयोग हा शब्द निवडला झाले.  या शैलीत काही लिहिणे म्हणजे हठयोगच होता की गं.  पण खूश मी यासाठी आहे की मी हा हठयोग केला आणि तो आता ऐक.

नवी सुरवात
(छंद: हठयोग)

बदलूनच गेली दुनिया
ही तिची असावी किमया, वाटते
जगण्यास मिळाला अर्थ
जगणे जणु होते व्यर्थ, कालचे
आयुष्य तिच्यातच बघणे
जणु तिच्यास साठी जगणे, यापुढे
स्वप्नात, तिच्या हातात, देऊनी हात
फिरावे आणी, बागेतुन गावी गाणी, भाबडी

तिजला सांगावे म्हणुनी
रियाज कितीदा करूनी, पाहिले
समोर जेव्हा ती आली,
अमुची वाचाच पळाली, बोंबला
पण अजून हरलो नाही
आयुष्य संपले नाही, जाणवे
होईल, ती ही होईल, फिदा देईल
प्रीतीची हात, होईल नवी सुरवात, जोडिने

~ रोहित

(हठयोगी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२९ आगस्ट २०१३, २२:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment