Sunday, September 15, 2013

पान ३६. घनाक्षरी


प्रिय नैना,

कुणी आवडायला लागले की ते आपले पण वाटायला लागते.  कधी कधी वाटते आपण मनातल्या मनात जे माझी रोहिणी असे म्हणतो ते आपण कुणाच्या मनाविरूद्ध तर करत नाही ना?  रोहिणी ने माझी मैत्री माझ्या प्रीतीचा स्वीकार केला नाही तर?  पण मनाच्या आत कुठेतरी अजून एक मन आहे जे ऐकायलाच तयार नाही आणि ते सतत सांगत असते की ती तुझीच आहे.  तिला तुझ्यासमोर येण्याचे काही कारणच नव्हते, योगायोग वगैरे काही नसते.  तिने तुझ्या आयुष्यात येणे यातच संदेश दडलेला आहे की तुमचे जमणार आहे.  ते विचार इतके छान वाटतात ना की मग मी चिंता विसरून जातो.

किती सहज म्हणतोय मी की ती माझ्या आयुष्यात आली.  हो तिला पहिल्यांदा पाहिले आणि त्याच घटनेला मी नेहमी म्हणणार की ती माझ्या आयुष्यात आली.  अशी आली की आता कोणी दुसरे येऊच शकत नाही, कुणाची आता गरजच नाही.  कदाचित तुम्ही मनापासून इच्छा केली की सगळे जग ते पूर्ण करायचा कट करते म्हणतात ना तसेच व्हावे असे मला वाटत राहते आणि मी तिच्या विचारात सध्या जेवणखाण विसरून दिवस काढतोय.

आज अर्धसम छंदात घनाक्षरी मधे एक रचना केलीये ती दाखवतो आता.  सध्या पद्यप्रकाश पुस्तक माझी शाळाच ठरतेय, जिथे माधवराव रोज काहीतरी नवे शिकवतात. 

चांदणे
(छंद: घनाक्षरी*)

अंधार एकटेपणा, अंधार कोणी नसणे
पण तिचा चंद्र येता, चांदणे पसरले

इथे थांबलेत मार्ग, सर्व शोध संपलेले
हीच जिवाची पहाट, शेवटी उमजले

तिने आयुष्यात येता, जग बदलले किती
वाळवंटात गगन, बेधुंद बरसले

येतो सुखाचा पाऊस, मनी प्रीतीचा अंकुर
समाधान दाही दिशी, चौफेर बहरले

~ रोहित

[* धनाक्षरी छंद: ८,८,८,७ अश्या अक्षरांची चार सयमक पदे, एकतिसावे म्हणजेच प्रत्येक पदाचे शेवटचे अक्षर गुरू]

(छंदवेडा)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment