Sunday, September 15, 2013

पान १७. पहिला पाउस


प्रिय नैना,

पावलो कोहेलो च्या 'द अर्केमिडिज' मधे वाचले होते की तुम्ही कशाची तरी उत्कटतेने कामना करायला लागता तेव्हा सारे जग तुम्हाला ते मिळावे यासाठी कट रचायला लागते, तसाच प्रत्यय आज आला.  मी ठरवत होतो की कविता अधिक छान कशी होइल हे शिकायचे.  भावनांसोबत कल्पना आणि तंत्र पण आत्मसात करायचे आणि आज माझ्या हातात डॉ. माधवराव पटवर्धन 'माधवज्युलियन' यांचं 'पद्यप्रकाश' पुस्तक पडलं.  कुणाकुणाला सांगू आणि किती किती नाचू असं झालं बघं.  एक कळलं ते पुस्तक चाळून की छंद म्हणजे 'अक्षरवृत्त' ज्या कवितेत प्रत्येक चरणात येणाऱ्या अक्षरांची संख्या सारखी असते, किंवा आलटून पालटून सारखी असते.  म्हणजे कविता लिहिताना प्रत्येक ओळीतली अक्षरे सारखी असली की त्याला छंद किंवा अक्षरवृत्त म्हणायचे.  अश्या कवितांना म्हणायची पण एक पद्धत असते जसे बहिणाबाईच्या ओव्या, प्रत्येक अक्षरावर जोर देउन म्हटल्या जातात.  त्यातल्या त्यात जो छंद ठेका घ्यायला सोपा पडतो तो म्हणजे 'पादाकुलक छंद' म्हणजेच ज्याला 'अष्टाक्षरी' पण म्हटले जाते.

तिला पाहुनिया किती
वेगे धडधडे जीव
दूर पळूनिया जाते
काळावेळाची जाणीव

तिचा छंद मनातून
काही केल्या जाईच ना
तिला पाहिल्या वाचून
मन वेडे राहीच ना

तिचे नाव लिहूनिया
किती वह्या संपविल्या
तिच्या हसण्याच्या छटा
लिहिताना आठवल्या

तिची आवड मनाला
वेड जगण्याचे देई
तिला आठवून माझे
जगणे सुंगंधी होई

नकळत तिचा झालो
तिच्या पाशीच थांबलो
तिचा विचार करता
कविता लिहू लागलो

(काव्यदेवतेला नमन करून माझी ही पहिली वहिली पद्य कविता)

माधवज्युलियन यांनी पद्याची एक छान व्याख्या दिलीय, ती अशी की जे पदांमधे तोडलेले असते, जे सम ठेक्याने आवर्तनातून व्यक्त होते ते पद्य.  या व्याख्येप्रमाणे माझी ही कविता नक्कीच पद्य कविता झाली ना गं.  हो म्हण.

आनंदित,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ फेब्रुवारी २०१२, ००:५१
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment