Thursday, October 15, 2015

पान ७३. गुड मार्निंग


प्रिय नैना,

माझ्या आयुष्यातला फुलपाखरांचा काळ सुरू झालेला आहे.  सकाळी सकाळी सगळ्यात पहिले फोनवर गुड मार्निंग मेसेज पाठवल्या शिवाय आणि तिचे आलेले उत्तर वाचल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही आजकाल.  या व्हाटसॅप मुळे असे वाटते की आपण दूर असूनही जोडलेले आहोत. 

आज सकाळी सकाळी उठल्यावर सहज (म्हणजे अगदीच सहज हा) मी तिच्या फेसबुक प्रोफाईल वर गेलो आणि पाहतो तर काय तिचा प्रोफाईल स्टेटस होता - कमिटेड.  वाव, हे तर मी पण अजून केलेले नव्हते.  काहीच न बोलता किती काय काय करून आणि बोलून जातात या मुली.  मी तिला विचारणार होतो की मी कमिटेड स्टेटस करू का?  आणि इथे तर आधीच आम्ही सगळे करून मोकळे.  पण हो मी कमिटेड आहे हे सांगायला खरेच समोरच्याला विचारायची गरज ती काय नाही का?  मूर्खच आहे मी.  आजपासून आपलाही फेसबुक स्टेटस - कमिटेड आहे गं.  मज्जा येतेय.

मेसेजेस मधे मी तिला वाढदिवस विचारला होता आणि तो २८ ऑक्टोबर ला आहे हे कळताच डोक्यात एकदम घंटा वाजली, अरे हा तर याच महिन्यात येतोय.  ढिंकाचिका म्हणजे आपल्याला रो.. चा वाढदिवस लवकरच साजरा करता येणार.  तुला सांगतो किती टेंशन आले आहे की इतक्या कमी दिवसात तिच्यासाठी काय काय करू आणि काय नाही असे झाले आहे.  अगं एकच आठवडा राहिला की गं. 

जाता जाता अजून एक, पान ३७ वर मी तुला ते गाई पाण्यावर कवितेच्या चालीवर कविता लिहिलेली दाखवली होती ना आणि तिचा छंद कोणता हे माहित नाही म्हटलो होतो, त्या छंदाची माहिती मिळाली बरं.  कुठे माहिताय का?  तुषार जोशी, या फेसबुक मित्राने एक poetry-study-group [१] नावाचा मेलींग लिस्ट गट सुरू केलाय.  तिथे कुणीही कवितेबद्दल तिच्या रचनेबद्दल वृत्तांबद्दल काहीही प्रश्न विचारू शकते आणि उत्तरे द्यायला अनेक जाणकार मंडळी त्या गटात आहेत.  तिथे प्रश्न विचारला काल आणि लगेच तिन चार उत्तरे आली की गं.  काय काय आयडिया काढतात लोक नाही.  तर मिळालेली माहिती अशी की.. त्या १९ मात्रांच्या कविता प्रकाराला दिंडी म्हणतात.

अनेक किर्तनकार आणि संगित नाटककारांना ही जाती प्रिय कविता प्रकार आहे. 

दिंडी = (९ मात्रा + १० मात्रा) = १९ मात्रा, शेवटी दोन गुरू अक्षरे

इंटरनेट क्लाऊड
(जाती: दिंडी)

काय किमया केलीय या ढगाने
धन्य झालो व्हाटसॅप मिळाल्याने
जोडलेले आहोत विना तार
जोडल्याची जाणीव खास फार

कधी वाटे स्माइलीच पाठवावा
आठवल्याचा आणखी पुरावा
रुसुन जावे त्या लाल स्माईलीने
तिने विनवावे फुलाच्या कळीने

हृदय माझं फुलपाखरूच झालं
दिवस जातो ढगात आजकाल
कालीदासाचा मेघदूत होता
स्मार्टफोन झाला दूत तिचा माझा


~ रोहित

(कमिटेड)
रोहित

[१] Poetry Study Group - http://groups.google.com/group/poetry-study-group

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१६ ऑक्टोबर २०१५, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com