Thursday, October 24, 2013

पान ६४. किनारा


प्रिय नैना,

ज्या पत्राचे उत्तर काय येईल याची धाकधूक होती त्याचे उत्तर आले.  तिने काही प्रश्न उभे केले आहेत पण महत्वाचे हे की तिने नाही असे ठाम म्हटलेले नाही.  तिला मी आवडत नाही असेही तिने म्हटलेले नाही.  मी दिसायला तिला छान वाटतो असेही तिने म्हटले आहे. 

तिच्या एका प्रश्नामुळे मी अंतर्मुख झालो तो म्हणजे पाच मिनिटाच्या सकाळच्या पाहण्यावर तीचे मला आवडणे आधारित आहे असे तिचे म्हणणे.  मला एक मान्य आहे की मला सखी हवी आहे, पण मला दिवसातून दिसणाऱ्या मुली शंभर एक असतील.  त्यातून समोर सकाळी क्लास ला येणाऱ्याच पन्नास एक असतील.  त्यातून मला फक्त हिला पाहूनच का वेगळे वाटते याचे उत्तर खरेच माझ्याजवळ नाही ग नैना, तिला काय उत्तर देऊ?

त्या निर्मात्याने अंतर्मनात काय धागे विणून ठेवले आहेत कोण जाणे की समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींमधे माणसाला एखादीच आवडते, एखादीच अतिशय आवडते आणि ही आपल्यासाठीच जगात आली आहे असेही वाटते.  मग हे आवडणे दुकानातील ड्रेस आवडण्यासारखेच नाही का? असेलही पण त्यात वाईट ते काय असे मी म्हणतो.  तसे आवडणे असले तरीही आम्ही माणसे आहोत म्हणून त्या आवडण्याचे रूपांतर ओळखीत आणि मग प्रीतीत करायची निवड आपण करू शकतो ना.

मला तिला दुखवायचे पण नाही आणि तिला हवी तशी मैत्री पण करायची आहे, त्यामुळे फारच काळजीपूर्वक तिच्या पत्राला उत्तर द्यावे लागणार आहे.  ए पण तिच्या पत्रातून कळले की ती देवभक्त आहे म्हणजे आमच्या गणपती बाप्पा प्रेमाबरोबर तिची ही सवय पण जुळली म्हणायचे.  आता केव्हा तरी तिच्या बरोबर टेकडीच्या गणपतीला जायचे स्वप्न पाहायला मी मोकळा आहे.

खरे म्हणजे आयुष्य एखाद्या नौके प्रमाणे असते.  समोर जमीन दिसली की किनाला लागला असे वाटते आणि माणूस तिथे थांबतो, थांबल्यावर त्याला कधी कधी कळते की अरे हे तर बेट आहे हा आपला किनारा नाही मग पुन्हा त्याचा बोटीत प्रवास सुरू होतो, त्याचा किनारा शोधण्यासाठी.  समोर दिसेल त्या किनाऱ्यापाशी थांबले नाही तर त्याला तो त्याचा किनारा आहे की नाही हे कळणार कसे, त्यामुळे त्याला नव नव्या किनाऱ्यांवर थांबावेच लागणार ना.  त्याचा स्वतःचा किनारा मिळाला की मग त्याचा प्रवास संपणार.  कदाचित मैत्री करणे हे रोहिणीच्या पद्धतीने ती किनारा शोधते आहे असेच असेल नाही का.  मी तरी वेगळे काय करतोय, ज्याला मी ओळख करणे म्हणतोय तेच तिला मैत्री करून विचारांची देवाण घेवाण करून मग ठरवायचे आहे.  चला माझ्या आयुष्याची नौका एका किनाऱ्यावर तर पोचली आहेच, आता हा माझाच किनारा आहे का हे बघुया.

असो.

प्रशांत असनारे यांचा 'मीच माझा मोर' हा कवितासंग्रह मिळाला काल वाचायला आणि समजले की मुक्त कवितेमध्ये काय ताकत असते ते.  एक एक कविता वाचून मी अचंभित होत होतो.

किनारा
(मुक्त)

किनारा दिसतोय
आपलाच आहे
की वेगळेच बेट आहे
हे इथून कळणार नाही.

किनाऱ्याला बोट लावावीच लागेल
नंतर कळेल की
आयुष्याचा शोध संपला
की हे अजून एक विश्रांतीस्थळ झाले
प्रवास संपलेलाच नाही.

त्या विधात्याने
आयुष्याच्या सागरात आम्हाला
सोडून दिले आहे
आणि किनारा शोधण्याची ओढ टाकली हृदयात
आता गम्मत बघत असेल
कोण कधी किनाऱ्याला लागतोय याची

~ रोहित

(आशावादी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, October 21, 2013

पान ६३. मुक्तयमक


प्रिय नैना,

तो निर्णयाचा दिवस आलाच.  तिने मला मैत्री करायची का? असे विचारणारी मेल पाठवली आणि मी माझे मन मोकळे करून मनातले सगळे लिहिता झालो.  आता शून्याचा अनुभव घेतोय.  ती काय उत्तर देईल याची धाकधुक तर आहेच पण एक विश्वास पण आहे की आपल्याला वाटणारी ओढ एकतर्फी नाही, ती दोन्हीकडून आहे आणि त्यामुळे गोष्ट पुढे जाणार.  तसे नसते तर तिने मला इतकी संधीच दिली नसती. 

आता सुरू झाली वाट पाहण्याची बिकट वेळ.  तिचे उत्तर कधी येणार हे माहित नसल्याने आणि त्यावर आपला काहीच उपाय चालत नसल्याने येणारी विलक्षण अस्वस्थता आणि तगमग.  मी वेड्यासारखे तिला मेल केल्यावर फोनवर सुद्धा Replied to your mail please check असा संदेश पाठवलाच न राहवून.  पण आता खरेच वाट पहावी लागणार आहे. 

तिने नाही म्हटले तर?  पण या गोष्टीचा विचार मी आत्ता का करावा?  करूच नये.  आत्ता तर तिच्या होकाराला कसे साजरे करायचे हेच ठरवायला हवे.  नाही झाले तर जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊ हेच ठरवलेले खरे.  ती मेल ला अनुकूल उत्तर देइलच अशी खात्री ठेवायला काय हरकत आहे?  हे सगळे फारच पटापट घडत गेले आणि मी आता विचार करतोय की तिचे उत्तर आल्यावर आयुष्याला वेगळेच वळण मिळणार आहे.  आज झोप येईल असे वाटत नाही.  तिच्यावर एक कविता लिहावी जी मनात किती वेळापासून रूजी घालतेय.

तेव्हापासून
(छंद: मुक्तयमक)

तुला पाहिले तेव्हापासून
तू आवडतेस कळाले
तूच पाहिजेस जगण्यासाठी
सुंदर ध्येय मिळाले

तुझे हासणे म्हणजे अनुभव
शुभ्र चांदणे भुरभुर
तू नसताना तुझ्याच साठी
हृदयी माझ्या हुरहुर

जग हे सगळे 'तू' मय झाले
'मीपण' पसार झाले
प्रीत कळ्यांचे गंधित उपवन
मनात फुलून आले

अस्तित्वाने तुझ्या केवढी
बदलून गेली दुनिया
जगणे सुंदर झाले माझे
ही पण तुझीच किमया

~ रोहित

छंद मुक्तयमक
(याला मुक्तयमक म्हटलेय कारण या रचनेत चार ओळींचे कडवे आणि दुसऱ्या-चौथ्या ओळीत यमक इतकेच पाळलेले आहे.  अक्षरमर्यादा पाळलेली नाही, अर्थाप्रमाणे सैल शब्दांची मांडणी करताना अर्थाला हवे असतील तितके शब्द ओळीत येजले आहेत.)

(आशावादी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२२ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Thursday, October 17, 2013

पान ६२. गती


प्रिय नैना,

माझ्या आयुष्यातल्या घटनांच्या चक्राची गती अचानक जलद झाली असे दिसते आहे.  पहिला सुखद धक्का आज मिळाला ते तिचा एसेमेस (ढँन ट ढँन) आला.  Do you have a mail address, can I send you a mail? मी पटकन उत्तर दिले Yes Yes.  आणि माझा मेल एड्रेस तिला उत्तरात पाठवला. ती स्वतःहून हे सगळे करते आहे याचा मला खूपच अचंभा वाटत होता.  तिला पण काहीतरी वाटते हे सिद्ध करायला इतके पुरे नाही का?  याच एका कारणामुळे आजचा दिवस अगदी अगदी गतीमान दिवस झाला.

इमेल येणार आहे हे माहित असणे आणि त्याची वाट पहावी लागणे हे किती वेदनादायी काम असते गं.  त्या इमेल खात्याला रिफ्रेश करत मी किती वेळ घालवला असेल ठाऊक नाही.  शेवटी दुपार नंतर फोन मधे Please check my email  असा तिचा एसेमेस आला आणि मी येस येस म्हणत आहे तिथेच थोडेसे नाचून घेतले.  कधी एकदा ती मेल वाचतो आणि कधी नाही असे झाले होते.  त्या मेल मधे तिने मला तिच्याकडे एकटक न पाहण्याबद्दल सांगितले आहे.  तिच्या मैत्रीणी तिला त्यामुळे चिडवतात म्हणे, जळल्या मेल्या त्या मैत्रीणी.

माझ्या पाहण्याने तिला अॅकवर्ड वाटते आहे त्यामुळे तसे सगळ्यांना दिसेल अश्या प्रकाराने करायचे नाही असे ठरवले आहे.  तिला तिच्या इमेल ला उत्तर द्यायचे आहे.  नशिबाने मला असा कौल दिला की मी जे मागत होतो ते मला एका वेगळ्या पद्धतीने मिळालेच आहे. ती इमेल मधे मैत्री पुढे वाढवूया असे म्हणाली आहे.  याला म्हणतात मनासारखे होणे.  मी ठरवले आहे की आढेवेढे न घेता, जे मनात आहे ते सुरवातीलाच सांगून मोकळे व्हायचे आहे नाही तर उगाच पुन्हा अधांतरी ताटकळत राहणे होईल.  नशिबाने लिंबू दिले तर त्याचे लेमोनेड करावे असे म्हणतात तसेच करावे लागणार आहे.

आशा
(छंद: गजवदन)

तिने मागितली ०- मैत्री स्वतःहून
काय समजावे ०- अर्थ याच्यातून
माझ्या प्रमाणेच ०- तिला पण ओढ
तिच्या संमतीची ०- मिळाली ही जोड

मैत्री होते आधी ०- मग होते प्रीती
हीच माझी आशा ०- जगण्याच्या साठी
तिला सर्व काही ०- सांगायला हवे
सुरवातीलाच ०- मन खुले व्हावे

उगाचच नको ०- मागे राहीलेले
मनातले काही ०- फक्त साचलेले
तिला घेऊ द्यावा ०- हवा तो निर्णय
प्रेम केल्यावर ०- कशाचे हो भय

खूप आवडते ०- मनी ठसलेली
सांगणार तिला ०-  प्रीत मला झाली
मग थांबणार ०- उत्तराच्या साठी
होणार ती माझी ०- मनी आशा मोठी

~ रोहित

गजवदन छंद:
[ | प | - - S S S | प | - - ] १२ अक्षरे,
हा छंद शुद्धसती छंदाच्या द्विरावृत्तीने होतो.  या छंदातही शुद्धसतीप्रमाणेच दोन किंवा चार अक्षरांचे शब्द योजल्याने म्हणताना ठेका धरता येतो. 

(अचंभित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१८ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Wednesday, October 16, 2013

पान ६१. शुद्धसती


प्रिय नैना,

तिने माझा फोन नंबर मागितला म्हणजे का?  या एका प्रश्नाने माझी आता झोप उडालेली आहे. याचा अर्थ ती आता मला कधी एसेमेस करणार का?  की मला ती फोनच करणार?  ते जाऊ दे पण माझा फोन नंबर तिने जपून घेतला म्हणजे तिच्याही मनात काहीतरी आहे असेच धरायचे ना?  माझ्या मनात सध्या जसा तिचाच वावर आहे त्याच प्रमाणे आता तिच्या मोबाईल मधे माझा नंबर आहे हे किती सुखदायी सत्य आहे. 

काल नदीवर सगळे गप्पा करत असताना रोहिणी तिथले वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करत होती.  मला कळले कारण मी सतत तिच्याकडेच बघत होतो ना.  महत्वाचे म्हणजे तिला आपण दगड गोळा करतोय याला कोणी काय म्हणेय याची तिला पर्वापण नव्हती.  इतक्या निरागस पणे तिच्या मनातली छोटी मुलगी आपले अल्लडपण टिकवून आहे याचा मला प्रत्यय तिथे आला.  आपल्याला आवडणाऱ्या माणसाचे सगळेच आवडते, पण तिच्या या स्वच्छंदी बिनधास कृतीवर मी फिदा झालो ते तिच्या वेगळे पणा मुळे.  माझी इच्छा होती तिला विचारावे हे दगड कशासाठी?  पण नाही विचारले, कधी कधी फुलपाखराला हात लावायला गेले की ते उडून जाते तसेच मी विचारले की तिला उगाच खूप समजावत बसावे लागेल आणि त्याची मजाच जाईल असे वाटले तेव्हा.

क्लास मधे जाताना आणि बाहेर येतांना चार पाच मिनिटे पहायला मिळणे आणि एक अख्खा दिवस तिच्या कडे पाहायला मिळणे यात किती आभाळाएव्हढे अंतर आहे हे जाणवले काल.  काय दिसते यार, तिचे हसणे, तिच्या गालावर हसताना पडणारी हलकीच खळी, तिचे ते माझ्याकडे बोलता बोलता मधेच बघणे, काय काय आठवू...


पावती
(छंद: शुद्धसती)

अप्सराच जणू
धरेवर आली
माझ्या मनामधे
विराजित झाली

शेकहॅन्ड तिचा
मोरपीस भास
क्षण सारे आता
नशेतच खास

विचारणे माझा
फोन कशासाठी?
संमतीची तिच्या
पावतीच मोठी

आठवाने तिच्या
आनंदतं चित्त
जगणंच धुंद
तिच्यामुळे होतं

~ रोहित

छंद शुद्धसती:
[ प | - - ] ६ अक्षरे
(शक्यतोवर चार किंवा दोन अक्षरांची योजना केली की शुद्धसती जमते , शेवटी दोन अक्षरे यावीत असे बघावे लागते.  जीवनलहरी छंद पण सहा अक्षरांचाच आहे पण तो भृ - भृंगावर्तनी असल्यामुळे त्यात तिन, दोन, एक अश्या अक्षरांचे शब्द योजल्या जातात)

(आहे नशेत)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१७ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, October 15, 2013

पान ६०. एनकाऊंटर

प्रिय नैना,

आज सकाळी पाच वाजताच जाग आली.  आज सहलीचा दिवस होता ना.  सगळी तयारी करून जीव मुठीत धरून मी साडे सात पर्यंत क्लास च्या समोर पोचलो.  सगळे तिथे सहलीसाठी जमा होत होते.  रोहिणीला इतक्याजवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.  मी मधे मधे श्वास घ्यायचेही विसरत होतो कदाचित.

रोहिणीने बदामी कलर चा टिशर्ट टॉप घातलेला होता आणि जिन्स.  असे म्हणावे लागेल की तिच्यामुळे त्या ड्रेस ला सुंदरता प्राप्त झालेली होती.  आणि सर्वात कातील काही असेल तर तिने घातलेली फ्रेंच ब्रेड वेणी.  तिच्या अर्ध्या पाठीपर्यंत आलेली ती फ्रेंच ब्रेड वेणी म्हणजे आजचा कहर होता.  या वेणीमधे इतके सुंदर दिसणारी कोणतीच व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही. 

तिच्या डोळ्यात मला तिथे बघून आश्चर्य युक्त उत्सुकता दिसत होती.  बोलता बोलता ती माझ्याकडे पाहत होती.  बरेचदा असे झाले की मी तिच्याकडे बघतोय आणि तिचे माझ्याकडे बघणे व्हायचे आणि एका क्षणासाठी थांबल्यासारखे होऊन मला नजर कुठेतरी फिरवावी लागायची, कारण मी एकटक बघतोय असे वाटायला नको ना.  तेव्हा बरीच धांदल उडायची.

अंताक्षरी हा खेळ ज्या व्यक्तीने शोधून काढला त्याचे देऊळ बांधून तिथे रोज पूजा करायला मी तयार आहे.  या खेळात काय काय गाणी तिच्या कडे बघून म्हणता आली म्हणून सांगू.  ते अंताक्षरीचे बस मधले दोन तास म्हणजे आजचा सर्वोत्कृष्ठ उत्सव होता.  खूप मजा आली खूप चिडवणे खूप खोटोखोटे भांडणे, भेंड्या चढवणे आणि लटके रागावणे, रूसणे परत हसणे काय काय पहायला मिळाले अहाहा. 

सहलीच्या जागेवर पोचलो तेव्हा सामान नेताना आणि ठेवताना अचानक,
"तुम्ही समोरच्या बिल्डींग मधे राहता ना", प्रश्न आला, पाहतो तो बाजूला रोहिणी उभी होती, मी असा दचकलो की काही क्षण मला उत्तरच देता आले नाही
" हो हो, समोरच", असे काहीसे उत्तर मी नंतर दिले असावे. आणि त्यानंतर जे झाले ते मी कधीच विसरू शकत नाही.  रोहिणीने पटकन हात समोर केला, शेक हॅन्ड करण्यासाठी करतात तसा आणि माझा चेहरा तेव्हा असा काही झाला असेल की काय सांगू, मी तर तिला जवळून बघायचे स्वप्न घेऊन इथे आलेलो आणि ती सरळ शेक हॅन्ड करायला हात समोर करत होती.  मी शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला, तिचा नाजुक हात … शब्द नाहीत…  हातात घेऊन शेक हॅन्ड करताना माझ्या जीवाचे मोरपीस झाले होते.  त्या क्षणापासून मी कदाचित नशेतच आहे ती नशा किती दिवस पुरणारेय पुरतच राहणार आहे असे दिसतेय.

"मी, रोहिणी", शेक हॅन्ड करत ती म्हणाली, आणि यावर मी नुसताच हसलो. 
"तुम्ही काय करता, आय मीन शिकता की… " तिने प्रश्न विचारला.
सामानाची आवराआवर करता करता आमचे हे संभाषण सुरू होते ते फार साहजिक वाटत असेल पण माझ्या मनात जे गिटार वाजत होते ते मलाच माहित.
"नाही मी नोकरी करतो" माझे उत्तर संपेपर्यंत तिला मैत्रीणींमधे काही चर्चा सुरू झाली आणि ती त्यांच्याबरोबर गप्पांमधे लागली.  मी तो शेक हॅन्ड चा झालेला नाजुक वार जगत तिथे किती क्षण खिळलेला होतो कुणास ठाऊक.  यालाच कदाचित म्हणत असावेत की अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.

… आणि परतीच्या प्रवासात बसच्या मधल्या चालण्याच्या जागेच्या बाजुला असलेल्या दोन सीटांवर आम्ही बसलेलो.  म्हणजे अगदीच बाजूला बाजूला नाही म्हणता येणार पण मधले चालण्यासाठी ठेवलेले अंतर सोडले तर ती माझ्या बाजूलाच होती की.  एव्हाना खिडकी ची सीट पकडणारा मी तिला मधे बसलेले पाहून आपोआपच मधली सीट पकडलेली होती याचे मला मनातच हसू आले होते आणि मजा पण वाटली होती.  कुणाच्या प्रभावाने आयुष्य कसे बदलायला लागते याचा हा अनुभव होता.  सवयी देखील आणि आवडीदेखील बदलायला लागल्या की.

आजचा दिवस मी ठरवून तिच्याशी बोलायला आलो होतो पण तिनेच शेक हॅन्ड करून मला क्लीन बोल्ड केलेले आणि पुढे मी ठरवलेले सगळे विसरून गेलेलो.  त्यावर ती गुगली वर गुगली टाकतच होती, कारण तिने चालत्या बसमधे फोन हातात धरून मला विचारले, तुमचा फोन नंबर काय.  मी मनातल्या मनात उडालोच.  इतका बावचळलेलो होतो (मनात) की तिचा नंबर विचारायचाच राहून गेला.  माझा ती घेऊन गेली. 

It was nice time spent with you today, ती म्हणाली.  इंग्रजीचा आधार लोक का घेतात हे कळले आज.  सगळं म्हणायचं आणि काहीच म्हणायचं नाही.  खूप अर्थपूर्ण बोलायचं आणि तसे पाहता फारच साधे वाक्य बोलायचे.  (It was my pleasure वगैरे काहीतरी बोलायला जवे होते हे आता वाटते)  मी फक्त हसलो.  (मी चक्क लाजलो होतो, कदाचित, पण ते मला लपवता आले असावे)

नैना, नैना आज चा दिवस म्हणजे सुवर्णाक्षरात लिहायचा नव्हे तर प्लाटीनम च्या अक्षरात लिहायचा दिवस होता म्हणावे लागेल.  हा दिवस आता खूप दिवस पुरणार आहे, ही नशा साधी नाही.  जगणे खूप सुंदर आहे.  खूप सुंदर !!


जगणे
(छंद: पादाकुलक)

मागितले नाही तरी
आज कितीक मिळाले
मनातले स्वप्नपक्षी
उंच उंचच उडाले

अजूनही नशेत मी
मोठा आठवांचा ठेवा
किती दिवस पुरेल
गोड गोड खास मेवा

माझा आनंद अपार
मन दंगले सुखाने
माझे जगणे भरले
समाधानी सुगंधाने

~ रोहित

छंद पादाकुलक
[ | प | प ] ८ अक्षरे

(रोमांचित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१६ ऑक्टोबर २०१३, ०९:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, October 14, 2013

पान ५९. तयारी


प्रिय नैना,

उद्या रोहिणीच्या क्लास ची सहल जाणार आहे.  ठरल्याप्रमाणे सरांच्या मुलाने (जो आता माझा चांगला ओळखीचा झाला आहे) मला पण बरोबर यायला सांगितले आहे (म्हणजे त्याला व्यवस्थेमधे मदत होईल).  आज माझी उदयाची तयारी करताना किती धांदल उडतेय तुला काय माहित.

१) इस्त्री चे कपडे
२) जपून ठेवलेला डियो उद्या लावणार
३) अंताक्षरी वगैरे खेळ बस मधे झाले तर त्यासाठी र आणि ह ची गाणी मी एका यादीत आठवून ठेवली आहेत. (हीच अक्षरं खूप येतात ना)
४) उद्या दाढी साठी नवे ब्लेड आणून ठेवले आहे
५) दोन दिवस आधीच कटींग करून आलो आहे (म्हणजे लगेच केली असेही वाटणार नाही आणि नीट पण दिसेल)
६) कवितांची वही जवळ ठेवली आहे (मी आजकाल सगळ्या कविता एका वेगळ्या कवितांच्या वहीत लिहित जातो, आणि आता माज्याकडे ५० हून अधिक कविता आहेत माहिताय)
७) एका मित्राकडे जोक्स चे पुस्तक दिसले ते काही दिवस मागून आणले आहे, त्यातले बरेच जोक्स लक्षात ठेवले आहेत, जोक सांगणारा मुलगा लोकप्रिय असतो ना.

हे सगळे झाले तरी तिच्याशी काय बोलायचे, कसे बोलायचे हे समजत नाहीये आणि त्याचेच जाम टेंशन आलेले आहे.  ती मला भाव देईल ना?  खरे म्हणजे आतापर्य़त जे नजरा नजरांनी आमचे बघणे चालते त्याला अर्थ द्यायचा म्हटले तर आम्ही आधीच एकमेकांशी बोलायला तयार आहोत असे समजायला पाहिजे.  पण शेवटी प्रत्यक्ष बोलणे म्हणजे थोडेसे टेंशन येतेन ना गं?

घाई
(छंद: रक्षा)

तुला भेटण्याची आता मला झाली घाई
आवरून आवरणे थांबतच नाही
घड्याळाकडेच सदोदित डोळा जाई
किती झाली घाई

तुला साठवले रोज मनामध्ये किती
तुला बघताच केली डोळ्यांची आरती
पुरत नाहीत तुझ्या आठवांचे मोती
ओढ भेटी साठी

नशिबाने झोळीत हा दिवस टाकला
तुला भेटण्याचा छान घाट हा घातला
ठरवून जरी आज खेळ हा मांडला
आवडावा तुला

मनापासून केलेले जमेल जमेल
गोड अनुभव भेट आपली ठरेल
अविस्मरणीय दिस आजचा बनेल
मैत्री उमलेलं

~ रोहित

रक्षा छंद: विषम छंद
[ | प | प - - ] १४ अक्षरे
[ | प | - - ] ६ अक्षरे

(उत्साहित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५८. गया

प्रिय नैना,

एकमेकांना पूरक ठरणे हे अधिक आनंददायी असते, हो ना गं?  मी राकट दांडगा आणि ती नाजुक सुंदर,  आमच्यात काहीही सारखे नाही पण मला तिची ओढ वाटते कारण ती मला पूरक आणि मी तिला पूरक होऊ शकतो.  शक्ती आणि सौंदर्यांचा असा मेळ पूरक असल्यानेच आनंद देत असावा.

मागे मी 'रामरसायन' छंदाबद्दल लिहिले होते ना, त्यात सात/सात/आठ/सात असे चरण योजावे लागतात आणि ती तिसरी आठ अक्षरांची ओळ सुद्धा त्या छंदाला पूरक ठरते असे वाटते.  त्याच ओळीमुळे ती कविता लोकगीताच्या चालीत गाता येते असे मला वाटते.

हा 'गया' छंद त्याच धरतीचा आहे.  सहा/सहा/आठ/सहा असे चरण योजले की हा छंद साधता येतो.  [छंदोरचना, पान ५३८]


नवे आयुष्य
(छंद: गया)

तुझी भेट घ्यावी
ओळख करावी
तीव्र इच्छा सोबतीने
धुंद गाणी गावी

आता लवकर
तुझ्या बरोबर
घालवाया एक दिस
मला मिळणार

तुला आवडावे
इच्छा मनोभावे
तुला आनंद देईल
असेच घडावे

नवीन क्षणांची
नवीन युगाची
सुरवात व्हावी तिथे
नव्या आयुष्याची

~ रोहित

गया छंद:
[ | प | - - ] दोन वा अधिक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण

(छंदोमयी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१4 ऑक्टोबर २०१३, ०७:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Wednesday, October 9, 2013

पान ५७. उत्संग


प्रिय नैना,

रोहिणी च्या क्लास ची सहल जाणार आहे आणि त्या सहलीला मी पण जाणार आहे हे नक्की झाले आहे.  क्लास च्या सरांच्या मुलाशी माझी छान मैत्री झाली आहे आणि बोलता बोलता क्लास ला जाणाऱ्या सहलीला सहायक म्हणून तो मला पण बरोबर घेऊन जाणार बोलला. हा मला मिळालेला नशिबाचा कौल मानावाच लागेल.

सहलीला जाऊन मी काय करेन, तिच्याशी कशी ओळख करेन, तिला काय सांगेन या सर्व गोष्टी मी ऐन वेळ या एकाच कल्पनेवर सोडल्या आहेत.  मला काय रायचे हे ठाऊक आहे त्यामुळे जशी जशी संधी येईल, जशी जशी वेळ येईल त्यातून मी ते ठरवत जाईन असे ठरले आहे.  आज उगाच हैदय धडधडते आहे.  एका मोठ्या मिशन ची सुरवात होत असल्यासारखी.

एकाच वर्गात असणाऱ्या मुला मुलींचे छान असते त्यांना ओळख करावी लागत नाही, आमचे ओळख करण्यापासूनचे वांदे आहेत.  एक मात्र माझ्या बाबतीत अधिक चांगले आहे की मला छोटी का होईना नोकरी आहे.  कधी तिच्यावर खर्च करावा लागलाच तर आई बाबांना मागावा लागणार नाहीये. असो.

विषम छंद म्हणजेच ज्या छंदात ओळींची लांबी वेगवेगळी असते अश्या दोन हून अधीक ओळी असतात.  पण आवर्तने त्या छंदांमधेही असतातच तेच त्या छंदाला अधिक नादमय करते.  मागे पान ३८ वर हठयोग नावाने एक छंद बोललो होतो, गडकऱ्यांनी तो विषम छंदातच लिहिला आहे.  छंदोरचना पुस्तकात पान ५४१ मधे विषम छंदांच्या यादीत 'उत्संग' नावाचा छंद सांगितला आहे. 

[ | प | - - ] एक चरण
[ | प | प | - - ] एक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण

या पद्धतीने पदे लिहित गेलो की हा छंद होतो.

(छंद: उत्संग)

तिचा छंद माझ्या
मनामध्ये नादत राहतो
आनंदाचा
झरा तिच्या मुळेच वाहतो

एकटाच होतो
आता तिचा विचार सोबती
आली आली
आयुष्याला निराळीच गती

रम्य स्वप्न माझे
तिचे माझे व्हावे एक घर
आयुष्याचे
भावगीत बनावे सुंदर

~ रोहित

(उत्साहित)
रोहित

उत्संग छंद:
[ | प | - - ] एक चरण
[ | प | प | - - ] एक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण (दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक छान वाटते)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१० ऑक्टोबर २०१३, ०८:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, October 8, 2013

पान ५६. अनुष्टुभ

प्रिय नैना,

रामरक्षा म्हणताना "अनुष्टुभ छंद: सीता शक्ती" हे प्रत्येक वेळा म्हणावे लागते.  आज जेव्हा या छंदाबद्दल अधिक माहिती वाचली तेव्हा "अनुष्टुभ छंद:" म्हणजे काय हे कळले.  बरीचशी रामरक्षा अनुष्टुभ छंदात लिहिलेली आहे.  हा छंद तसा पहावा तर अक्षरांचे काही भागात बंधन पाळत नाही, तर काही भागात लघु गुरू मात्रांचेपण बंधन पाळतो.  गम्मतच आहे आणि असा पद्यबंध का तयार झाला असेल याचा मी विचार करत होतो.

कदाचित आधीच्या काळात जेव्हा मुद्रण नव्हते तेव्हा मुखोद्गत करूनच काव्य आणि ज्ञान पुढच्या पिढीला मिळायचे, गुरू त्यांना पाठ असलेले ज्ञान शिष्यांना पाठ करवून द्यायचे.  अनुष्टुभ छंदाला म्हणायची एक खास पद्धत आहे आणि त्यामुळे तो पाठ करायला आणि म्हणायला सोपा होतो हे त्याला वाचून कळते.  आपण रामरक्षा ज्या चालीत म्हणतो तीच चाल या छंदात लिहिलेल्या रचनेला लागते.

आता आताच्या काळात "भारत एकात्मता स्तोत्रम्" या अनुष्टुभ छंदातच लिहिलेले आहे त्याचे उदाहरण बघ:

अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं मह्त
इन्द्रप्रस्थं सोमनाथ: तथाSमृतसर: प्रियम

या छंदात लिहिलेल्या पद्याला यमकाची गरजच राहत नसते.  यमक नसूनही ते म्हणताना अडचण येत नाही, अशी एक लय त्या छंदात आहे.

या छंदाची रचना अशी होते

| प | ॅ + + +
| प | ॅ + ॅ  +
| प | ॅ + + +
| प | ॅ + ॅ  +

म्हणजेच प्रत्येक ओळीत पहिली चार अक्षरे कशीही चालतात पण दुसऱ्या चार अक्षरांना ठराविक बंधन असते.  पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत लगागागा म्हणजेच फक्त पाचवे अक्षर लघु आणि उतरलेली तीन गुरू असतात.  दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत लगालगा म्हणजेच पाचवे आणि सातवे अक्षर लघु आणि सहावे आणि आठवे अक्षर गुरू  असे असते.

या छंदात काही तरी लिहून पहायचा आज प्रयत्न केला मी.  काय मांडायचे आहे ते मला माहितच होते.  मला माहित असलेली यशाची त्रीसूत्री सांगायची होती.  आता ते मांडायला लिहिताना काही गोष्टी पाळायच्या होत्या आणि सोपी पद्धत होती ते रामक्षेच्या चालीत म्हणता म्हणता ते लिहित जाणे.  काही तरी जमले आहे बघ तुला कसे वाटते ते.

त्रीसूत्री
(छंद: अनुष्टुभ)

निश्चित ध्येय शोधावे
गोंधळात असू नये
ध्येय मिळायच्या आधी
स्वस्थ काही बसू नये

तीव्र इच्छा हवी जेव्हा
ध्येय प्राप्त करायचे
इच्छेवीण कुणाला ना
काही येथे मिळायचे

अतोनात प्रयत्नांनी
नित्य साधेल कामही
यशाची हिच त्रीसूत्री
ध्येय इच्छा प्रयत्नही

~ रोहित

(अभ्यासू)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०७ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५५. श्यामाराणी

प्रिय नैना,

रोमँटिक किंवा ज्यांना फर्स्ट लव सिनेमे म्हणता येईल असे पहायला खूप आवडतात त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या सिनेमांमधे एक तरून नायक असतो आणि एक गोजिरी नायिका असते.  नायकाचे नायिकेवर अतोनात प्रेम असते, नायिकेचे सुद्धा नायकावर तितकेच अतोनात प्रम जडते, त्यांना बऱ्याच अडचणी येतात पण शेवटी त्या दोघांचे स्वप्न पूर्ण होते.

असा चित्रपण पाहता पाहता लगेच स्वतःला नायकाच्या रूपात कल्पना करणे आणि नायिकेचा होकार मिळवून प्रणयाराधन करणे किती छान वाटते.  या चित्रपटातून अजून एक आशा मिळते की आपण ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम करतो ती शेवटी आपल्याला मिळतेच, की ती व्यक्ती कधी आपल्याला नाही म्हणूच शकत नाही.  ही आशा हवी हवीशी असते आणि त्यामुळेच तो चित्रपट मनात राहतो.

माझ्या सिनेमाची नैना, तू सध्या एकमात्र प्रेक्षक आहेस आणि माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक कुठल्यातरी ढगात बसून अॅक्शन म्हणतोय आणि पटकथा पण मला देत नाहीये.  स्वतःची पटकथा स्वतःच लिहायची आणि मग ती वठवायची यात केवढी रिस्क आहे नाही का गं?

आपल्या चित्रपटाचा शेवट गोडच व्हावा ही तीव्र इच्छा आहे.  नायक नायिकेवर अतोनात प्रेम करतो आहे आता माझ्या कहाणीत काही टर्न हवा आहे, काही अजून हवे आहे गं?  एक घुमाव चाहिये, एक सॉलिड वळण हवे आहे. 

कविता
(छंद: श्यामाराणी)

तुझं पाहणं सुंदर
तुझं स्मरणं सुंदर
किती चांदणं सुंदर
झाला चकोर धुंद

कृष्ण वेणूची तू  धून
जाते काळीज वेढून
जग कामे विसरून
रंगले तुझ्यामधे

जसा अवखळ झरा
तुझा चेहरा हसरा
रोगी होणारच बरा
पाहता क्षणामधे

~ रोहित

(छंद: [ | प | प ] दोन व अधिक चरण, [ | प | प | प | - - - ] एक चरण, बरेचदा (आठ, आठ, आठ, सात) अश्या चार ओळी लिहिल्या की या छंदात बसतात.  हे रामरसायन (रोहिणी) छंदाच्याच पद्धतीने एक ओळ वेगळी असा छंद आहे.  आधीच्या कवींनी या छंदात कडवी लिहिताना पहिल्या तीन ओळीत यमक पाळलेले दिसते.  पान ३६ मधे वर्णन केलेले धनाक्षरी किंवा कवित्त छंद याच श्यामाराणी छंदातल्या चार कडव्यांना योजून आणि अजून काही बंधन पाळून करण्यात येते.)

(उत्सुक)
रोहित

माहित असलेली श्यामाराणी मधली काही उदाहरणे:

आम्ही जाणावे ते काअी
तुझे वर्म कोण्या ठायी
अन्तपार नाही नाही
अैसे श्रुती बोलती

(संत ज्ञानेश्वर)

राम आकाशी पाताळी
राम नांदे भूमंडळी
रामयोगीयांचे मेळी
सर्व काळ तिष्ठत

(संत रामदास)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०४ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५४. या पावसाने

प्रिय नैना,

भुर भुर पाऊस पडत होता.  कौलारू घरे, इमारतींच्या भिंती ओल्या होऊन तृप्त होत होत्या.  छोटे छोटे थेंब आपापली एक विशेष जागा घेऊन ऐटीने जगाकडे पाहत होते.  काही पानांवर बसले होते, काही गाड्यांच्या काचांवर, काही सायकलींच्या हॅंडील वर बसून जग पाहत होते.

नेहमी कोरडे राहणारे रस्ते, पाण्याच्या नवीनच जन्माला आलेल्या लोटांना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळू देत होते.  या सगळ्या रम्य वातावरणार मी वाट पाहत होतो माझ्या स्वप्नाची.  ती केव्हा क्लास ला येईल याची.  तिने जेव्हा रेनकोट बाहेर काढून ठेवला आणि माझ्याकडे पाहिले तेव्हा…

काही भाग्यवान जलबिंदू तिच्या गालांवर बसलेले.  काही जलबिंदू तिच्या केसात मोती माळावेत तसे सजलेले, तर काही जलबिंदू तिच्या ओठांवर.  असा नयमरम्य सोहळा या पावसामुळे मला आज साजरा करता आला त्यासाठी मी पावसाचे कसे आभार मानू हेच कळत नाहीये.

या सगळ्यात माझ्याकडे पाहून तिने डोक्याला एक असा कातिल झटका दिला ज्यांने तिचे केस थोड्यावेळासाठी विशिष्ट लयीत हलले आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागी स्थिर झाले, याला म्हणतात अदा.  असो..

या पावसाने
(मुक्त)

या पावसाने दिला
एक नयनरम्य सोहळा
तिच्या गालावर सजलेल्या
पारदर्शक रूपेरी मोत्यांचा

या पावसाने दिले
एक नवे स्वप्न
गालावरच्या अनमोल मोत्यांना
जवळून डोळाभर बघायचे

या पावसाने दिले
सुंदर चैतन्यमयी चित्र
मनात खोलवर साठवायला
क्षणोक्षणी आठवायला

या पानसाने दिली
तिची अजून एक अदा
हलकेच केस झटकण्याची
माझ्याकडे पुन्हा बघण्याची

~ रोहित

(मुक्त म्हटले तरीही कवितेच्या कडव्यात चार ओळी असण्याची पद्धत आपोआपच पाळली गेली आहे.  मुक्त म्हटले कारण यमकाचेही आयोजन करावेसे वाटले नाही.  माझा अनुभव कसाही करून मला काही शब्दात मांडून ठेवायचा होता जसे चित्रकार त्याला दिसणाऱ्या रंगांना जमेल त्या हुबेहुब रंगात टिपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि ते चित्र त्याच्यासाठी त्या क्षणांची आठवण ठरते.  ही कविता माझ्यासाठी या पावसाची आठवण आहे)


(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०४ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com