Sunday, September 15, 2013

पान. २१ खुळ्यावानी


प्रिय नैना,

एखादा छंद मनात भीनला की साधे बोलणे सुद्धा छंदात लिहिता येउ लागते याचा प्रत्यय येतो आहे आता.  अष्टाक्षरी, म्हणजेच माधवरावांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास पादाकुलक छंद असाच मनात भीनत चाललाय माझ्या.  म्हणूनच का असेना पण अष्टाक्षरी लिहिली की मन भरत नाही.  असं वाटतं काही तरी राहूनच गेलं.  नवे काहीतरी हवे.   मग असे म्हणूनच आज सहा अक्षरांनी एक कविता सुरू केली, पण ती खट्याळ पणे आपलेच खरे करून गेली आणि अशी शब्दात उतरली बघ:

मानेवर गोदणं
तिचं रूप देखणं
तिला बनवले त्याने
आता काय मागणं

आवडूच लागली
मनामधे साचली
तिला पाहताच वाटू
लागली ती आपली

तिच वेडं लागलं
मन पार गुंतलं
खुळ्यावानी वागे आता
होतं आधी चांगलं

हो.  आता तिच्या शिवाय अजून काय शब्दात उतरणार आहे म्हणा.  पण तिचा उल्लेख आल्याबरोबर शब्द पण कसे टवकारून बघतात माझ्याकडे. चल आता सकाळी लिहिलेली अष्टाक्षरी पण दाखवूनच टाकतो तुला:

विचारांच्या पायऱ्यांनी
हळूच मनात आली
मनाला चहूबाजुंनी
आत पोखरू लागली

हिचे काय करू आता
परतून जात नाही
एका कामावर चित्त
माझे ठरू देत नाही

आता तूच धाव बाई
धाव बाई तूच आता
हाकलून लाव माझ्या
मनाची अनिश्चितता

एकदा हसून बघ
माझ्या मनातले राणी
सोनाक्षरांनी लिहेन
आपली गोड कहाणी


खुळ्यावानी,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२७ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment