Sunday, September 15, 2013

पान १९. चकोर


प्रिय नैना,

भावना आणि तंत्र माहित असणे सोपे पण कल्पकतेने, उत्कटतेने ते व्यक्त करता येणे फारच कठीण दिसतेय.  आज प्राजक्त देशमुख यांची एक छोटीशी कविता वाचली आणि अंतर्मुख झालो.

कुसुमाग्रजांच्या ते लिहितात:
"कविता एक एक वाचत गेलो
आशिर्वादासम भास होत गेले..
तात्याराव तुमच्या ‘विशाखेला’तेव्हापासुन चरण म्हणायला लागलो ॥" - प्राजक्त देशमुख

काय सुंदर कल्पना आणि त्याच्याच अनुषंगाने काय उत्कट भावना आहे.  या उंचीवर पोहोचायला किती जन्म घ्यावे लागतील कोण जाणे.  मला इतकेच समाधान आहे की कवितेच्या प्रवासात खूप मोठे मोठे यात्री होउन गेले आणि समोर दिसताहेत त्या वाटांवर मला चालायची संधी मिळतेय.  या प्रवासात किती उंची गाठता येइल हे काळच सांगेल पण या प्रवासातले टप्पे गाठण्यातही आनंद आहे हे अनुभवतो आहे. 

तुझ्या जाणिवेचा चंद्र
स्मरणात डोकावतो
माझ्या जिवाचा समुद्र
तुझ्याकडे झेपावतो

तुझ्या रूपाचा प्रभाव
नसानसात वाहतो
आरशातला रोहित
मला बघून लाजतो

कसे मनात येण्याने
कोणी आपलेसे होते
आता मनातले तिला
सांगायाचे गं कसे ते

मनामधेच ठेवणे
आता वाटते ना बरे
मुग्ध चकोर मनाचा
रोज एकटाच झुरे

झुरणारा,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२६ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment