Sunday, September 15, 2013

पान १८. रातराणी


प्रिय नैना,

फेसबुकवर एका समुहात मला पद्य लिहिणाऱ्यांची, वृत्त शिकणाऱ्यांची केलेली थट्टा दिसली.  खरच सांगतो मला राग आला.  मग विचार केला की ज्याला गाता येत नाही त्याला काय वाट्टेल ते गायची मुभा असते कारण काय चुकतेय हे समजण्याचा प्रश्नच नसतो.  काय वाट्टेल ते गाणे सोपे पण असते कारण त्याला वेळ द्यावा लागत नाही आणि रियाज पण लागत नाही.  पण एकदा गाणे शिकायला लागलो की दोन गोष्टी होतात, जे गाणे गातात त्यांच्या गाण्याचा अधिक खोल आस्वाद घेता येतो आणि स्वतः पण सुरात गाता येते.  आता माझ्या जवळ दोन पर्याय आहेत. एक म्हणजे हे पद्य, वृत्त सब झूट आहेत समजून त्यांच्याकडे कानाडोळा करणे आणि दोन म्हणजे मराठी कवितेला लाभलेल्या अनेक जेष्ठ कवींसारखे त्यांचा अभ्यास करून कवितांचा आस्वाद घेणे.  पहिला मार्ग फार सोपा आहे, दुसरा मार्ग कठीण आणि वेळखाऊ.  पण दुसऱ्या मार्गावर मला कवितेतली माणिक हिरे वेचण्याचे चक्षू प्रप्त होणार आहेत.  स्वतः फार चांगले लिहिता जरी नाही आले तरही छंदबद्ध, वृत्तबद्ध, तालबद्ध लिहिणाऱ्यांच्या कवितांचा आस्वाद मला अधिक खोलवर घेता येईल.  नैना, मी दुसरा मार्ग निवडायचे ठरविले आहे.

रास आनंदाची मोठी
राजस रत्नांच्या खाणी
रोहिणी सौंदर्य रवी
रोहिणीच रातराणी

रंगलो रंगात पार
रम्य रूप रेखाकृती
ठरले आयुष्य राधा
भावना गाती आरती

केस रेशमी बांधुन
स्वप्न रथात रिंगण
झाली सरस पारध
चित्त बिचारे हरीण

घेते प्रित रोहीणीची
अणू रेणूत आकार
अद्भुत त्याची रचना
दिव्य तो रचनाकार

('र' ची आवर्तने करण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते कवी सारंग भणगे यांना माझा सलाम.  मराठी कविता समुहावर शब्दालंकाराच्या चाहत्यांपैकी ते एक आहेत).  'पादाकुलक छंग' रक्तात भिनतोय आणि मनाला सुखावतोय गं. 

रंगरंगलेला,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ फेब्रुवारी २०१२, २१:३०
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment