Sunday, September 15, 2013

पान २०. प्रार्थना


प्रिय नैना,

अक्षरांची समान संख्या असलेले छंद खरेच सोपे आहेत.  वैकुंठ छंद म्हणून माधवरावांनी जो छंद सांगितला आहे तो ४ + ४ + ३ + ३ अश्या अक्षर संख्येचा  म्हणून वर्णन केलाय.  प्रत्येक अक्षर दीर्घ असल्यासारखे जोर देउन म्हटले तर अष्टाक्षरी प्रमाणेच हा पण छंद मस्त म्हणता येतो, and I am loving it. 

पण मी जे काही लिहितो ना ते मला खूप साधे वाटते. असे वाटते की आपण अलंकारिक लिहू शकत नाहीये.  कधी कधी तर असे वाटते की आपले शब्द इतके खुजे आहेत की ते रोहिणी चे वर्णन आणि मनातल्या भावना धड व्यक्त पण करू शकत नाहीयेत.  कुठेतरी वाचलं की आपल्याला आवडलेल्या कवितांमधे काय आवडलं याचा विचार करावा म्हणजे आपल्या विचारपद्धतीत पण बदल घडतो.  मला कोणकोणत्या कविता आवडतात याचा विचार नक्की करणार आहे मी.

वर सांगितलेल्या वैकुंठ छंदात माझी कविता ऐकणार आहेस ना?

वारा येतो तिचे गूज, सांगतो कानात
तिच्या सौंदर्याचा गंध, भिनतो मनात

दिसू नये कोणालाच, किती मी जपावे
डोळे चुगली करता, हळूच कळावे

तिला आवडेन का मी? वा टते उगाच
अनिश्चीत हुर हुर, दाटते लगेच

तिचा होकार असावा, जगणे फुलावे
माझ्या स्वप्निल झोक्याने, खुशीत झुलावे

तिच्या साठी पहिलीच, 'वैकुंठ' रचना
तिने माझेच बनावे, एकच प्रार्थना

छंदमय,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२६ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment