Thursday, October 24, 2013

पान ६४. किनारा


प्रिय नैना,

ज्या पत्राचे उत्तर काय येईल याची धाकधूक होती त्याचे उत्तर आले.  तिने काही प्रश्न उभे केले आहेत पण महत्वाचे हे की तिने नाही असे ठाम म्हटलेले नाही.  तिला मी आवडत नाही असेही तिने म्हटलेले नाही.  मी दिसायला तिला छान वाटतो असेही तिने म्हटले आहे. 

तिच्या एका प्रश्नामुळे मी अंतर्मुख झालो तो म्हणजे पाच मिनिटाच्या सकाळच्या पाहण्यावर तीचे मला आवडणे आधारित आहे असे तिचे म्हणणे.  मला एक मान्य आहे की मला सखी हवी आहे, पण मला दिवसातून दिसणाऱ्या मुली शंभर एक असतील.  त्यातून समोर सकाळी क्लास ला येणाऱ्याच पन्नास एक असतील.  त्यातून मला फक्त हिला पाहूनच का वेगळे वाटते याचे उत्तर खरेच माझ्याजवळ नाही ग नैना, तिला काय उत्तर देऊ?

त्या निर्मात्याने अंतर्मनात काय धागे विणून ठेवले आहेत कोण जाणे की समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींमधे माणसाला एखादीच आवडते, एखादीच अतिशय आवडते आणि ही आपल्यासाठीच जगात आली आहे असेही वाटते.  मग हे आवडणे दुकानातील ड्रेस आवडण्यासारखेच नाही का? असेलही पण त्यात वाईट ते काय असे मी म्हणतो.  तसे आवडणे असले तरीही आम्ही माणसे आहोत म्हणून त्या आवडण्याचे रूपांतर ओळखीत आणि मग प्रीतीत करायची निवड आपण करू शकतो ना.

मला तिला दुखवायचे पण नाही आणि तिला हवी तशी मैत्री पण करायची आहे, त्यामुळे फारच काळजीपूर्वक तिच्या पत्राला उत्तर द्यावे लागणार आहे.  ए पण तिच्या पत्रातून कळले की ती देवभक्त आहे म्हणजे आमच्या गणपती बाप्पा प्रेमाबरोबर तिची ही सवय पण जुळली म्हणायचे.  आता केव्हा तरी तिच्या बरोबर टेकडीच्या गणपतीला जायचे स्वप्न पाहायला मी मोकळा आहे.

खरे म्हणजे आयुष्य एखाद्या नौके प्रमाणे असते.  समोर जमीन दिसली की किनाला लागला असे वाटते आणि माणूस तिथे थांबतो, थांबल्यावर त्याला कधी कधी कळते की अरे हे तर बेट आहे हा आपला किनारा नाही मग पुन्हा त्याचा बोटीत प्रवास सुरू होतो, त्याचा किनारा शोधण्यासाठी.  समोर दिसेल त्या किनाऱ्यापाशी थांबले नाही तर त्याला तो त्याचा किनारा आहे की नाही हे कळणार कसे, त्यामुळे त्याला नव नव्या किनाऱ्यांवर थांबावेच लागणार ना.  त्याचा स्वतःचा किनारा मिळाला की मग त्याचा प्रवास संपणार.  कदाचित मैत्री करणे हे रोहिणीच्या पद्धतीने ती किनारा शोधते आहे असेच असेल नाही का.  मी तरी वेगळे काय करतोय, ज्याला मी ओळख करणे म्हणतोय तेच तिला मैत्री करून विचारांची देवाण घेवाण करून मग ठरवायचे आहे.  चला माझ्या आयुष्याची नौका एका किनाऱ्यावर तर पोचली आहेच, आता हा माझाच किनारा आहे का हे बघुया.

असो.

प्रशांत असनारे यांचा 'मीच माझा मोर' हा कवितासंग्रह मिळाला काल वाचायला आणि समजले की मुक्त कवितेमध्ये काय ताकत असते ते.  एक एक कविता वाचून मी अचंभित होत होतो.

किनारा
(मुक्त)

किनारा दिसतोय
आपलाच आहे
की वेगळेच बेट आहे
हे इथून कळणार नाही.

किनाऱ्याला बोट लावावीच लागेल
नंतर कळेल की
आयुष्याचा शोध संपला
की हे अजून एक विश्रांतीस्थळ झाले
प्रवास संपलेलाच नाही.

त्या विधात्याने
आयुष्याच्या सागरात आम्हाला
सोडून दिले आहे
आणि किनारा शोधण्याची ओढ टाकली हृदयात
आता गम्मत बघत असेल
कोण कधी किनाऱ्याला लागतोय याची

~ रोहित

(आशावादी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, October 21, 2013

पान ६३. मुक्तयमक


प्रिय नैना,

तो निर्णयाचा दिवस आलाच.  तिने मला मैत्री करायची का? असे विचारणारी मेल पाठवली आणि मी माझे मन मोकळे करून मनातले सगळे लिहिता झालो.  आता शून्याचा अनुभव घेतोय.  ती काय उत्तर देईल याची धाकधुक तर आहेच पण एक विश्वास पण आहे की आपल्याला वाटणारी ओढ एकतर्फी नाही, ती दोन्हीकडून आहे आणि त्यामुळे गोष्ट पुढे जाणार.  तसे नसते तर तिने मला इतकी संधीच दिली नसती. 

आता सुरू झाली वाट पाहण्याची बिकट वेळ.  तिचे उत्तर कधी येणार हे माहित नसल्याने आणि त्यावर आपला काहीच उपाय चालत नसल्याने येणारी विलक्षण अस्वस्थता आणि तगमग.  मी वेड्यासारखे तिला मेल केल्यावर फोनवर सुद्धा Replied to your mail please check असा संदेश पाठवलाच न राहवून.  पण आता खरेच वाट पहावी लागणार आहे. 

तिने नाही म्हटले तर?  पण या गोष्टीचा विचार मी आत्ता का करावा?  करूच नये.  आत्ता तर तिच्या होकाराला कसे साजरे करायचे हेच ठरवायला हवे.  नाही झाले तर जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊ हेच ठरवलेले खरे.  ती मेल ला अनुकूल उत्तर देइलच अशी खात्री ठेवायला काय हरकत आहे?  हे सगळे फारच पटापट घडत गेले आणि मी आता विचार करतोय की तिचे उत्तर आल्यावर आयुष्याला वेगळेच वळण मिळणार आहे.  आज झोप येईल असे वाटत नाही.  तिच्यावर एक कविता लिहावी जी मनात किती वेळापासून रूजी घालतेय.

तेव्हापासून
(छंद: मुक्तयमक)

तुला पाहिले तेव्हापासून
तू आवडतेस कळाले
तूच पाहिजेस जगण्यासाठी
सुंदर ध्येय मिळाले

तुझे हासणे म्हणजे अनुभव
शुभ्र चांदणे भुरभुर
तू नसताना तुझ्याच साठी
हृदयी माझ्या हुरहुर

जग हे सगळे 'तू' मय झाले
'मीपण' पसार झाले
प्रीत कळ्यांचे गंधित उपवन
मनात फुलून आले

अस्तित्वाने तुझ्या केवढी
बदलून गेली दुनिया
जगणे सुंदर झाले माझे
ही पण तुझीच किमया

~ रोहित

छंद मुक्तयमक
(याला मुक्तयमक म्हटलेय कारण या रचनेत चार ओळींचे कडवे आणि दुसऱ्या-चौथ्या ओळीत यमक इतकेच पाळलेले आहे.  अक्षरमर्यादा पाळलेली नाही, अर्थाप्रमाणे सैल शब्दांची मांडणी करताना अर्थाला हवे असतील तितके शब्द ओळीत येजले आहेत.)

(आशावादी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२२ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Thursday, October 17, 2013

पान ६२. गती


प्रिय नैना,

माझ्या आयुष्यातल्या घटनांच्या चक्राची गती अचानक जलद झाली असे दिसते आहे.  पहिला सुखद धक्का आज मिळाला ते तिचा एसेमेस (ढँन ट ढँन) आला.  Do you have a mail address, can I send you a mail? मी पटकन उत्तर दिले Yes Yes.  आणि माझा मेल एड्रेस तिला उत्तरात पाठवला. ती स्वतःहून हे सगळे करते आहे याचा मला खूपच अचंभा वाटत होता.  तिला पण काहीतरी वाटते हे सिद्ध करायला इतके पुरे नाही का?  याच एका कारणामुळे आजचा दिवस अगदी अगदी गतीमान दिवस झाला.

इमेल येणार आहे हे माहित असणे आणि त्याची वाट पहावी लागणे हे किती वेदनादायी काम असते गं.  त्या इमेल खात्याला रिफ्रेश करत मी किती वेळ घालवला असेल ठाऊक नाही.  शेवटी दुपार नंतर फोन मधे Please check my email  असा तिचा एसेमेस आला आणि मी येस येस म्हणत आहे तिथेच थोडेसे नाचून घेतले.  कधी एकदा ती मेल वाचतो आणि कधी नाही असे झाले होते.  त्या मेल मधे तिने मला तिच्याकडे एकटक न पाहण्याबद्दल सांगितले आहे.  तिच्या मैत्रीणी तिला त्यामुळे चिडवतात म्हणे, जळल्या मेल्या त्या मैत्रीणी.

माझ्या पाहण्याने तिला अॅकवर्ड वाटते आहे त्यामुळे तसे सगळ्यांना दिसेल अश्या प्रकाराने करायचे नाही असे ठरवले आहे.  तिला तिच्या इमेल ला उत्तर द्यायचे आहे.  नशिबाने मला असा कौल दिला की मी जे मागत होतो ते मला एका वेगळ्या पद्धतीने मिळालेच आहे. ती इमेल मधे मैत्री पुढे वाढवूया असे म्हणाली आहे.  याला म्हणतात मनासारखे होणे.  मी ठरवले आहे की आढेवेढे न घेता, जे मनात आहे ते सुरवातीलाच सांगून मोकळे व्हायचे आहे नाही तर उगाच पुन्हा अधांतरी ताटकळत राहणे होईल.  नशिबाने लिंबू दिले तर त्याचे लेमोनेड करावे असे म्हणतात तसेच करावे लागणार आहे.

आशा
(छंद: गजवदन)

तिने मागितली ०- मैत्री स्वतःहून
काय समजावे ०- अर्थ याच्यातून
माझ्या प्रमाणेच ०- तिला पण ओढ
तिच्या संमतीची ०- मिळाली ही जोड

मैत्री होते आधी ०- मग होते प्रीती
हीच माझी आशा ०- जगण्याच्या साठी
तिला सर्व काही ०- सांगायला हवे
सुरवातीलाच ०- मन खुले व्हावे

उगाचच नको ०- मागे राहीलेले
मनातले काही ०- फक्त साचलेले
तिला घेऊ द्यावा ०- हवा तो निर्णय
प्रेम केल्यावर ०- कशाचे हो भय

खूप आवडते ०- मनी ठसलेली
सांगणार तिला ०-  प्रीत मला झाली
मग थांबणार ०- उत्तराच्या साठी
होणार ती माझी ०- मनी आशा मोठी

~ रोहित

गजवदन छंद:
[ | प | - - S S S | प | - - ] १२ अक्षरे,
हा छंद शुद्धसती छंदाच्या द्विरावृत्तीने होतो.  या छंदातही शुद्धसतीप्रमाणेच दोन किंवा चार अक्षरांचे शब्द योजल्याने म्हणताना ठेका धरता येतो. 

(अचंभित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१८ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Wednesday, October 16, 2013

पान ६१. शुद्धसती


प्रिय नैना,

तिने माझा फोन नंबर मागितला म्हणजे का?  या एका प्रश्नाने माझी आता झोप उडालेली आहे. याचा अर्थ ती आता मला कधी एसेमेस करणार का?  की मला ती फोनच करणार?  ते जाऊ दे पण माझा फोन नंबर तिने जपून घेतला म्हणजे तिच्याही मनात काहीतरी आहे असेच धरायचे ना?  माझ्या मनात सध्या जसा तिचाच वावर आहे त्याच प्रमाणे आता तिच्या मोबाईल मधे माझा नंबर आहे हे किती सुखदायी सत्य आहे. 

काल नदीवर सगळे गप्पा करत असताना रोहिणी तिथले वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करत होती.  मला कळले कारण मी सतत तिच्याकडेच बघत होतो ना.  महत्वाचे म्हणजे तिला आपण दगड गोळा करतोय याला कोणी काय म्हणेय याची तिला पर्वापण नव्हती.  इतक्या निरागस पणे तिच्या मनातली छोटी मुलगी आपले अल्लडपण टिकवून आहे याचा मला प्रत्यय तिथे आला.  आपल्याला आवडणाऱ्या माणसाचे सगळेच आवडते, पण तिच्या या स्वच्छंदी बिनधास कृतीवर मी फिदा झालो ते तिच्या वेगळे पणा मुळे.  माझी इच्छा होती तिला विचारावे हे दगड कशासाठी?  पण नाही विचारले, कधी कधी फुलपाखराला हात लावायला गेले की ते उडून जाते तसेच मी विचारले की तिला उगाच खूप समजावत बसावे लागेल आणि त्याची मजाच जाईल असे वाटले तेव्हा.

क्लास मधे जाताना आणि बाहेर येतांना चार पाच मिनिटे पहायला मिळणे आणि एक अख्खा दिवस तिच्या कडे पाहायला मिळणे यात किती आभाळाएव्हढे अंतर आहे हे जाणवले काल.  काय दिसते यार, तिचे हसणे, तिच्या गालावर हसताना पडणारी हलकीच खळी, तिचे ते माझ्याकडे बोलता बोलता मधेच बघणे, काय काय आठवू...


पावती
(छंद: शुद्धसती)

अप्सराच जणू
धरेवर आली
माझ्या मनामधे
विराजित झाली

शेकहॅन्ड तिचा
मोरपीस भास
क्षण सारे आता
नशेतच खास

विचारणे माझा
फोन कशासाठी?
संमतीची तिच्या
पावतीच मोठी

आठवाने तिच्या
आनंदतं चित्त
जगणंच धुंद
तिच्यामुळे होतं

~ रोहित

छंद शुद्धसती:
[ प | - - ] ६ अक्षरे
(शक्यतोवर चार किंवा दोन अक्षरांची योजना केली की शुद्धसती जमते , शेवटी दोन अक्षरे यावीत असे बघावे लागते.  जीवनलहरी छंद पण सहा अक्षरांचाच आहे पण तो भृ - भृंगावर्तनी असल्यामुळे त्यात तिन, दोन, एक अश्या अक्षरांचे शब्द योजल्या जातात)

(आहे नशेत)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१७ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, October 15, 2013

पान ६०. एनकाऊंटर

प्रिय नैना,

आज सकाळी पाच वाजताच जाग आली.  आज सहलीचा दिवस होता ना.  सगळी तयारी करून जीव मुठीत धरून मी साडे सात पर्यंत क्लास च्या समोर पोचलो.  सगळे तिथे सहलीसाठी जमा होत होते.  रोहिणीला इतक्याजवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.  मी मधे मधे श्वास घ्यायचेही विसरत होतो कदाचित.

रोहिणीने बदामी कलर चा टिशर्ट टॉप घातलेला होता आणि जिन्स.  असे म्हणावे लागेल की तिच्यामुळे त्या ड्रेस ला सुंदरता प्राप्त झालेली होती.  आणि सर्वात कातील काही असेल तर तिने घातलेली फ्रेंच ब्रेड वेणी.  तिच्या अर्ध्या पाठीपर्यंत आलेली ती फ्रेंच ब्रेड वेणी म्हणजे आजचा कहर होता.  या वेणीमधे इतके सुंदर दिसणारी कोणतीच व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही. 

तिच्या डोळ्यात मला तिथे बघून आश्चर्य युक्त उत्सुकता दिसत होती.  बोलता बोलता ती माझ्याकडे पाहत होती.  बरेचदा असे झाले की मी तिच्याकडे बघतोय आणि तिचे माझ्याकडे बघणे व्हायचे आणि एका क्षणासाठी थांबल्यासारखे होऊन मला नजर कुठेतरी फिरवावी लागायची, कारण मी एकटक बघतोय असे वाटायला नको ना.  तेव्हा बरीच धांदल उडायची.

अंताक्षरी हा खेळ ज्या व्यक्तीने शोधून काढला त्याचे देऊळ बांधून तिथे रोज पूजा करायला मी तयार आहे.  या खेळात काय काय गाणी तिच्या कडे बघून म्हणता आली म्हणून सांगू.  ते अंताक्षरीचे बस मधले दोन तास म्हणजे आजचा सर्वोत्कृष्ठ उत्सव होता.  खूप मजा आली खूप चिडवणे खूप खोटोखोटे भांडणे, भेंड्या चढवणे आणि लटके रागावणे, रूसणे परत हसणे काय काय पहायला मिळाले अहाहा. 

सहलीच्या जागेवर पोचलो तेव्हा सामान नेताना आणि ठेवताना अचानक,
"तुम्ही समोरच्या बिल्डींग मधे राहता ना", प्रश्न आला, पाहतो तो बाजूला रोहिणी उभी होती, मी असा दचकलो की काही क्षण मला उत्तरच देता आले नाही
" हो हो, समोरच", असे काहीसे उत्तर मी नंतर दिले असावे. आणि त्यानंतर जे झाले ते मी कधीच विसरू शकत नाही.  रोहिणीने पटकन हात समोर केला, शेक हॅन्ड करण्यासाठी करतात तसा आणि माझा चेहरा तेव्हा असा काही झाला असेल की काय सांगू, मी तर तिला जवळून बघायचे स्वप्न घेऊन इथे आलेलो आणि ती सरळ शेक हॅन्ड करायला हात समोर करत होती.  मी शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला, तिचा नाजुक हात … शब्द नाहीत…  हातात घेऊन शेक हॅन्ड करताना माझ्या जीवाचे मोरपीस झाले होते.  त्या क्षणापासून मी कदाचित नशेतच आहे ती नशा किती दिवस पुरणारेय पुरतच राहणार आहे असे दिसतेय.

"मी, रोहिणी", शेक हॅन्ड करत ती म्हणाली, आणि यावर मी नुसताच हसलो. 
"तुम्ही काय करता, आय मीन शिकता की… " तिने प्रश्न विचारला.
सामानाची आवराआवर करता करता आमचे हे संभाषण सुरू होते ते फार साहजिक वाटत असेल पण माझ्या मनात जे गिटार वाजत होते ते मलाच माहित.
"नाही मी नोकरी करतो" माझे उत्तर संपेपर्यंत तिला मैत्रीणींमधे काही चर्चा सुरू झाली आणि ती त्यांच्याबरोबर गप्पांमधे लागली.  मी तो शेक हॅन्ड चा झालेला नाजुक वार जगत तिथे किती क्षण खिळलेला होतो कुणास ठाऊक.  यालाच कदाचित म्हणत असावेत की अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.

… आणि परतीच्या प्रवासात बसच्या मधल्या चालण्याच्या जागेच्या बाजुला असलेल्या दोन सीटांवर आम्ही बसलेलो.  म्हणजे अगदीच बाजूला बाजूला नाही म्हणता येणार पण मधले चालण्यासाठी ठेवलेले अंतर सोडले तर ती माझ्या बाजूलाच होती की.  एव्हाना खिडकी ची सीट पकडणारा मी तिला मधे बसलेले पाहून आपोआपच मधली सीट पकडलेली होती याचे मला मनातच हसू आले होते आणि मजा पण वाटली होती.  कुणाच्या प्रभावाने आयुष्य कसे बदलायला लागते याचा हा अनुभव होता.  सवयी देखील आणि आवडीदेखील बदलायला लागल्या की.

आजचा दिवस मी ठरवून तिच्याशी बोलायला आलो होतो पण तिनेच शेक हॅन्ड करून मला क्लीन बोल्ड केलेले आणि पुढे मी ठरवलेले सगळे विसरून गेलेलो.  त्यावर ती गुगली वर गुगली टाकतच होती, कारण तिने चालत्या बसमधे फोन हातात धरून मला विचारले, तुमचा फोन नंबर काय.  मी मनातल्या मनात उडालोच.  इतका बावचळलेलो होतो (मनात) की तिचा नंबर विचारायचाच राहून गेला.  माझा ती घेऊन गेली. 

It was nice time spent with you today, ती म्हणाली.  इंग्रजीचा आधार लोक का घेतात हे कळले आज.  सगळं म्हणायचं आणि काहीच म्हणायचं नाही.  खूप अर्थपूर्ण बोलायचं आणि तसे पाहता फारच साधे वाक्य बोलायचे.  (It was my pleasure वगैरे काहीतरी बोलायला जवे होते हे आता वाटते)  मी फक्त हसलो.  (मी चक्क लाजलो होतो, कदाचित, पण ते मला लपवता आले असावे)

नैना, नैना आज चा दिवस म्हणजे सुवर्णाक्षरात लिहायचा नव्हे तर प्लाटीनम च्या अक्षरात लिहायचा दिवस होता म्हणावे लागेल.  हा दिवस आता खूप दिवस पुरणार आहे, ही नशा साधी नाही.  जगणे खूप सुंदर आहे.  खूप सुंदर !!


जगणे
(छंद: पादाकुलक)

मागितले नाही तरी
आज कितीक मिळाले
मनातले स्वप्नपक्षी
उंच उंचच उडाले

अजूनही नशेत मी
मोठा आठवांचा ठेवा
किती दिवस पुरेल
गोड गोड खास मेवा

माझा आनंद अपार
मन दंगले सुखाने
माझे जगणे भरले
समाधानी सुगंधाने

~ रोहित

छंद पादाकुलक
[ | प | प ] ८ अक्षरे

(रोमांचित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१६ ऑक्टोबर २०१३, ०९:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, October 14, 2013

पान ५९. तयारी


प्रिय नैना,

उद्या रोहिणीच्या क्लास ची सहल जाणार आहे.  ठरल्याप्रमाणे सरांच्या मुलाने (जो आता माझा चांगला ओळखीचा झाला आहे) मला पण बरोबर यायला सांगितले आहे (म्हणजे त्याला व्यवस्थेमधे मदत होईल).  आज माझी उदयाची तयारी करताना किती धांदल उडतेय तुला काय माहित.

१) इस्त्री चे कपडे
२) जपून ठेवलेला डियो उद्या लावणार
३) अंताक्षरी वगैरे खेळ बस मधे झाले तर त्यासाठी र आणि ह ची गाणी मी एका यादीत आठवून ठेवली आहेत. (हीच अक्षरं खूप येतात ना)
४) उद्या दाढी साठी नवे ब्लेड आणून ठेवले आहे
५) दोन दिवस आधीच कटींग करून आलो आहे (म्हणजे लगेच केली असेही वाटणार नाही आणि नीट पण दिसेल)
६) कवितांची वही जवळ ठेवली आहे (मी आजकाल सगळ्या कविता एका वेगळ्या कवितांच्या वहीत लिहित जातो, आणि आता माज्याकडे ५० हून अधिक कविता आहेत माहिताय)
७) एका मित्राकडे जोक्स चे पुस्तक दिसले ते काही दिवस मागून आणले आहे, त्यातले बरेच जोक्स लक्षात ठेवले आहेत, जोक सांगणारा मुलगा लोकप्रिय असतो ना.

हे सगळे झाले तरी तिच्याशी काय बोलायचे, कसे बोलायचे हे समजत नाहीये आणि त्याचेच जाम टेंशन आलेले आहे.  ती मला भाव देईल ना?  खरे म्हणजे आतापर्य़त जे नजरा नजरांनी आमचे बघणे चालते त्याला अर्थ द्यायचा म्हटले तर आम्ही आधीच एकमेकांशी बोलायला तयार आहोत असे समजायला पाहिजे.  पण शेवटी प्रत्यक्ष बोलणे म्हणजे थोडेसे टेंशन येतेन ना गं?

घाई
(छंद: रक्षा)

तुला भेटण्याची आता मला झाली घाई
आवरून आवरणे थांबतच नाही
घड्याळाकडेच सदोदित डोळा जाई
किती झाली घाई

तुला साठवले रोज मनामध्ये किती
तुला बघताच केली डोळ्यांची आरती
पुरत नाहीत तुझ्या आठवांचे मोती
ओढ भेटी साठी

नशिबाने झोळीत हा दिवस टाकला
तुला भेटण्याचा छान घाट हा घातला
ठरवून जरी आज खेळ हा मांडला
आवडावा तुला

मनापासून केलेले जमेल जमेल
गोड अनुभव भेट आपली ठरेल
अविस्मरणीय दिस आजचा बनेल
मैत्री उमलेलं

~ रोहित

रक्षा छंद: विषम छंद
[ | प | प - - ] १४ अक्षरे
[ | प | - - ] ६ अक्षरे

(उत्साहित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ ऑक्टोबर २०१३, ०७:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५८. गया

प्रिय नैना,

एकमेकांना पूरक ठरणे हे अधिक आनंददायी असते, हो ना गं?  मी राकट दांडगा आणि ती नाजुक सुंदर,  आमच्यात काहीही सारखे नाही पण मला तिची ओढ वाटते कारण ती मला पूरक आणि मी तिला पूरक होऊ शकतो.  शक्ती आणि सौंदर्यांचा असा मेळ पूरक असल्यानेच आनंद देत असावा.

मागे मी 'रामरसायन' छंदाबद्दल लिहिले होते ना, त्यात सात/सात/आठ/सात असे चरण योजावे लागतात आणि ती तिसरी आठ अक्षरांची ओळ सुद्धा त्या छंदाला पूरक ठरते असे वाटते.  त्याच ओळीमुळे ती कविता लोकगीताच्या चालीत गाता येते असे मला वाटते.

हा 'गया' छंद त्याच धरतीचा आहे.  सहा/सहा/आठ/सहा असे चरण योजले की हा छंद साधता येतो.  [छंदोरचना, पान ५३८]


नवे आयुष्य
(छंद: गया)

तुझी भेट घ्यावी
ओळख करावी
तीव्र इच्छा सोबतीने
धुंद गाणी गावी

आता लवकर
तुझ्या बरोबर
घालवाया एक दिस
मला मिळणार

तुला आवडावे
इच्छा मनोभावे
तुला आनंद देईल
असेच घडावे

नवीन क्षणांची
नवीन युगाची
सुरवात व्हावी तिथे
नव्या आयुष्याची

~ रोहित

गया छंद:
[ | प | - - ] दोन वा अधिक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण

(छंदोमयी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१4 ऑक्टोबर २०१३, ०७:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Wednesday, October 9, 2013

पान ५७. उत्संग


प्रिय नैना,

रोहिणी च्या क्लास ची सहल जाणार आहे आणि त्या सहलीला मी पण जाणार आहे हे नक्की झाले आहे.  क्लास च्या सरांच्या मुलाशी माझी छान मैत्री झाली आहे आणि बोलता बोलता क्लास ला जाणाऱ्या सहलीला सहायक म्हणून तो मला पण बरोबर घेऊन जाणार बोलला. हा मला मिळालेला नशिबाचा कौल मानावाच लागेल.

सहलीला जाऊन मी काय करेन, तिच्याशी कशी ओळख करेन, तिला काय सांगेन या सर्व गोष्टी मी ऐन वेळ या एकाच कल्पनेवर सोडल्या आहेत.  मला काय रायचे हे ठाऊक आहे त्यामुळे जशी जशी संधी येईल, जशी जशी वेळ येईल त्यातून मी ते ठरवत जाईन असे ठरले आहे.  आज उगाच हैदय धडधडते आहे.  एका मोठ्या मिशन ची सुरवात होत असल्यासारखी.

एकाच वर्गात असणाऱ्या मुला मुलींचे छान असते त्यांना ओळख करावी लागत नाही, आमचे ओळख करण्यापासूनचे वांदे आहेत.  एक मात्र माझ्या बाबतीत अधिक चांगले आहे की मला छोटी का होईना नोकरी आहे.  कधी तिच्यावर खर्च करावा लागलाच तर आई बाबांना मागावा लागणार नाहीये. असो.

विषम छंद म्हणजेच ज्या छंदात ओळींची लांबी वेगवेगळी असते अश्या दोन हून अधीक ओळी असतात.  पण आवर्तने त्या छंदांमधेही असतातच तेच त्या छंदाला अधिक नादमय करते.  मागे पान ३८ वर हठयोग नावाने एक छंद बोललो होतो, गडकऱ्यांनी तो विषम छंदातच लिहिला आहे.  छंदोरचना पुस्तकात पान ५४१ मधे विषम छंदांच्या यादीत 'उत्संग' नावाचा छंद सांगितला आहे. 

[ | प | - - ] एक चरण
[ | प | प | - - ] एक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण

या पद्धतीने पदे लिहित गेलो की हा छंद होतो.

(छंद: उत्संग)

तिचा छंद माझ्या
मनामध्ये नादत राहतो
आनंदाचा
झरा तिच्या मुळेच वाहतो

एकटाच होतो
आता तिचा विचार सोबती
आली आली
आयुष्याला निराळीच गती

रम्य स्वप्न माझे
तिचे माझे व्हावे एक घर
आयुष्याचे
भावगीत बनावे सुंदर

~ रोहित

(उत्साहित)
रोहित

उत्संग छंद:
[ | प | - - ] एक चरण
[ | प | प | - - ] एक चरण
[ | प | प | प | - - ] एक चरण (दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक छान वाटते)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१० ऑक्टोबर २०१३, ०८:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, October 8, 2013

पान ५६. अनुष्टुभ

प्रिय नैना,

रामरक्षा म्हणताना "अनुष्टुभ छंद: सीता शक्ती" हे प्रत्येक वेळा म्हणावे लागते.  आज जेव्हा या छंदाबद्दल अधिक माहिती वाचली तेव्हा "अनुष्टुभ छंद:" म्हणजे काय हे कळले.  बरीचशी रामरक्षा अनुष्टुभ छंदात लिहिलेली आहे.  हा छंद तसा पहावा तर अक्षरांचे काही भागात बंधन पाळत नाही, तर काही भागात लघु गुरू मात्रांचेपण बंधन पाळतो.  गम्मतच आहे आणि असा पद्यबंध का तयार झाला असेल याचा मी विचार करत होतो.

कदाचित आधीच्या काळात जेव्हा मुद्रण नव्हते तेव्हा मुखोद्गत करूनच काव्य आणि ज्ञान पुढच्या पिढीला मिळायचे, गुरू त्यांना पाठ असलेले ज्ञान शिष्यांना पाठ करवून द्यायचे.  अनुष्टुभ छंदाला म्हणायची एक खास पद्धत आहे आणि त्यामुळे तो पाठ करायला आणि म्हणायला सोपा होतो हे त्याला वाचून कळते.  आपण रामरक्षा ज्या चालीत म्हणतो तीच चाल या छंदात लिहिलेल्या रचनेला लागते.

आता आताच्या काळात "भारत एकात्मता स्तोत्रम्" या अनुष्टुभ छंदातच लिहिलेले आहे त्याचे उदाहरण बघ:

अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं मह्त
इन्द्रप्रस्थं सोमनाथ: तथाSमृतसर: प्रियम

या छंदात लिहिलेल्या पद्याला यमकाची गरजच राहत नसते.  यमक नसूनही ते म्हणताना अडचण येत नाही, अशी एक लय त्या छंदात आहे.

या छंदाची रचना अशी होते

| प | ॅ + + +
| प | ॅ + ॅ  +
| प | ॅ + + +
| प | ॅ + ॅ  +

म्हणजेच प्रत्येक ओळीत पहिली चार अक्षरे कशीही चालतात पण दुसऱ्या चार अक्षरांना ठराविक बंधन असते.  पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत लगागागा म्हणजेच फक्त पाचवे अक्षर लघु आणि उतरलेली तीन गुरू असतात.  दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत लगालगा म्हणजेच पाचवे आणि सातवे अक्षर लघु आणि सहावे आणि आठवे अक्षर गुरू  असे असते.

या छंदात काही तरी लिहून पहायचा आज प्रयत्न केला मी.  काय मांडायचे आहे ते मला माहितच होते.  मला माहित असलेली यशाची त्रीसूत्री सांगायची होती.  आता ते मांडायला लिहिताना काही गोष्टी पाळायच्या होत्या आणि सोपी पद्धत होती ते रामक्षेच्या चालीत म्हणता म्हणता ते लिहित जाणे.  काही तरी जमले आहे बघ तुला कसे वाटते ते.

त्रीसूत्री
(छंद: अनुष्टुभ)

निश्चित ध्येय शोधावे
गोंधळात असू नये
ध्येय मिळायच्या आधी
स्वस्थ काही बसू नये

तीव्र इच्छा हवी जेव्हा
ध्येय प्राप्त करायचे
इच्छेवीण कुणाला ना
काही येथे मिळायचे

अतोनात प्रयत्नांनी
नित्य साधेल कामही
यशाची हिच त्रीसूत्री
ध्येय इच्छा प्रयत्नही

~ रोहित

(अभ्यासू)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०७ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५५. श्यामाराणी

प्रिय नैना,

रोमँटिक किंवा ज्यांना फर्स्ट लव सिनेमे म्हणता येईल असे पहायला खूप आवडतात त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या सिनेमांमधे एक तरून नायक असतो आणि एक गोजिरी नायिका असते.  नायकाचे नायिकेवर अतोनात प्रेम असते, नायिकेचे सुद्धा नायकावर तितकेच अतोनात प्रम जडते, त्यांना बऱ्याच अडचणी येतात पण शेवटी त्या दोघांचे स्वप्न पूर्ण होते.

असा चित्रपण पाहता पाहता लगेच स्वतःला नायकाच्या रूपात कल्पना करणे आणि नायिकेचा होकार मिळवून प्रणयाराधन करणे किती छान वाटते.  या चित्रपटातून अजून एक आशा मिळते की आपण ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम करतो ती शेवटी आपल्याला मिळतेच, की ती व्यक्ती कधी आपल्याला नाही म्हणूच शकत नाही.  ही आशा हवी हवीशी असते आणि त्यामुळेच तो चित्रपट मनात राहतो.

माझ्या सिनेमाची नैना, तू सध्या एकमात्र प्रेक्षक आहेस आणि माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक कुठल्यातरी ढगात बसून अॅक्शन म्हणतोय आणि पटकथा पण मला देत नाहीये.  स्वतःची पटकथा स्वतःच लिहायची आणि मग ती वठवायची यात केवढी रिस्क आहे नाही का गं?

आपल्या चित्रपटाचा शेवट गोडच व्हावा ही तीव्र इच्छा आहे.  नायक नायिकेवर अतोनात प्रेम करतो आहे आता माझ्या कहाणीत काही टर्न हवा आहे, काही अजून हवे आहे गं?  एक घुमाव चाहिये, एक सॉलिड वळण हवे आहे. 

कविता
(छंद: श्यामाराणी)

तुझं पाहणं सुंदर
तुझं स्मरणं सुंदर
किती चांदणं सुंदर
झाला चकोर धुंद

कृष्ण वेणूची तू  धून
जाते काळीज वेढून
जग कामे विसरून
रंगले तुझ्यामधे

जसा अवखळ झरा
तुझा चेहरा हसरा
रोगी होणारच बरा
पाहता क्षणामधे

~ रोहित

(छंद: [ | प | प ] दोन व अधिक चरण, [ | प | प | प | - - - ] एक चरण, बरेचदा (आठ, आठ, आठ, सात) अश्या चार ओळी लिहिल्या की या छंदात बसतात.  हे रामरसायन (रोहिणी) छंदाच्याच पद्धतीने एक ओळ वेगळी असा छंद आहे.  आधीच्या कवींनी या छंदात कडवी लिहिताना पहिल्या तीन ओळीत यमक पाळलेले दिसते.  पान ३६ मधे वर्णन केलेले धनाक्षरी किंवा कवित्त छंद याच श्यामाराणी छंदातल्या चार कडव्यांना योजून आणि अजून काही बंधन पाळून करण्यात येते.)

(उत्सुक)
रोहित

माहित असलेली श्यामाराणी मधली काही उदाहरणे:

आम्ही जाणावे ते काअी
तुझे वर्म कोण्या ठायी
अन्तपार नाही नाही
अैसे श्रुती बोलती

(संत ज्ञानेश्वर)

राम आकाशी पाताळी
राम नांदे भूमंडळी
रामयोगीयांचे मेळी
सर्व काळ तिष्ठत

(संत रामदास)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०४ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ५४. या पावसाने

प्रिय नैना,

भुर भुर पाऊस पडत होता.  कौलारू घरे, इमारतींच्या भिंती ओल्या होऊन तृप्त होत होत्या.  छोटे छोटे थेंब आपापली एक विशेष जागा घेऊन ऐटीने जगाकडे पाहत होते.  काही पानांवर बसले होते, काही गाड्यांच्या काचांवर, काही सायकलींच्या हॅंडील वर बसून जग पाहत होते.

नेहमी कोरडे राहणारे रस्ते, पाण्याच्या नवीनच जन्माला आलेल्या लोटांना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळू देत होते.  या सगळ्या रम्य वातावरणार मी वाट पाहत होतो माझ्या स्वप्नाची.  ती केव्हा क्लास ला येईल याची.  तिने जेव्हा रेनकोट बाहेर काढून ठेवला आणि माझ्याकडे पाहिले तेव्हा…

काही भाग्यवान जलबिंदू तिच्या गालांवर बसलेले.  काही जलबिंदू तिच्या केसात मोती माळावेत तसे सजलेले, तर काही जलबिंदू तिच्या ओठांवर.  असा नयमरम्य सोहळा या पावसामुळे मला आज साजरा करता आला त्यासाठी मी पावसाचे कसे आभार मानू हेच कळत नाहीये.

या सगळ्यात माझ्याकडे पाहून तिने डोक्याला एक असा कातिल झटका दिला ज्यांने तिचे केस थोड्यावेळासाठी विशिष्ट लयीत हलले आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागी स्थिर झाले, याला म्हणतात अदा.  असो..

या पावसाने
(मुक्त)

या पावसाने दिला
एक नयनरम्य सोहळा
तिच्या गालावर सजलेल्या
पारदर्शक रूपेरी मोत्यांचा

या पावसाने दिले
एक नवे स्वप्न
गालावरच्या अनमोल मोत्यांना
जवळून डोळाभर बघायचे

या पावसाने दिले
सुंदर चैतन्यमयी चित्र
मनात खोलवर साठवायला
क्षणोक्षणी आठवायला

या पानसाने दिली
तिची अजून एक अदा
हलकेच केस झटकण्याची
माझ्याकडे पुन्हा बघण्याची

~ रोहित

(मुक्त म्हटले तरीही कवितेच्या कडव्यात चार ओळी असण्याची पद्धत आपोआपच पाळली गेली आहे.  मुक्त म्हटले कारण यमकाचेही आयोजन करावेसे वाटले नाही.  माझा अनुभव कसाही करून मला काही शब्दात मांडून ठेवायचा होता जसे चित्रकार त्याला दिसणाऱ्या रंगांना जमेल त्या हुबेहुब रंगात टिपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि ते चित्र त्याच्यासाठी त्या क्षणांची आठवण ठरते.  ही कविता माझ्यासाठी या पावसाची आठवण आहे)


(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०४ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Friday, September 20, 2013

पान ५३. फुगा फुटला


प्रिय नैना,

पान २१ आणि पान ३३ वर मी एका छंदाबद्दल लिहिले आहे.  मला वाटले होते की असा छंद अजून कोणी लिहिलेलाच नाही.  त्या छंदाला मी त्याच आनंदात 'रोहिणी छंद' हे नाव पण दिलेले, तुला आठवतच असेल.

या छंदात लिहिणारा पहिला कवी मीच म्हणजे एकदम आद्य कवी वगैरे नाही का.  किती मस्त वाटले होते, हे का सांगतोय की आमचा फुगा फुटला ना आज.  माधवराव पटवर्धनांच्या छंदोरचना पुस्तकात पान क्रमांक. ५३६ वर 'रामरसायन' छंदाचे वर्णन केले आहे ते असे.

रामरसायन छंद (अर्धसम छंद)
[ | प - - - ] दोन वा अधिक चरण - ७ अक्षरे
[ | प | प | प | - - - ] एक चरण - १५ अक्षरे

अगं हे तेच झाले की गं.  सात / सात / आठ / सात फक्त शेवटच्या दोन ओळी एकात लिहिल्यात इथे म्हणून तर घात झाला ना माझा.  पण मी ज्या छंदाला रोहिणी छंद म्हणालो होतो तो 'रामरसायन' छंद निघाला आणि काय.

या छंदात अगदी श्रीधरस्वामींनी रचना केलेली उदाहरण आहेत:

क्षीरसिंन्धुवासी रे
लक्ष्मी त्याची दासी रे
अर्जुनाची घोडी धूता
लाज नाही त्यासी रे

(~ श्रीधरस्वामी)

आणि आता माझी याच छंदातली कविता पुन्हा वाच:

मनी तिचा विचार
पुन्हा पुन्हा येणार
सुगंधले सारे आता
एकटाले प्रहर

कौल मिळे वार्‍याचा
कौल मिळे काळाचा
तिच्या मनी तेच आहे
विश्वास या मनाचा

तिचा संग मिळू दे
प्रार्थना ही फळू दे
विठू तुझा दास मागे
मनातले घडू दे

तिला हसू देईन
तिचा सखा होईन
आयुष्याच्या प्रवासात
सोबतीला राहीन

~ रोहित

हे असले तरीही या छंदाला आम्ही रोहिणी छंद याच नावाने ओळखणार बुवा.  असो

Criminal Law (Amendment) Act, 2013 अंतर्गत भारताने कायद्यात एक स्टाकिंग नावाचे कलम जोडले आहे 354D त्याच्याप्रमाणे कोणत्याही मुलीचा पाठलाग करणे, भेटण्याचा प्रयत्न करणे आणि मुलीच्या मनाविरूद्ध तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे, आणि इंटरनेट किंवा फोनवर तिला त्रास देणारे मेसेज पाठवणे आणि तिला ती घाबरेल इतके भंडावून सोडणे हा दखलपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे.  या गुन्ह्यासाठी १ ते ३ वर्ष कारावास अशी शिक्षा सांगण्यात आली आहे.

हे नुतनीकरण निर्भया कांडानंतर आपल्या कायद्यात करण्यात आले अशी माहिती मिळाली आंतर्जालावर.  मी रोहिणीच्या घराचा पत्ता काढायचे ठरवले होते पण आता हे वाचून असे काहीही करणे बरोबर नाही हे लक्षात आले आहे.  एक सुजाण नागरिक म्हणून आपण कायद्याचे पालन केलेच पाहिजे नाही का.  आपली आधी मैत्री झाली पाहिजे, त्यात कुठेही भीती नको, आणि मग हळू हळू आपले मनातले तिला सांगता येईल हेच बरोबर.

(जागरूक)
रोहित

संदर्भ:
१) Criminal Law (Amendment) Act, 2013 Wikipedia page

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२१ सप्टेंबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Thursday, September 19, 2013

पान ५२. अधरस्पर्ष


प्रिय नैना,

आज रोहिणीचे नाव पानाच्या मध्ये लिहिले आणि अचानक इतके प्रेम वाटले की हळुच त्या नावाला अधरस्पर्ष केला.  त्या एका छोट्याश्या कृतीमुळे सरसरून शहारा आला अंगावर.  असे वाटले की पुन्हा पुन्हा तसेच करावे पण मग आवरले स्वतःला.

सतत टिव्ही आणि सिनेमांमधे अधरस्पर्षाचे सीन असतात त्याचे लहान माझ्या मनावर काय परिणाम होत असतील काय सांगू?  सतत वाटते की आपण कधी असे अधरस्पर्ष करणार?  काही वर्ष आधी मला खूप प्रश्न पडायचे आणि उत्तरे माहित नव्हती.  गम्मत सांगू का गल्लीतल्या एका दादाने मला सांगितले होते की अधरस्पर्ष झाला की बाळ होते, ते किती तरी दिवस माझ्या मनात होते :)

मला खरेतर या बाबतील बाबांशी बोलायचे होते पण कधी धीरच झाला नाही, त्यापेक्षा गल्लीतले दादा लोक जे काय आडून किंवा गमतीने बोलतात त्यानेच जे काय शिकायला मिळाले ते शिकत आलोय.  आता इतके सिनेमे आणि कादंबऱ्या वाचून झालेय की आता कुणाशी बोलायची गरजच राहीली नाही.  पण खरे सांगू मला बाबांशीच या विषयावर बोलायला आवडले असते.  फक्त हा विषय त्यांनी काढायला हवा म्हणजेच मला हे कळेल की या विषयांवर बोललेले त्यांना चालते, आणि त्याने ते माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघणार नाही याची खात्री होईल.

'दुर्जोय दत्ता' नावाच्या लेखकाची इंग्रजी कादंबरी वाचली तेव्हा, त्यातली वर्णने वाचताना हुरळायला होते.  ती पुस्तके वाचली की त्यात अनेक रसभरित वर्णने वाचायला मिळतात, कदाचित त्यामुळे सुद्धा ती पुस्तके वाचायला आवडत असतील की अजून काही माहिती मिळतेय का. 

एक मात्र नक्की की दिवास्वप्नात सुद्धा मी रोहिणीला प्रत्यक्ष अधरस्पर्ष करतोय असे बघणार नाही.  हो म्हणजे तसे मी अनेक जणींबरोबर दिवास्वप्नात केले आहे, पण रोहिणी बद्दल काहीतरी मंगल वगैरे वाटते गं, असे वाटते की तिच्या मनाविरूद्ध स्वप्नातही काही होऊ नये.  ती जेव्हा तिच्या संमतीने असे काही करेल ना तेव्हा ते किती सुखदायी असेल याची कल्पना करूनच सध्या हुरळून घेतो. असो.

कितीतरी माहिती पुस्तकातून मिळते आणि त्यामुळे पुस्तके ही माझ्या गुरूस्थानी आहेत.  असे कितीतरी गुरू या पुस्तकांमुळे लाभलेत मला.  या पुस्तकांमुळेच तर माधवराव पटवर्धन माझे गुरू झाले ना गं.  त्यांच्याकाळात त्यांनी जे छंदांवर काम करून ठेवले त्याचा अभ्यास करून मला आनंद मिळवता येतोय ते फक्त पुस्तकांमुळे. 

दैवत
(छंद: परिलीना)

अंधारात वाट दावते झाले
अनुभव खूप घेऊनी आले
दिवस असोवा असूदे रात्र
सदैव गप्पांस तयार मित्र

कामीच पडले मिळाले ज्याला
यशाच्या पदरी आणले त्याला
भेदभाव यास जमत नाही
ज्ञान द्याया सदा तत्पर राही

इतिहास याने जतन केले
पूर्वज यालाच सांगून गेले
वंदन विद्वान करती रोज
दैवत आमुचे पुस्तक राज

~ रोहित

(छंद [ भृ | भृ | भृ | - - ] अक्षरे ११, सहसा आपल्या बऱ्याच आरत्या २२ मात्रांच्या असतात.  ११ अक्षरांचा छंद आणि छंदात एका अक्षराच्या दोन मात्रा धरतात त्यामुळे हा छंद २२ मात्रांचा होतो आणि या छंदातली रचना आरतीच्या चालीत सहज म्हणता येते)

(पुलकित)
रोहित

परिलीना छंदातली माहितीतिल उदाहरणे:

अैसा गे माय S कैसा हा योगी
जे ठायी जन्मला ते ठाय भोगी
आचार सांडोनी झालासे भ्रष्ट
मावशीसी जेणे लाविला पाट
(~ संत ज्ञानेश्वर)

विषण्ण दृष्टीने देखत उभा
विराट वड हा राहिला उभा
(~ कुसुमाग्रज)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२० सप्टेंबर २०१३, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Wednesday, September 18, 2013

पान ५१. आकर्षण


प्रिय नैना,

आपल्याला रोहिणीबद्दल जे काही वाटते ते प्रेम आहे की नुसते आकर्षण हा विचार मनात येताच मी खूप घाबरलो माहिताय नैना.  कोणत्यातरी वर्तमान पत्रात लेख वाचला की तरूणांना प्रेम वाटते ते फक्त आकर्षण असते.

तुला खरंच सांगतो आपल्याला जे प्रेम वाटते त्याला कोणी आकर्षण आहे असे म्हटले तर शिवी दिल्यासारखे वाटते.  पण मला एक सांग आकर्षण इतके वाईट आहे का गं?  मला वाटते आकर्षण असले तर त्यात हरकत काय? नाही का.  जिथे आकर्षण पण नसेल तिथे प्रेम कसे उत्पन्न होऊ शकते नाही का?  असू दे की आकर्षण, पण हे जे काही आहे ना ते फक्त आकर्षण नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.

तिच्यासाठी काहीतरी करावेसे वाटणे.  तिला जगातले सगळे आनंद मिळून तिच्या चेहऱ्यावर हसू पहावेसे वाटणे याला पण आकर्षण म्हणायचे का ग?  तिने माझ्यावर प्रेम करावे ही इच्छा आहेच पण ते कळायच्या ही आधी मलाच तिच्याबद्दल इतके वाटू लागले आहे की असे वाटते तिच्या मनात काय आहे याचा फरक पडणारच नाहीये.  मी तिच्यावर प्रेम करू लागलोय.  हो एक आहे की मला सतत तिच्या जवळपास असायला आवडेल.  आयुष्यभर हिच्या सोबत जगायला आवडेल आणि त्यासाथी मी काहीही करायला तयार आहे.   हे असे वाटणे सुद्धा आकर्षण आहे का गं? 

हे आकर्षण नाही.  हे प्रेमच आहे.  ही भावना मनात निर्माण झाल्यापासून मी बदलू लागलोय.  मी अधिक सहनशील झालोय, मी खोल विचार करू लागलोय असे मलाच वाटू लागलेय.  हे खूप छान होतेय.  मला खूप आवडतेय.

कृपा
(छंद: आंदोलन)

स्वप्नामधली, सुंदर परी
एकदा माझ्या, समोर आली
विश्वास माझा, पार बसेना
केवढी कृपा, आजही झाली

दिस फुलले, जग खुलले
सुंदर झाले, जगणे माझे
क्षणाक्षणात, तिचा आठव
क्षण सजले, सगळे माझे

तिला पाहता, जीव जडला
मला कळले, शोध संपला
तिला सांगणे, तिला जिंकणे
तिला मागणे, निर्धार झाला

~ रोहित

(छंद आंदोलन [ | प | - S S S S | प | - ] अक्षरे १०, या छंदात पाचव्या अक्षरावर स्वाभाविक यती येतो हे या छंदाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल)

(आनंदित)
रोहित

आंदोलन छंदात माहीतीत असलेली कविता:

ताई गुणाची -० माझी छकुली
झोका दे दादा -० म्हणू लागली
साम्भाळ ताई -० फांदी वाकली
दोन्ही दोरांना -० गच्च आवळी
जो जो गे जो जो -० जो जो गे जो जो

(कवी: दत्त)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१९ सप्टेंबर २०१३, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, September 17, 2013

पान ५०. भवबंध


प्रिय नैना,

मला तिच्याबद्दल इतके का वाटते?  तुला सांगू कितीतरी मुली पाहिल्या पण हिला पाहताना मनात जी चलबिचल झाली ती वेगळीच होती.  कसे ना, काही लोकांना पाहिल्यावर आपल्याला कोणताही विचार न करता माहितच असते की आपल्याला हे आवडतात.  अगदी तसेच झाले बघ, हिला पाहिले ना तेव्हा हृदयात कुठेतरी माहितच होते की ही आपल्याला आवडते.

खरे म्हणजे आता ही का आवडते हा विचार केल्यावर अनेक गोष्टी सुचतात, पण मूळ कारण हिला पाहताक्षणी मनात माहितच असणे की ही आपल्याला आवडते हे आहे.  याचे मला आश्चर्य पण वाटते आणि कुतुहल देखील.  कुणालातरी जन्माची साथीदारीण बनवायचेच आहे ना मग जी मनापासून आवडते तिला विचारणे अधिक बरे, हो ना?  असे वाटते की हिच्यासाठी आपण काही पण करून जाऊ.  माझ्यात काही गुण आहेत काही दोष असतील, हिच्यातही गुण आणि दोषही असतील पण हा प्रश्न गुणदोषांचा नाहीच मुळी.  ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्यांना गुणदोषात मोजायचेच नसते.  त्यांच्यावर आपले प्रेम आहे हीच भावना त्यांना आहे तसे स्वीकारायला पुरेशी असते.

रोहिणीच्या क्लासची सहल जाते दर वर्षी असे कळले काल.  क्लास च्या सरांचा मुलगा माझ्याच एवढा आहे, मला ओळखतो देखील, त्याच्याशी मैत्री वाढवावी ही युक्ती सुचली काल.  तिच्याशी बोलणे हे ध्येय असले तरीही त्या दिशेने जे जे मार्ग जातील त्यांना पडताळून पाहणे ही चांगली सुरवात आहे.  हे सगळे कसे सुचले यावर मला इतकेच वाटते की आपली इच्छा तीव्र असली की मार्ग सुचतात. 

भवबंध
(छंद: देवीवर)

मन - गुंतले तुझ्यात
सुख - आले आयुष्यात
राधे - तुला पाहताना
रोज - भारावतो कान्हा

प्रेम - उत्कट हळवे
जग - सुंदर जाणवे
याव्या - तिच्या मनी आता
माझ्या - विचारांच्या लाटा

स्वप्न - सोबत जगावे
दोघे - एकरूप व्हावे
एक - व्हावे ध्येय छंद
असा - जुळो भवबंध

तिला - सुखी करायचे
तिची - चिंता हरायचे
आता - इतकेच ठावे
देवा - इतकेच द्यावे

~ रोहित

(छंद: देवीवर [ - - ! प | - - ] अक्षरे ८, दुसऱ्या अक्षरानंतर यती)

देवीवर छंद, तसा आहे तर अष्टाक्षरीचाच प्रकार पण सुरवातीला दोन अक्षरी शब्द अनिवार्य अशी अट यती च्या मुळे तयार झाल्याने स्पष्ट पणे वेगळा छंद समजून घेता येतो. 

(युक्तीबाज)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१८ सप्टेंबर २०१३, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, September 16, 2013

पान ४९. पतीतपावन


प्रिय नैना,

दोन दिवसांचा विरह झाल्यावर सखी पुन्हा दिसली की कसे वाटते हे मी तुला शब्दात कसे सांगू नैना.  तू तशीच समजून घे.

काल पेपर मधे वाचले की प्रेम हे देशातल्या क्रूर गुन्ह्यांचे सर्वाधिक मोठे कारण आहे. म्हणे की प्रेमी मुले, मुलगी हो म्हणाली नाही की, लगेच ती कुणालाच न मिळो म्हणून तिच्यावर आम्ल फेकतात किंवा तिला जिवे मारण्याची कृत्ये करतात.  याला प्रेम कसे म्हणायचे गं.  ही तर शिकार झाली.  मला शिकार मिळाली नाही, म्हणून कुणालाच मिळू नये म्हणून कृत्ये करायची, अमानुष व्हायचे हे प्रेम कसे होऊ शकते.  ही तर पाशवी वृत्ती झाली.  याला ते लोक प्रेम म्हणत असले तरीही हे प्रेम होऊच शकत नाही.  जर प्रेम करताना तुम्ही अधिक देवभक्त नाही झालात अधिक नम्र आणि अधिक दयाळू नाही झालात तर तुम्ही प्रेमातच नाही.

एका पवीत्र नात्याला मालकी हक्काची वस्तू म्हणून बघणे म्हणजे प्रेम कसे होऊ शकते.  मला तिच्या बद्दल खूप प्रेम वाटू लागले आहे पण कोणत्याही कारणाने तिला इजा करणे हे मला कधीच मान्य होणार नाही.  फक्त तिला काही झाले असेल या काळजीने जिथे मी हैराण होतो तिथे मीच तिला काही करणे हे कल्पनातीत वाटते.  या सगळ्या बातम्या वाचून घृणा वाटते अश्या लोकांची.  ते प्रेम नाहीच जे दाखवून ही अमानवी लोक आपल्याच प्रीय व्यक्तीला त्रास देतात.

मला पण चिंता आहे की रोहिणी ने मला नाही म्हटले तर काय होईल.  पण मी त्याला माझा दैवयोग समजेन, तिची चूक कधीच नाही.  ती एक स्त्री आहे आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे जितका मला.  माझी इतकीच प्रार्थना आहे की तिला माझ्याबद्दल तेच वाटत असो जे मला तिच्याबद्दल वाटते आहे.  तीव्र इच्छा करत राहणे हे माझ्या हातात आहे आणि सगळे चांगले होईल असा विचार करत राहणे हीच माझी आशा.


आशिर्वाद
(छंद: पतीतपावन)

विरहाच्या, रात्री जसा, चंद्र फुलला
सखी दिसली परत, जीव हसला
आनंदी आनंद झाला, नुरली चिंता
तिचे हसणे बघणे, रोजचे आता

देवा माझ्या, प्रार्थनेला, ऐकलेस तू
आनलास, परतून, वसंत ऋतू
तुझे आशिर्वाद राहू, दे असेच रे
तुझ्या पायी, लीन आम्ही, तुझी लेकरे

तिला भेटायचे आहे, युक्ती काढून
मागायचे आहे सारे, तिला सांगून
तूच योग घडवला, सांभाळ तूच
तिला पण आवडू दे, फक्त रे मीच

~ रोहित

(छंद: पतीतपावन [ | प | प  | प  | - ] अक्षरे १३)

(आशावान)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१७ सप्टेंबर २०१३, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Sunday, September 15, 2013

पान ४८. व्याकुळ


प्रिय नैना,

ती आजही क्लास ला आली नाही.  आता मला चिंता वाटू लागलेली आहे. खरे म्हणजे एक दिवसच झाला तिला पाहिले नाही. तशी रवीवारी पण क्लास नसल्याने ती येत नाही पण तेव्हा चिंता वाटत नाही, पण नेहमीच्या दिवसाला ती आली नाही आणि क्लास झाला की चिंता वाटणे साहजिक आहे ना गं? 

हे वर्ष संपले की तिचवा हा क्लास पण संपणार हे काल दिवसभर डोक्यात येत होते आणि मला पायाखालची जमीन सरकते आहे असे वाटत होते.  या वर्षात परीक्षा संपायच्या आधी तिला भेटावे लागणार तिला सांगावेच लागणार नाही तर आपले प्रेम आपली स्वप्ने सगळी कापरासारखी उडून जातील अशी भीती वाटते आहे आता.

उद्या ती नक्की नक्की आलीच पाहिजे.  आता असे वाटू लागले आहे की तिचे घर आफल्याला माहित असते तर एकदा घरावरून चक्कर मारून आलो असतो.  ती आली नाही की असे असे विचार येतात बघ मनात की जीव हैराण होतो.  येईल ना गं ती उद्या?

प्रार्थना
(छंद: दिशा)

आली ना का?, अजूनी, सखी माझी
विरहाची, केव्हढी, जड ओझी
थकलो मी, पाहूनी, वाट आता
जात नाही, क्षण ही, वेळ जाता

बरी आहे, घरी की, ताप आला?
घोर चिंता, लागली, या जिवाला
एक माझी, प्रार्थना, ऐक देवा
सुखरूप, ठेव हा, प्रीत ठेवा

क्लास ला ती, येऊ दे, लवकर
जीव माझा, जडला, तिच्यावर
तिचे येणे, दिवाळी, दसरा गं
विनवितो, व्याकुळ, अनुराग

~ रोहित

(छंद: दिशा [ | प | - - - S S | प ] अक्षरे ११)

(व्याकुळ)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१६ सप्टेंबर २०१३, ०६:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४७. हट बुवा


प्रिय नैना,

आज रोहिणी क्लास ला आलीच नाही. हट बुवा.

ए नैना आज एक विलक्षण गोष्ट घडली.  मला वाटलेच नव्हते असे कधी घडू शकते पण मला आज जो अनुभव आला आहे ना तो विलक्षण आहे.  असे वाटले कोणीतरी माझ्यात शिरले होते आणि मला लिहायला भाग पाडत होते.  लिहून झाल्यावर मला ते वाचून वाटले हे मी लिहिलेय? कसे काय?  पण लिहिलेय खरे.

हो हो सांगतो. सविस्तर सांगतो.  'न लिहिलेली पत्रे' या फेसबुकच्या पानावर आज 'स्वाती ठुबे" यांचे एक पत्र वाचत होतो.  काळाच्या ओघात हरवलेल्या मैत्रीनीला त्यांनी पत्र लिहिले होते.  तो प्रसंग मनात उभा करताना असे काही झाले की असे वाटले आपलीच जुनी मैत्रीण हरवली आहे आणि आपणच तिच्यासाठी व्याकुळ आहोत.  त्यांचे पत्र वाचल्यावर ती संवेदना अशी काही मनात शिरली की मी आपोआपच काहीतरी लिहून काढले.  लिहून झाल्यावर वाचले तर एक कविता लिहिलेली.  माझि नाही त्यांची कविता झाली ती.  कसे घडले का घडले माझ्यासाठी पण नवलच आहे पण आपण मनाला भिडणारी संवेदना अशीपण व्यक्त करू शकतो अशी स्वतःचीच वेगळी ओळख झाली आज.  गोपिनाथ तळवलकरांनी वापरलेला छंद अजून मनातून काही गेलेला नाही त्यामुळे त्याच छंदात ती कविता उतरली असे झाले असावे. 

आज मी म्हणू शकतो की ही कविता लिहिणाऱ्या रोहित ला मी ओळखतच नाही.  हा आज पहिल्यांदा भेटलेला रोहित आहे.  ती कविता तर बघ:

+

हरवलेल्या सखीस
(छंद: गोपिनाथ)

बारा वर्षे झाली ना गं
कुठे हरवली बाई
सखी सापडत नाही

रागावली माझ्यावर
पाहिले मी जागोजाग
एकटी राहते का गं?

सुचेना काहीच आज
तुझी आठवण अशी
काल भेट व्हावी तशी

सारे भांडणे हसणे
धिंगाणा आठवते मी
एकटीच हसते मी

माझी आठवण तुला
कधी येत नाही का गं?
मला एकदाच सांग.

मनातले सांगू कुणा
तुला सांगावे वाटते
पण तूच नाही इथे

जिथे असशील तिथे
आनंदात रहा बाई
भेटण्याचे मन होई

~ रोहित

(छंद: तीन ओळींचे आठाक्षरी काव्य. यामध्ये दुस-या आणि तिस-या चरणात यमक असतो. १९६० साली गोपीनाथ तळवलकर ह्यांची याच छंदातली एक कविता पाठ्य पुस्तकात अभ्यासाला होती - संदर्भ चिंचोरे सरांची पोस्ट)

असो, पण आज रोहिणी क्लास ला का आली नसेल? हट बुवा.

(अनोळखी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१४ सप्टेंबर २०१३, ०१:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४६. अधिर


प्रिय नैना,

आज सकाळी ति क्लास जा जाताना दिसली तेव्हा हसत होती.  मला वाटले मला बघूनच हसली असेल, तसे समजायला मला किती आवडेल आणि असा समजही मन प्रसन्न करतो. दिसली म्हणजे त्यासाठी आस्मादिक तयार होऊन वाट पाहत होते ना, तो कार्यक्रम घडला नाही तर दिवस कसा जाणार आमचा नाही का?  तिचे ते हसणे मनात साठवून ठेवले म्हणजे दिवस कसा सोन्यासारखा जातो.  तिला पण आता माहित आहे की क्लास मधे शिरायच्या आधी मी एकदा दिसणार म्हणून ती माझा अंदाज घेत असणार.  हो घेतच असणार. 

एकदा मी तिला न दिसताच लपुन ती मला शोधते का ते पाहणार आहे.  एकदा नक्कीच पाहणार आहे.  वा काय मस्त आयडिया आली नाही.  :)

आता हिच्याशी बोलायचे कसे.  आपले मन हिच्यासमोर खोलायचे कसे हाच विचार करण्यात पूर्ण दिवस निघून जातो  मला फक्त एक हवी तशी संधी हवीय.  कधी मिळेल देव जाणे.  असो.

चिंचोरे सरांच्या एका कवितेच्या पोस्टमधे त्यांची एक कविता वाचली आज.  त्यांनी खाली एका नव्या छंदाची माहिती दिली आहे आणि तो अक्षरछंद असल्याने आमचे लक्ष तिकडे न गेले तर नवलच नाही का?  मग काय अजिबात उशिर न करता आम्ही ही कविता लिहिते झालोत.  बघ कशी वाटते ते:

अधिर
(छंद: गोपिनाथ)

मनाच्या किनाऱ्यावर
तिच्या विचारांची लाट
मन चिंब चिंब होतं

हिच्या मध्ये अडकेन
कधी ठरवले नाही
हिने घात केला बाई

आता फक्त एक ध्यास
नको कोणीच दुसरे
हीच हवी हेच खरे

असा हट्ट करण्याचे
जीवा खूळ लागलेले
हृदयही हरवले

तिने घेतले हृदय
तिला ठाऊकच नाही
मला सांगायची घाई

देवा काही तरी कर
तिला कळू दे आपच
चित्त अधिर फारच

~ रोहित

(छंद: तीन ओळींचे आठाक्षरी काव्य. यामध्ये दुस-या आणि तिस-या चरणात यमक असतो. १९६० साली गोपीनाथ तळवलकर ह्यांची याच छंदातली एक कविता पाठ्य पुस्तकात अभ्यासाला होती - संदर्भ चिंचोरे सरांची पोस्ट)

(अधिर)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१२ सप्टेंबर २०१३, १५:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४५. प्रेमजीवन


प्रिय नैना,

काल एक वेगळेच झाले.  उद्विग्न अवस्थेत विचार करताना 'आदर्श' ही कविता लिहून गेलो आणि ती मनाच्या अवस्थेवर होती.  ती कविता रोहिणी वर लिहिलेली नव्हती हे जरा वेगळे झाले.  आपले मनोव्यापार आता मला पद्यात व्यक्त करायला जमू लागले आहे असे दिसते.  ही एक नवी सुरवातच म्हणायची नाही का?  मी कवी व्हायला लागलोय का गं?  पण आपण स्वतःला इतक्यात कवी समजायला नकोच नाहीतर लोक म्हणतील की झाला हा लगेच अर्ध्या हळकुंडाने पिवळा.

एक मात्र खरे की छंदांची माहिती मिळवून ते समजून घेतल्याने इतर कवींनी वेळोवेळी जो खजिना लिहून ठेवलाय त्यातले हिरे माणके ओळखायला खूप मदत होते.  कविता वाचताना तिचा छंद पण समजला की अधीकच आनंद होतो.  कवी अनिलांनी 'मुक्तछंद' नावाचा एक छंद काढला असे वाचले.  त्यात ते यमक वापरतच नाहीत आणि तरीही ओळींमधे ताल आणि लय वापरून कविता लिहितात. 

सहा, पाच अश्या अक्षरांचे गट वापरतात आणि त्यांना चरणक म्हणतात.  अश्या प्रत्येक चरणकाला म्हणताना सुरवातीच्या अक्षरावर आघात देऊन म्हणायचे असे मुक्तछंद छंदातली कविता म्हणायचे तंत्र पण त्यांनी सांगितलेले आहे.  त्यामची भग्नमंदिर आणि प्रेम आणि जीवन ही कविता याच त्यांच्या 'मुक्तछंद' छंदात आहे आणि त्यांनीच त्याचे नाव 'प्रेमजीवन' ठेवावे असे सुचवले आहे.

साधासुधा
(छंद: प्रेमजीवन)

कधी कधी वाटे, धावत जावे
रोहिणीला सर्व, यावे सांगून
माझा जीव तुझ्या, मधे गुंतला
देह भान गेले, हरपून गं
माझ्या कडे बघ, विचार कर
साधा सुधा एक, आहे मुलगा
नोकरी करतो, साधी सुधीशी
स्वप्न खूप तरी, उंच पाहतो
तुझ्या बरोबर, जगण्यासाठी
सुख तुझ्या डोळी, बघण्यासाठी
खूप करावेसे, वाटते त्याला

दिसलीस तेव्हा, पासूनच गं
तुझ्या प्रेमामधे, सहज आलो
तुझाच विचार, करता करता
इतके दिवस, जगत आलो
घाई नाही मला, असे नाही गं
तरीही पुरेसा, विचार कर
माझ्या बाबतीत, विचार जिथे
कोणीही माहिती, सांगेल तुला
दिसतोच आहे, सतत तुला
तसे तुला काही, नवीन नाही
तरीही ठरव, उत्तर तुझे
वाट पाहीन मी, अधिर इथे

~ रोहित

नैना, खरे सांगतो की अंत्ययमक लिहायची अशी खोड लागली आहे ना की यमक लिहायचे नाहीये असे म्हटल्यावर लगेच यमकाचा शब्द घेऊन त्याच्यातच पुढची ओळ लिहायची गरज उरत नाही पण यमक लिहिणाऱ्याला ते कठीण जाते.  मला सारखे यमक लिहावेसे वाटत होते, पण मी ठरवले की यमक नसले तर अधिक सयुक्तिक भावना कश्याने व्यक्त होते ते बघुया.  आता माझा प्रमजीवन मुक्तछंद काहीतरीच झाला असणार पण आपण काहीतरी नवे केले याचे नक्की समाधान आहे.

(छंद: प्रेमजीवन, सहा,पाच अक्षरे, यमक सहज साधले तर अनिवार्य नाही, कडव्याचे बंधन नाही)


(साधासुधा)
रोहित

संदर्भ:
प्रेमजीवन छंद - चिरयौवन - कवी अनिलांच्या निवडक कवितांचा संग्रह आणि त्याच्यातरी परिशिष्ठे(आवृत्ती - १९७१, सुविचार प्रकाशन, मिळण्याचे स्थान- वा. वि. मिराशी सार्वजनिक वाचनालय, विदर्भ साहोत्य संघ, नागपूर)

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०९ सप्टेंबर २०१३, ०८:१०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४४. उद्विग्न


प्रिय नैना,

फार उद्विग्न आहे आज.  आपण ज्या आदर्शांना समोर ठेवून जगायला जातो तेच कोणत्यातरी प्रकरणात गुंतलेले दिसतात, स्कॅम करतात आणि आपल्याच पायाखालची जमीन निसटते.  ज्या देशात राहतो त्या देशात काय चाललेय हे पाहून राग येतोच, पण ते चूक आहे वाईट आहे हे कळूनही ते ठिक करायला आपण काही करू शकत नाही याचा संताप अधिक तीव्र आहे गं.

निलेश पंडीत यांची एक मार्मिक कविता वाचली आज फेसबुकवर आणि विचार अधिकच खोल वर त्रास देत गेला.  आता कुणाला आदर्श मानायला पण मन धजावत नाही,  कोण जाणे कोणत्या दिवशी त्या व्यक्तीबद्दल काही उघडकीस यायचे आणि आपली अवस्था परत त्रीशंकू सारखी व्हायची.

ती कविता बघ:

दर्प

छाती डोक्यावर गोळी
यापूर्वी या ही काळी
झेलून थोर ते सुटले
प्रेतासम नंतर उरले
… धड मूढ समाजाचे
… निष्प्राण भविष्याचे

आंधळ्या मतीचा वेग
निर्बुद्धा दे संवेग
राक्षसी घोर थैमान
घालण्या सिद्ध अभिमान
… मग प्रगती फोल ठरे
… अज्ञाना हारतुरे

विषमता रुजे फोफावे
नीचां - कुटिलांचे फावे
मुंगुसा मारतो सर्प
जगण्यास विषाचा दर्प
… पण डोळे बंद करा
… कानांवर हात धरा

या पुन्हा गाउ या गाणी
विटलेली जुनी पुराणी
स्मरु या सोन्याचा धूर
फुगवूया पोकळ ऊर
… जातील दिवस हे ही
… कसलीच तमा नाही !

- निलेश पंडित

या कवितेचा साचा सुद्धा वेगवान आहे, ही उद्विग्नता व्यक्त करायला हा साचा अधिकच फिट्ट बसणारा वाटतोय.  आपण रोज आपल्याच घामाचे, आपणच टॅक्स च्या स्वरूपात भरलेले पैसे असे खाल्ले गेलेले वाचतोय, रोज कोणी ना कोणी आपल्याला राजरोस लुबाडतोय आणि आपण काहीच करत नाहीये.  याहून लाचार लाजिरवाणी गोष्ट ती काय असणार.  छे!

या अशा घाणेरड्या जगात आपण सुखाची, रोहिणीबरोबर एकत्र संसार थाटायची स्वप्न पाहायची तरी कशी असे सतत वाटतेय आज.  आपल्या प्रिय व्यक्तीला, आपल्या पुढच्या पिढ्यांना जर सुरक्षित आणि समृद्ध आयुष्य मिळणार नसेल तर या देशात राहण्याचा काय उपयोग?  पण करणार तरी काय?  इथे जन्माला आलोय तेव्हा इथेच खितपत पडावे लागणार आहे!  डोक्याचा पार भुगा झालाय गं.

आदर्श
(छंद: देवद्वार)

आदर्श मिळेना
काहीच कळेना
जमीन ठरेना
पायाखाली

जावे कुठे आता
जग वैरी होता
रोज नव्या बाता
साहवे ना

सहन करतो
रोज मी मरतो
लाचार ठरतो
पदोपदी

मला हवा न्याय
एखादा उपाय
जग कसे काय
सावरू मी?

~ रोहित

(छंद देवद्वार, ६,६,६,४ अक्षरे, पहिल्या तीन ओळीत यमक)

(उद्विग्न)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०७ सप्टेंबर २०१३, ००:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४३. झटका


प्रिय नैना,

तू माझी डायरी आहेस.  तुला काही सांगतो तेव्हा असं वाटतं मन हलकं होतं आहे.  तू आता माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाली आहेस.  रात्री झोपायच्या आधी तुला दिवसातले सगळे सांगणे हा एक उत्सव झाला आहे.

आज एक विचित्र विचार मनात आला.  असे वाटले की आपण जे वेड्यासारखे तिचा विचार करतो, तिचे स्वप्न पाहतो, त्यात आपण कुठेतरी तिला गृहित धरतो असे होत नाहीये का?  आपले मॅड सायको मुलासारखे तर होत नाहीये?  जेव्हा तिला निर्णय घ्यायची वेळ येईल आणि तिने जर 'नाही' असा निर्णय घेतला तर आपण स्वतःला सावरू शकू का?  आपण स्वतःला आणि तिला सुद्धा त्रास तर देणार नाही?

हे विचार खूप त्रासदायक होते आणि असे विचार करून नयेत असे मनातून कुठेतरी वाटते पण नेमके वाईटच विचार मनात येतात आणि त्यावर आपला काहीच निर्णय चालत नाही.  संध्याकाळी परतणारी व्यक्ती जर वेळेवर आली नाही तर कसे काहीतरी बरेवाईट झाले असल्याची पाल चुकचुकतेच मनात तसेच, तिचा निर्णय काय असेल? तिला आपण सांगू शकू का?  ती हो म्हणेल का?  तिला मी आवडेन का?  हे उत्तरे माहित नसलेलेच प्रश्ण सतत छळताहेत सध्या. 

मला सध्याचा आपण तिच्यावर प्रेम करू लागलोय हाच काळ भविष्यापेक्षा बरा वाटू लागला आहे.  या काळात ती माझी होईल ही आशा आहे.  आशा आहे.  भविष्यात ती जो निर्णय घेईल तो एबसोल्यूट असणार त्यात एकतर सुख किंवा दुःख असे एकच काही तरी वाट्याला येणार असे आहे त्यामुळे आताचा काळ अधिक बरा वाटतो.

मला ती कविता प्रकर्षाने आठवते आहे जी 'टल्ली' नावाच्या एका कवीने काही वर्ष आधी ऑरकुट वर प्रकाशित केली होती. त्या कवितेत तो सर्वात शेवटी जे वाक्य लिहितो ते मनास चटका लावून जाते.  'कच्चू' हे त्या कवितेचे नाव होते.  तो लिहितो…


कच्चू कुठे आणि कधी गेली कळलंच नाही...
खरंच गेली ?
बरंच झालं....
नाहीतर तीही मोठी झाली असती.
…(टल्ली)

काय लिहून गेलाय कवी.  … नाहीतर तीही मोठी झाली असती… मला पण येणाऱ्या भविष्याची अशीच भीती वाटते.  तिने नाही म्हटले तर आपले स्वप्न धूळीला मिळेल.  ती हो म्हणेल ही आशा किती सुखदायी आहे.

निर्णय
(छंद: पादाकुलक)

तुझा होकार मिळेल
किंवा नकार मिळेल
भविष्याचा प्रश्न मला
असा रोजच छळेल

तुझ्या होकाराची आशा
सुखी करे वर्तमान
भविष्यात ना कळते
काय ठेवले लिहून?

तरी सुखाला सोडून
मला पुढे जाणे भाग
तुझ्या निर्णया वरती
माझे आधारले जग

~ रोहित

(छंद: पादाकुलक, अष्टाक्षरी [ |प |प ] ८ अक्षरे )

(चिंतामग्न)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०५ सप्टेंबर २०१३, ००:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४२. अनुभव


प्रिय नैना,

आज काय सांगू नैना माझे काय झाले असेल?  आज माझे रोहिणी शी बोलणे झाले.  म्हणजे तसे सगळे बोलतात तसेच व्यवहारिक बोलणे ते.  पण माझ्या मनात तिचे वेगळेच स्थान असलेने मला तो अनुभव खूपच मुग्ध करणारा होता.  पूर्ण वेळ असे वाटत होते की तिने बोलत रहावे मी ऐकत रहावे.  बोलणे संपूच नये.  वेळ अशीच रहावी, काळ थांबून जावा. 

बोलताना तिची एक बट तिच्या कपाळावर खेळत होती, आणि माझे सतत लक्ष त्या खट्याळ बटेकडे जात होते.  बोलणे संपवून ती गेल्यावरही मी काही काळ स्तब्ध राहून निर्विचार झालेलो होतो.  आपण आता थोड्या वेळा आधी जे अनुभवले आहे त्यावर विश्वासच बसत नव्हता.  आज मला झोपच येणार नाही बहुतेक.  पुन्हा पुन्हा त्याच क्षणांच्या आठवणी येत राहतील.  मी काही फारच साधे व्यावहारिक शब्द तिच्याशी बोललो पण तेही आता आठवताना किती प्रेमळ वाटताहेत.

आजची तारीख मी कधी विसरणार नाही.  खरे म्हणजे आजपासून ही तारीख पण साजरी करावी असे वाटते आहे.  पहिला पाऊस पहिली आठवण सारखे पहिले बोलणे.. अहा. (साधेच का असेना).  मी खूप आनंदात आहे.

तुझा ध्यास
(छंद: पद्म)

गोड गोड
तुझे भास
दिस जाई
खास खास

कसे सांगू
तुला प्रेम?
तुझा झाला
रोम रोम

तुझ्या विण
नसे काही
तूच माझे
जग बाई

तुझा ध्यास
जाग येता
स्वप्न तुझे
रात्र होता

व्हावी भेट
आता तरी
मन रोज
हट्ट करी

~ रोहित

(छंद पद्म, [ | प ] ४ अक्षरे )

(आनंदित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०४ सप्टेंबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४१. जीवनलहरी


प्रिय नैना,

आपला जीवनसाथी कसा असावा याचा मी कधी विचारच केलेला नव्हता.  रोहिणी ला पाहिले तेव्हा त्या जीवन साथी ची व्याख्या तिनेच तिच्या रूपाने माझ्या मनात केली.  मला तिने केलेले सगळेच आवडते.  तिचे हसणे, तिचे रूसणे, तिचे नाक उडवणे, जे जे दिसते ते छानच दिसते.  मला माहित आहे की कोणीच परफेक्ट नसते, हिच्यातही काही मला न आवडणाऱ्या गोष्टी असतील, पण जे आहे तेच इतके लाघवी आहे की त्यालाच परफेक्ट म्हणायचा मोह होतो. 

ही आयुष्यात आल्यापासून जगणं खूप ठरवून जगायचं ठरलं आहे.  जे आयुष्य हिच्या सोबत जगायचे स्वप्न मी बघतोय ते छान समृद्ध आणि मन लावून घडवलेलं असावं हे मला समजलंय.  कुणी येण्याच्या आधी जसे आपण घर आवरतो सजवतो तसेच हिच्या येण्याच्या आधी मला आयुष्य आवरून सावरून सजवून थेवायचे आहे.  असो.

कुसुमाग्रजांच्या 'आगगाडी आणि जमीन' या कवितेची एक खासियत आहे, तिची लय.  आणि ही लय तिला मिळते तिन तिन अक्षरांच्या मुळे.  सहा सहा अक्षरांची एक ओळ आणि तिन तिन अक्षरांचा खेळ.  असे तिन तिन अक्षरात लिहिणे ही पण एक अनोखी मजा आहे हे मला कळले आज जेव्हा मी माझी ही कविता लिहिली.

कविता सुचली
(छंद: जीवनलहरी)

मुलगी सुंदर
देखणी सोज्वळ
जिवाला लागली
ओढ ही वेल्हाळ

लाघवी मोहक
हसते हसते
स्वप्नात येऊन
छळते छळते

मधेच वळून
वळून बघते
हळवे हृदय
घायाळ करते

मनात जाऊन
बसली बसली
विचार करता
कविता सुचली

~ रोहित

(विचारमग्न)
रोहित

(छंद: जीवनलहरी, [ | भृ | भृ ] अक्षरे ६ )

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०२ सप्टेंबर २०१३, ०६:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ४०. सलोना सा


प्रिय नैना,

रेडियो वर आताच गाणं लागलं होतं 'सलोना सा सजन है, और मै हूँ' आणि ते गाणं संपेपर्यंत मी मंत्रमुग्ध झालो होतो.  या गाण्याचा जो अर्थ आज मनाला जाऊन भिडलाय ना गं, उफ! कुणी मनात जाऊन बसलेलं असेल, कुणी हृदयाला काबीज करून बसलेलं असेल की मग सगळं जगच त्याच्यासाठी बदलून जातं हेच खरं.

कसं ना तुमचं सगळं जगच एका व्यक्तीच्या भोवती फिरायला लागतं की तुम्हाला त्याच आनंदात रहायला आवडतं.  एक गोष्ट मला आज प्रकर्षाने जाणवली की फक्त कुणी मनात जाऊन बसलं तरीही जग सुंदर वाटायला लागतं.  अजून तिला माहितच नाही तरी माझं जग बदलून गेलेलंय, काय कमाल आहे या प्रकृतीची की कालपर्यंत एकटं वाटतं असं म्हणणारा रोहित आज एकटाच उरलेला नाही, तो आनंदात आहे आणि जग जिंकायची स्वप्न बघू लागलाय.  हे सगळं का तर तिच्यावर जीव जडला बस इतकंच.

आठवण
(मुक्त)

सलोना सा सजन है
रेडियो वर वाजत असावं
आशा बाईंच्या आवाजाची जादू
कणाकणावर पसरत जावी
आणि मनात
तुझा चेहरा अलगद उमलावा
चुराए चैन रातों को जगाए
या शब्दात शबीब अब्बास साहेबांनी
भावनांना तरल हळवे फुलवावे
तुझ्या अस्तित्वाचा सुगंध
स्वरास्वरातून झिरपत जावा
माझी संध्याकाळ
शब्द सूर आणि आठवणींचे चांदणे
पडून बहरून यावी.
बस्स..
सलोना सा सजन है और मै हूँ

~ रोहित

(नादमुग्ध)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०१ सप्टेंबर २०१३, २३:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३९. नामस्मरण


प्रिय नैना,

माझ्या जवळच्या काही मित्रांना तिच्याबद्दल सांगावे असे काही वेळा वाटले.  तसे सांगितले तर त्यातही एक आनंद आहे आणि तो म्हणजे, माझ्याही पेक्षा अधिक वेळा तेच तिचा उल्लेख करून मला भांडावून सोडतील.  मला चिडवतील.  आणि मला ते चिडवणेही आवडेल यात शंकाच नाही, कारण तिचा उल्लेखच मन प्रसन्न करतो.

तरीही मी प्रयत्नपूर्बक ही गोष्ट माझ्या मनातली गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली आह.  अगदी 'शाळा' सिनेमात जोशी ने ठेवली होती तश्शीच, आणि मनातल्या मनात मी पण ती माझ्याकडे 'शिरोडकर' सारखीच बघायला लागेल असे गृहित धरतोय.  सिनेमात दाखवलेले सगळे खरेच असते किंवा होतेच असे वाटणे किती बावळटपणाचे आहे नाही.  पण ते मानायची इच्छा होते या वेळेस.

एक गम्मत सांगू मला तिचे नाव लिहायचा छंदच लागलाय.  कितीतरी पानांवर मी फक्त तिचे नाव लिहून त्याच्याकडे पाहण्यात वेळ कसा संपला कळलेच नाही बरेचदा.

नाव
(छंद: नामस्मरण)

तिचे नाव लिहिताना
तिचा भास होत राही
कितीदा लिहिले तरी
मन भरतच नाही
लिहितो पुन्हा
पाहतो पुन्हा
मुग्ध मी पुन्हा
लिहिण्यात दिस जाई

तिच्या नावा सोबतच
स्वतःचे नाव लिहावे
दोन नावांच्या जोडीला
मनभरून पहावे
किती सुंदर
स्वप्नविभोर
हे खरोखर
नाव जोडीने दिसावे

~ रोहित

(नामलेखक)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
३१ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३८. हठयोग


प्रिय नैना,

आशिकी - २ पाहिला आणि सहजच नायिकेच्या ऐवजी रोहिणी ला पाहायला लागलो.  सिनेमातले अतूट प्रेम पाहिले ना की आपणही असेच अतूट प्रेम करावे असे मनातून वाटते.  एक निरिक्षण आहे ते म्हणजे सिनेमातल्या सगळ्या दृष्यांमधे अगदी सकाळी झोपून ऊठण्याच्या सीन मधे सुद्धा नायक आणि नायिका पूर्ण मेकप मधे वावरताना दिसतात.  मला वाटायचे की ह्या असे खऱ्या आयुष्यात नसते म्हणून ते खोटे आहे.  पण आज आशिकी पाहता पाहता एक महत्वाची गोष्ट जाणवली की ते नायक नायिका सतत मेकप मधे आणि सुंदर दाखवल्या जातात यामागे सिनेमा चे व्यावसायिकरण हेच एक कारण नसून अजूनही एक कारण असावे.  प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या नजरेत स्वतःच्या मनात स्वतःच्या आरश्यात जगातील सगळ्यात सुंदर व्यक्तीच असते नाही का?  मग ते नायक नायिकेचे सतत, अगदी झोपेतुन उठतानाही सुंचर मेकप मधे दिसणे हे त्यांच्या मनातली त्यांची छवी दाखवणारे सूचक दृष्य असणार की. 

आजकाल रोहिणीच्या विचारांमुळे स्वतःला आरशात पाहताना उगाचच छान वाटतं.  माझ्या कहाणीतला नायक म्हणजे मी स्मार्ट आणि देखणा आहेच की.  स्वतःच केलेल्या या युक्तिवादावर मी आज जाम खूश आहे. खूश होण्याचे अजून एक कारण पण आहे, माहिताय आज मी हठयोग करून दाखवलाच शेवटी.

गोविंदाग्रजांच्या 'वाग्वैजयंती' पुस्तकातून 'प्रेम आणि मरण' ही तुफान कविता वाचताना नेहमी वाटायचे की या कवितेची शैली किती झकास आहे.  कसे ना कुणीच ती शैली वापरल्याचे इतक्यात वाचायला मिळत नाही.  इतकेच काय त्या शैली ला कोणत्या छंदात घालायचे त्याचाही पत्ता लागत नाही.  माधव ज्यूलियन यांनी त्यांच्या पद्यप्रकाश पुस्तकात ज्या छंदाला नाव नाही त्याला त्या छंदात लिहिल्या गेलेल्या लोकप्रिय कवितेच्या ओळीतूनच एक शब्द धेऊन नावे दिली आहेत.  आज मी पण 'प्रेम आणि मरण' या कवितेला ज्या छंदात लिहिले आहे त्याला आपणच एक नाव दिलेय, आणि ते म्हणजे हठयोग.  त्या कवितेत ती ओळ आहे ना 'हा भोग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग, लागला ज्याला, मरावे लागते त्याला, हे असे' त्यातून हठयोग हा शब्द निवडला झाले.  या शैलीत काही लिहिणे म्हणजे हठयोगच होता की गं.  पण खूश मी यासाठी आहे की मी हा हठयोग केला आणि तो आता ऐक.

नवी सुरवात
(छंद: हठयोग)

बदलूनच गेली दुनिया
ही तिची असावी किमया, वाटते
जगण्यास मिळाला अर्थ
जगणे जणु होते व्यर्थ, कालचे
आयुष्य तिच्यातच बघणे
जणु तिच्यास साठी जगणे, यापुढे
स्वप्नात, तिच्या हातात, देऊनी हात
फिरावे आणी, बागेतुन गावी गाणी, भाबडी

तिजला सांगावे म्हणुनी
रियाज कितीदा करूनी, पाहिले
समोर जेव्हा ती आली,
अमुची वाचाच पळाली, बोंबला
पण अजून हरलो नाही
आयुष्य संपले नाही, जाणवे
होईल, ती ही होईल, फिदा देईल
प्रीतीची हात, होईल नवी सुरवात, जोडिने

~ रोहित

(हठयोगी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२९ आगस्ट २०१३, २२:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३७. गाई पाण्यावर


प्रिय नैना,

आपण रोहिणीचा सतत विचार करतो आणि तिला काहीच माहित नाही या सत्याचा आता मला त्रास व्हायला लागला आहे नैना.  किती दिवस असे खुळ्यागत एकट्यानेच झुरायचे गं?  तिला सांगणे महत्वाचे झाले आहे.  तिला अगदिच माहित नाही असे नाही, कारण ती माझ्याकडे बघते, तिची नजर थांबते, म्हणजे किमान मी तिच्याकडे नेहमी बघतो हे तिला माहित आहे.  तिला जर ते आवडत नसते तर तिने तसे काही तरी तसा संकेत नक्कीच दिला असता असे वाटते.

एक मात्र नक्की की रोहिणी माझ्या पद्यप्रवासाची प्रेरणा आहे हे कबूल करावेच लागेल.  आधी मी काहीतरीच लिहायचो पण आता आपणच लिहिलेले मला खूप आवडते.  त्यात रोहिणीच्या विचारांचा सुगंध पसरलेला असतो.  एक गम्मत सांगतो, बी कविंची 'गाई पाण्यावर' ही कविता मोठ्या मोठ्या ने म्हणून पाहत होतो (मला ते गावी जातो ऐकताच.. वाले कडवे खूपच आवडते)  म्हणता म्हणता असे लक्षात आले की या कवितेचा ठेका खूप मस्त माहितीचा झाला आहे.  प्रत्येक ओळीत शेवटची दोन अक्षरे दीर्घ असतात आणि त्याने ठेका मस्त घेता येतो, आणि मात्रा मोजल्या तर प्रत्येक ओळीत १९ मात्रा भरतात.  या जाती प्रकाराचे नाव मला माहित नाही आणि ते शोधायचा धीर मला कुठला.  आपणही असे काही लिहून पहावे असे वाटले आणि ही कविता ऐक आता:

प्रश्न मोठा
(चाल: गाई पाण्यावर)

लागलेला हृदयास ध्यास वेडा
तिला बघण्याचा रोज मनी ओढा
फुलू येते केव्हाहि हसू गाली
किती वेळा जागून रात्र झाली

तिच्या बघण्याने होतसे पहाट
वेळ जाई बघण्यात तिची वाट
तिला विसरावे ठरे यत्न खोटा
तिला सांगावे कसे प्रश्न मोठा

तिच्या लेखी मी कसा कोण जाणे
फुले आशा पण तिच्या पाहण्याने
वाटते की मी तिला आवडावे
तिने प्रेमाने सखा मज म्हणावे

~ रोहित

(आनंदित)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३६. घनाक्षरी


प्रिय नैना,

कुणी आवडायला लागले की ते आपले पण वाटायला लागते.  कधी कधी वाटते आपण मनातल्या मनात जे माझी रोहिणी असे म्हणतो ते आपण कुणाच्या मनाविरूद्ध तर करत नाही ना?  रोहिणी ने माझी मैत्री माझ्या प्रीतीचा स्वीकार केला नाही तर?  पण मनाच्या आत कुठेतरी अजून एक मन आहे जे ऐकायलाच तयार नाही आणि ते सतत सांगत असते की ती तुझीच आहे.  तिला तुझ्यासमोर येण्याचे काही कारणच नव्हते, योगायोग वगैरे काही नसते.  तिने तुझ्या आयुष्यात येणे यातच संदेश दडलेला आहे की तुमचे जमणार आहे.  ते विचार इतके छान वाटतात ना की मग मी चिंता विसरून जातो.

किती सहज म्हणतोय मी की ती माझ्या आयुष्यात आली.  हो तिला पहिल्यांदा पाहिले आणि त्याच घटनेला मी नेहमी म्हणणार की ती माझ्या आयुष्यात आली.  अशी आली की आता कोणी दुसरे येऊच शकत नाही, कुणाची आता गरजच नाही.  कदाचित तुम्ही मनापासून इच्छा केली की सगळे जग ते पूर्ण करायचा कट करते म्हणतात ना तसेच व्हावे असे मला वाटत राहते आणि मी तिच्या विचारात सध्या जेवणखाण विसरून दिवस काढतोय.

आज अर्धसम छंदात घनाक्षरी मधे एक रचना केलीये ती दाखवतो आता.  सध्या पद्यप्रकाश पुस्तक माझी शाळाच ठरतेय, जिथे माधवराव रोज काहीतरी नवे शिकवतात. 

चांदणे
(छंद: घनाक्षरी*)

अंधार एकटेपणा, अंधार कोणी नसणे
पण तिचा चंद्र येता, चांदणे पसरले

इथे थांबलेत मार्ग, सर्व शोध संपलेले
हीच जिवाची पहाट, शेवटी उमजले

तिने आयुष्यात येता, जग बदलले किती
वाळवंटात गगन, बेधुंद बरसले

येतो सुखाचा पाऊस, मनी प्रीतीचा अंकुर
समाधान दाही दिशी, चौफेर बहरले

~ रोहित

[* धनाक्षरी छंद: ८,८,८,७ अश्या अक्षरांची चार सयमक पदे, एकतिसावे म्हणजेच प्रत्येक पदाचे शेवटचे अक्षर गुरू]

(छंदवेडा)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३५. जीवन


प्रिय नैना,

विज्ञानात शिकायला मिळाले होते की जीवन मार्ग शोधून घेते.  त्याला अडवले तरीही ते नेटाने आपला मार्ग शोधून घेते.  या तत्वाचा वापर जीवनाला आकार देण्यासाठी लोकांनी केला.  जेव्हा एक व्यक्ती रोज बायसेप्स चा व्यायाम करून पेशींना त्रास देतो तेव्हा त्या पेशी त्या त्रासाला सहन करण्यासाठी सिद्ध होतात आणि मग तो त्रास त्रास राहत नाही, आणि या प्रकारात सिद्ध होतांना ते बायसेप्स दर्शनीय होतात. 

घोटेदार बाहू सुंदर दिसतात, पण त्यांच्यासाठी मेहनत करावी लागते.  व्यायाम न करणाऱ्यांचे बाहू जिवंत नसतात का? खरे नसतात का? असतात की पण बलिष्ट बाहू पण जिवंत असतात आणि ते बाहू धारण करणाऱ्याने केलेल्या मेहनतीची ग्वाही पण देतात.

मला वाटते की व्यक्त होण्याची उर्मी म्हणजेच जीवन पण त्या व्यक्त होण्याला काही अनुशासन लावले तर ते व्यक्त होणे लयबद्ध होते, तालबद्ध होते, छंदबद्ध होते.  छंदाविना व्यक्त होणे खोटे नाही ते ही जीवनच आहे पण जर मला कुणी छंदात व्यक्त होताना दिसला तर मला त्याचा आदर वाटतो.  काही अनुशासन काही त्रास त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक स्वीकारला हे त्यातून समजते. 

असो. रोहिणी आता माझ्याकडे पाहते, तिच्या पाहण्यात आता नेम असतो.  ते पाहणे माझ्यावर स्थिरावते काही क्षण.  ते क्षण मखमली वाटतात.  असे वाटते काळ त्या तिथेच थांबावा आणि तिने मान दुसरीकडे वळवूच नये.  आपल्या मनात जे चाललेय तसेच काहीसे तिच्या मनात चालावे हे माझे स्वप्न जणू साकार होते आहे.  हा योगायोग कसा असेल.  कदाचित माझी इच्छा तितकीच प्रबळ असेल नाही का?  आयुष्य खूप सुंदर आहे ग नैना. 

भाग्य खुलले
(कालावग छंद, उदा: अंबा पिकतो, रस गळतो)

भाग्य खुलले
क्षण जुळले
एकदा वळून तिने, मागे पाहिले

गहिवरलो
मनी हसलो
आनंदाच्या सागरात, पुरा बुडलो

मला कळले
तिला कळले
नजरेत नजरेने धागे जुळले

रोज भरती
सुख हे किती
झोप नाही चित्त वेडे जागल्या राती

~ रोहित

आपल्या कवितेला नाव असावे आणि खाली आपले नाव असावे असे वाटले आज आणि तसेच करायचे ठरवले आहे.  जो कालावग छंद या कवितेत वापरला आहे त्याचे नाव सुद्धा माझ्या संदर्भासाठी कवितेच्या नावाखाली लिहायचे ठरवले आहे म्हणजे ती कविता वाचताना सहज त्या छंदाचा ठेका घेता येतो.

आजच्या कवितेचा छंद कुठे मिळाला, अगं तेच पद्यप्रकाश अजून काय, आणि आंबा पिकतो हे मी सुद्धा लहानपणी ऐकले आहे कितीदा.

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३४. दोन की तिन


प्रिय नैना,

कवितांमधल्या छंदांची गम्मत कळायला लागली ना की त्यांना वाचण्याचा त्यांना समजूण घेण्याचा त्यांना तालात गाण्याचा आनंद काही औरच असतो गं.  माधव ज्यूलियन यांच्या पद्यप्रकाश पुस्तकात पान क्रमांक ११२ मधे पहिले दोन छंद दिले आहेत ते म्हणजे १) वैकुंठ आणि २) लवंगलता.  गम्मत म्हणजे दोन्ही छंद १४ अक्षरांचे आहेत, मग यात फरक तो कोणता?  छोटा पण महत्वाचा फरक आहे. 

वैकुंठ छंदात शेवटून तिसऱ्या अक्षरावर आघात आहे, टाळी आहे आणि विलंबित उच्चाराने तिथे मजा येते.  पाखरांचे गाणे नावाची ग. ह. पाटील यांची कविता श्राव्य स्वरूपात मिळाली आज एका संकेत स्थळावर तिला ऐकतांना हे मस्त ध्यानात येते.  या नवीन माहितीमुळे ही कविता वाचताना अधिकच मजा आली.

[
टिप: लक्षात राहण्यासाठी, पुन्हा लिहितोय सतत वाचले म्हणजे लक्षात राहणे सोपे होईल ना गं;
| -> टाळी देण्याचे चिन्ह, इथे यती नसतो पण टाळी पडते
! -> यती चे चिन्ह, म्हणजे म्हणताना इथे थांबणे अनिवार्य असते
S -> विलंवित उच्चाराचे चिन्ह, म्हणताना हे अक्षर लांबवायचे
- -> छंदात एका अक्षरासाठी वापरले जाणारे चिन्ह
]

आता वैकुंठ छंदातल्या त्या पाखरांची शाळा कवितेला वाचून बघ:

वैकुंठ छंद
| प प ! - - - SS | - - -  = अक्षरे १४

पाखरांची शाळा - ग. ह. पाटील

पाखरांची शाळा भरे पिंपळा वरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती

उतरते उन जाते टाळुनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार

बाराखड्या काय ग आई घोकती अंगणी
उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी

तारेवर झोके घेती बसुनी रांगेत
भुरकन इथे तिथे उडती मौजेत

खेळकर किती नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायचे नापास

पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी ग शाळा यांची भिजती सगळे

रविवारी सणवारी आमुच्यासारखी
नाही ना सुट्टी भली मोडली खोडकी

यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का?
गप्प शाळेमध्ये कधी धरितो न हेका

होतो पास आम्ही कधी दिपोती बक्षीस
मौज काय सांगू मिळे सुट्टी हि शाळेस

(ग. ह. पाटील)

लवंगलता छंदात शेवटी दोन अक्षरी शब्द असतोच असतो.  तिन पद्मावर्तनी गट म्हणजे चार चार अक्षरांचे गट पडून शेवटी दोन अक्षरे उरतात तिथे एक दोन अक्षरी शब्द येतो.  वैकुंठ छंदात तिन अक्षरी शब्दाने ओळ संपते लवंगलता मधे दोन अक्षराने हा त्यांच्यातला महत्वाचा फरक मानला पाहिजे. यामुळे कविता म्हणतानाचा ठेका वेगळा होतो.

धोंडोपंतांनी त्यांच्या लेखात या छंदाचा उल्लेख करताना ग्रेस यांची पाठीवर बाहुलीच्या ही कविता सांगितली आहे ती वाचूया आता. 

लवंगलता छंद
प| प| प| -- = १४ अक्षरे

पाठीवर बाहुलीच्या - ग्रेस

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

- ग्रेस

कसे ना छोट्याश्या फरकाने कवितेतली मजा बदलते, वेगळा आनंद मिळतो.  हा फरक धान्यात न घेतल्याने माझी पान ३२. वरची कविता चुकली हे कळले.  ती लवंगलता मधे पूर्णतः नाही.  काही ओळींमधे दोन अक्षरी शब्द शेवटी येत नाही इथे ती फसते. म्हणजे ती कविता वैकुंठ आणि लवंगलता यांचे मिश्रण झाली आहे. :) अरेच्चा नवीनच काहीतरी झाले की.

आज खूप कवितामवर बोललो ना.  काही दिवस असे कवितामय़ होतात आणि त्यांच्याही आनंद औरच असतो.

लक्षात ठेवण्यासाठी संदर्भ :-
१) http://www.misalpav.com/node/4734 - धोंडोपंतांचा लवंगलतावरचा लेख
२) http://www.erc-pune.org/mr/resources/poem - ग ह पाटील यांची श्राव्य कविता

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१४ आगस्ट २०१३, १०:५०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३३. विनवणी


प्रिय नैना,

वेलंटाइन डे ची या वर्षी इतकी वाट मी आधी कधी पाहिली नसेल.  इंटरनेट वरच सतत शेयर होत असणार्‍या पोस्ट मधे एका पोस्ट ने माझे लक्ष वेधलेले.  काय तर म्हणे वेलंटाईन डे ला तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता त्याला पण अर्थ असतो.  बरेच रंग आणि त्याचे अर्थ वाचले त्यात पण लक्षात राहीला तो फक्त हिरवा रंग.  त्याचा अर्थ म्हणे असा आहे की ज्या व्यक्तीने हिरवा रंग घातला ती कुणी आयुष्यात येईल याची वाट पाहतेय.  गम्मत अशी की एकाच रंगांचे वेगवेगळ्या साईट वर वेगवेगळे अर्थ मिळतात पण आपल्याला जो आवडला तोच घ्यायचा नाही का गं?

मी हिरवा टी शर्ट शोधून काढला होताच.  आज ट्यूशन ला रोहिणी काय घालून येते त्याची खरी उत्सुकता लागली होती, आणि तुला काय सांगू, आज रोहिणी चक्क हिरवा ड्रेस घालून आली होती, मी मनातल्या मनातच म्हणले "येस".  आता विचार केल्यावर कळतेय की किती वेडेपणा होता तो पण माणसाला साईन (कौल) मिळत असतात असे ऐकलेय तसेच नाही का समजायचे हे.  मला एक चांगली साईन मिळाली आहे असे समजायला काय हरकत आहे म्हणतो मी. काय?

(ते सात/सात/आठ/सात अश्या अक्षरांचा मीच तयार केलेला छंद मला आवडायला लागला आहे. त्याला मस्त ठेक्यात गाता पण येते माहित आहे.)


मनी तिचा विचार
पुन्हा पुन्हा येणार
सुगंधले सारे आता
एकटाले प्रहर

कौल मिळे वार्‍याचा
कौल मिळे काळाचा
तिच्या मनी तेच आहे
विश्वास या मनाचा

तिचा संग मिळू दे
प्रार्थना ही फळू दे
विठू तुझा दास मागे
मनातले घडू दे

तिला हसू देईन
तिचा सखा होईन
आयुष्याच्या प्रवासात
सोबतीला राहीन

(विनवणारा)
रोहित

[१] http://www.indiastudychannel.com/resources/136166-Valentine-s-Day-Dress-code-Color-code.aspx

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
३० जुलाई फेब्रुवारी २०१३, १९:१५
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३२. छंद


प्रिय नैना,

इंटरनेट वर सुद्धा काही शिकायची इच्छा असेल तर कितीतरी गुरू मिळतात आणि अगदी एकलव्यासारखे सुद्धा शिकायची गरज नसते.  ते सगळे गुरू कितीतरी ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले लिहून ठेवतात.  असेच एक ज्ञानाचे भांडार सापडले इतक्यात.  मिसळपाव.कॉम साईट वर धोंडोपंत यांनी लिहिलेले काही 'छंदशास्त्र' या विषयावरचे लेख सापडले.  नवी नवी कवितांची आणि छंदांची आवड असणाऱ्याला ही मेजवानीच गं.  त्यांच्या लिखाणातला एक भाग मला खूप आवडला तो असा.  ते म्हणतात की शिकताना आधी छंद शिकायचा, त्यानंतर जाती शिकायच्या आणि शेवटी वृत्त शिकायचे.  ही चढती भाजणी आहे. 

छंद - सगळ्यात सोपे.  यात फक्त अक्षरांचे बंधन असते.  कधी कधी काही अधिक ऱ्हस्व दीर्घ चे संकेत असतात पण बहुतकरून फक्त अक्षरांची संख्या सांभाळली की झाले.  मला अष्टाक्षरी जमू लागलेय तो छंदच.

जाती - थोडे अधिक सराव हवा.  यात मात्रा सांभाळाव्या लागतात.  एका ओळीत किती मात्रा याव्या हे ठरलेले असणार.  मात्रा म्हणजे लघु अक्षराची एक मात्रा गुरू अक्षराच्या दोन मात्रा असे मोजत ओळीत किती हे ठरलेले असते.

वृत्त - यात अक्षर संख्या, मात्रा आणि गण हे तिनही ठरलेले असते.  गण म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ अक्षरे कोणत्या क्रमाने यावे यांचे काही ठरलेले संच आहेत, त्यांचा क्रम ठरलेला असतो.

सध्या मी हे सगळेच नव्याने शिकतोय म्हणून मी छंदावरच सध्या अभ्यास सुरू ठेवावा, हे गुरूंनीच लिहून ठेवलेय.  त्यांच्या एका लेखात त्यांनी लवंगलता छंदाबद्दल सांगितले आहे.  काय मस्त नाव आहे राव छंदाचेही.  या छंदात ८ आणि ६ अश्या अक्षरांच्या दोन ओळी घेऊन कविता असते.  फक्त अक्षरेच मोजायची.

छंद शिकायचा आधी
छंद सोपा असे
शिकायचे अक्षरांना
योजायचे कसे

किती अक्षरे येतात
कोणत्या छंदात
साधून होतो छंदाचा
अभ्यास जोरात

पुढे शिकायचे कसे
मात्रा मोजायच्या
किती मात्रा कोण्या जाती
मध्ये ठेवायच्या

मात्रांना शिकण्यासाठी
चाल कामी येते
गुणगुणत लिहून
जाती साध्य होते

पुढे तंत्राचा कळस
म्हणजेच वृत्त
कितीतरी असतात
वृत्ते भारदस्त

अभ्यासाने हळू हळू
वृत्त सुद्धा येते
ध्येयनिष्ठ चिकाटीने
काव्य साध्य होते

लवंगलता छंदात जमले गं जमले.  या छंदांचा छंद लागल्याने आता आयुष्यात फक्त रोहिणी आणि कविता इतकेच उरलेय असे वाटू लागलेय.  हो रोहिणी आधी, हे काय सांगायला हवे काय?

(काव्यसाधक)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
३० जुलाई फेब्रुवारी २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३१. बारकी


प्रिय नैना,

न लिहिलेली पत्रे - Unwritten Letters या नावाचे एक पान मिळाले आज फेसबुकवर.  काय भन्नाट कल्पना आहे गं!  लोक कुणालाही पत्रे लिहितात.  भावशाच्या आजीला पत्रे काय, आणि सगळ्यात धमाल पत्रे वाचली आज ती म्हणजे लंप्याला पत्रे.  बारकी लिहिते लंप्याला, ही दोन पात्रे लेखिका माधवी भट यांनी अशी काही रंगवली आहेत म्हणून सांगू.

नैना, आज ती पत्रे वाचून रडायलाच आले.  असे वाटले की इतके निरागस प्रेम सुद्धा असू शकते नाही का?  आपल्या आयुष्यात असेल का असे निरागस प्रेम?  कुणी बारकी असेल का आपल्या साठी पत्रे लिहिणारी, गुदगुल्या झाल्या असा विचार आल्यावर पण रागही आला आपल्याला अशी कुणी बारकी नसल्याचा. 

राहून राहून हे वाटून गेले की आपण जे रोहिणी बद्दल विचार करतो, तिला आपल्या मनातले कळावे याची स्वप्ने पाहतो ते निरागस नाही.  श्या लंप्या बारकीच्या वयाचे असताना असे काही आपल्याला करायलाच मिळाले नाही.  असे वाटते की आपण ठरवून प्रेम करतोय.  पण तसे नाही गं मला रोहिणी इतकी कुणीच आवडली नाही आज पर्यंत.  तुला सांगितले नसते का आधी. 

कधी वाटते उगाच
आपणही लंप्या व्हावे
कुण्या बारकीने मग
अल्लड पत्र लिहावे

निरागस प्रेमाची ती
गोडी आपण चाखावी
छोट्या छोट्या गोष्टींमधे
आयुष्याची मजा घ्यावी

माझ्यातला लंप्या शोधे
सदा त्याच्या बारकीला
कुठे बसली असेल
माझे पत्र लिहायला

(भारावलेला)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२९ जुलाई फेब्रुवारी २०१३, १९:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान ३०. झपाटलेला


प्रिय नैना,

काही लोक मुक्त लिहितात.  त्या मुक्त लिहिण्यात ते असे काही शब्द वापरतात की आपण चकित होऊन जातो.  हेच शब्द आपण कितीवेळा उच्चारले असतील पण एका विशिष्ठ योजनेमुळे त्या शब्दांना एक प्रभावी शक्ती प्राप्त होते.  ममता सिंधुताईंच्या मुक्त कविता अश्याच आश्चर्यचकित करणाऱ्या कविता वाटतात मला. 

तो प्रभाव ती उंची गाढता येईल का असे मनातही येत नाही पण त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होतो.  असे कितीतरी गुरू या कवितांच्या राज्यात मिळताहेत आणि मी या सगळ्यांचा एकलव्याप्रमाणे अभ्यास आणि अनुकरण करण्यात धन्यता मानतोय.

मी पण काही मुक्त लिहिणाराय आज:

तुझ्या विचाराने
झपाटलेय मला.
तुझ्याशिवाय कितीतरी आयुष्यात आहे
उच्च शिक्षण, करियर, वडिलधाऱ्यांची सेवा
पण हे सगळे तुझ्याशिवाय
आता फोल वाटू लागलेय
तू आयुष्याकडे पाहण्याचा
अर्थच बदलून टाकला आहेस माझा.
तुला इतकी शक्ती
कोणी दिली?
तुझ्या रूपाने?
माझ्यातल्या एकटेपणाने?
माणसातल्या ओढीच्या रसायनाने?
की प्राक्तनाने?
याचा विचारही करावासा वाटत नाही मला
कारण कशानेही होईना
जे झालेय ते इतके सुखावह आहे
जे झालेय ते इतके मधुर आहे
की मी त्यातच मनसोक्त डुंबायला तयार आहे
आयुष्यभर
तुझ्या विचाराने झपाटलेय मला
कायमचे माझा भाग होऊन. 

(झपाटलेला)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१० फेब्रुवारी २०१३, २३:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान २९. विचारू का?


प्रिय नैना,

तुझी पाने लिहिता लिहिता मी कविता करायला लागलो.  खरे म्हणजे असे म्हणावे लागेल की विचार करता करता ते विचार तुझ्या पानांवर मांडता मांडता ते कवितेच्या रूपात उतरायला लागले.  तेव्हा ठाऊक नव्हते की याला कविता म्हणतात.  पण मग मला इंटरनेटवर कवितांचे समूह सापडले, मग खूप वेगवेगळ्या कविता वाचायला मिळू लागल्या.  जुन्या कवींची नावे कळली.  त्यांच्या कविता शोधून वाचायची आवड लागली.  या कवितांच्या विश्वात मी अक्षरशः ओढल्या गेलो. 

या इतर कविंच्या कविता वाचून नवे कवितांचे साचे मिळाले, नव्या तऱ्हा जसे मात्रा, मीटर छंद वगैरे मिळाले तसेच नव्या पद्धतीने विचार करायची कल्पना पण मिळाली.  किती वेगवेगळ्या प्रकारे कवी कविता करतात हे पाहून त्याचा प्रभाव आपल्याही लिखाणावर होतो असे मला कळतेय आणि ते आवडते पण आहे आणि त्याची भीती पण वाटतेय.

मनापासून उत्कटतेने लिहायला जमावे अशी माझी इच्छा.  मी ते साचे तिथपर्यंतच वापरणार जिथपर्यंत ते माझ्या उत्कटतेच्या आड येत नाहीत.  मला माझी उत्कटता अधिक प्रिय आहे.  साचे जशे जमतील तसे आले तरीही चालेल आणि नाहीच आले तरीही चालेल. 

तिला विचारू का?

संथ पाण्यामधे
अचानक खडा मारू का?
मी तिला विचारू का?

ती हवी आहे
आयुष्यात बरोबर चालायला
मी तुझी आहे
तू माझाच आहे म्हणायला
तिची ओढ जाळतेय
आतून आतून हृदयाला
तिच्या शिवाय काहीच सुचत
नाहीये आता त्याला
तिलाच गाठून एकदा सगळे
मन मोकळे करू का?
मी तिला विचारू का?

तिने हो म्हटले तर?
मला साथ देता येईल?
तिचीच साथ निभावेन
अशी हमी घेता येईल?
माझी होडी कुठे जाणार तेही ठाऊक नाही
आई बाबा हो म्हणतील का हेही ठाऊक नाही
माझ्यावर तिने विश्वास ठेवला
तर मला तो निभावता येईल?
घरचे लोक समाज यांना
मला तोंड देता येईल?
माझ्या आयुष्यात तिच येईल याचा
मी एकटाच निर्णय करू का?
जे आवडते तेच होईल याची हमी भरू का?
मी तिला विचारू का?


(गोंधळलेला)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०९ फेब्रुवारी २०१३, १५:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान २८. नादखुळा


प्रिय नैना,

सतत तिचा विचार आणि सतत तिच्या दिसण्या आणि हसण्याच्या आठवणी.  तिच्यासाठी लागलेली ओढ आणि तिने पण तिच्या आयुष्यात माझा स्वीकार करावा ही तीव्र इच्छा.  याच गोष्टींची आवर्तने चालतात मनात सध्या.  तिला इतके तर नक्कीच कळले आहे की मी तिच्याकडे टक लावून बघतो आणि माझ्या डोळ्यात माझ्या भावना पण दिसत असतीलच ना? कारण तिच्या माझ्याकडे पाहण्यात फरक पडलाय.  मी बघतो हे माहित असलेने ती मला शोधते हे मला ही कळलेय.  काल मी अश्या जागेवर उभा होतो जिथून मला ती दिसत होती पण तिला मी नाही आणि तिची नजर काहीतरी शोधत होती.  मला त्यानेही कितीतरी मोरपिसं गालावर फिरल्यासारखे झाले.  मग मी जरा समोर गेल्यावर आणि तिला दिसल्यावर तिचे डोळ्यांनी काहीतरी शोधणे थांबले आणि मला त्यात क्षणी भांगडा करायची इच्छा होत होती आणि कधी तुला सांगतो असे झाले होते.

तिने माझी दखल घेतलेली आहे ही घटना माझ्या आयुष्यात एक मैलाचा दगड आहे गं.  इतरांसाठी ही एक उं साधी घटना असेलही कदाचित पण मलाच कळतेय मी किती आनंदात आहे ते.  मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना खूप मोठ्ठे करायचा प्रयत्न करतोय असे वाटते कधी कधी पण आपल्या आयुष्यातले क्षण साजरे करणे यात काहीच गैर नाही हा विचार येतो आणि मन पुन्हा नाचायला लागते. 

तिने शोधले आज जेव्हा मला
शहारा मनी जीव नादावला
मला पाहता थांबले नेत्र ते
गगन ठेंगणेसे मला वाटते

कुणी पाहते वाट ही भावना
नवे पंख आणून लावी मना
अता लागली ओढ भेटायची
तिला सांगुनी मोकळे व्हायची

(नादखुळा)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०८ फेब्रुवारी २०१३, ११:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान. २७ चुकलो बुवा


प्रिय नैना,

आज एक मोत्यांची खाण मिळाली त्यातला हा एक मोती दाखवतो तुला:

सुखरूप आहे ना गं?
[ओवी छंद भवबंध]

१.
सुखरूप आहे ना ग
माझा खेळकर तान्हा
कसा मोतियाचा दाणा
बाळ माझा; १

सुखरूप आहे ना ग
चेंडूवाणी टणाटण
उड्या मारूनि अंगण
गाजवी जो? २

सुखरूप आहे ना ग
माझा पंडित पोपट
करी प्रश्न पटापट
अवघड? ३

सुखरूप आहे ना ग
माझा छोटा तानसेन !
अर्थ बोली गवसे न
गवयाच्या? ४

सुखरूप आहे ना ग
माझा छांदिष्ट कुमार
खातो ना गा मऊ मार
मायेचा तो? ५

सुखरूप आहे ना ग
दिनभर गलबला
करीनिया बिलगला
रात्री तुला? ६

२.
सुखरूप आहे ना ग
माझी बोबडी बाहुली
रानजाईची साउली
रूपकळी? ७

सुखरूप आहे ना ग
माझी साळुंकी मंजूळ
रानझरी झुळझुळ
वाहणारी? ८

सुखरूप आहे ना ग
माझी हसरी चांदणी
मायमांडिच्या कोंदणी
हिरकणी? ९

सुखरूप आहे ना ग
माजी गौर झोल्यावर
गात ओवी गळ्यावर
पहिली ती? १०

सुखरूप आहे ना ग
चंद्रज्योतच घरीची
हृदयीच्या झुंबरीची
स्नेहप्रभा? ११

सुखरूप आहे ना ग
पोर आप्पाशी खेळून
नाना गाऱ्याणी सांगून
झोपलेली? १२

*
सुखरूप असशी ना
माझ्या चिमण्यांची आई
जिच्या जिवावर राही
निश्चिंत मी? १३

(माधव जूलियन / २० मे १९३५ / समग्र माधव जूलियन)

पान २५ मधे मीच लिहिलेल्या मताला पूर्ण कलाटणी मिळाली आज जेव्हा माधव जूलियन यांची समग्र कवितांचे दोन खंड हातात आले.  त्यांच्या गज्जला मला जुनी मराठी, फार जास्त मात्रांमधे घेतलेली सूट आणि आधुनिक गझलेच्या फार वेगळी शैली असलेने आवडल्या नाहीत, पण त्यांच्या इतर कविता वाचून त्यातल्या बऱ्याच आवडल्या काही तर खूपच छान वाटल्या.  विनस प्रकाशन ने १९७७ मधेच 'समग्र माधव जूलियन' हे दोन खंड उपलब्ध केलेले आहेत (ते सध्या दोन्ही मिळून रू. ४०० मधे मिळतात) ते आज हातात आले.  आता बरेच दिवस माधव जूलियन वाचायला मिळणार आहे.  त्यांची खंडकाव्ये म्हणजे एक वेगळेच लिखाण आहे जे कथेसारखे वाचावे लागणार असे दिसते आहे.  या खंडांमधे त्यांचा फोटो पण आहे आणि एक पूर्ण कविता त्यांच्या हस्ताक्षरात घेतलेली आहे.  अर्धवट वाचून आपले ग्रह तयार करू नयेत हेच खरे. 

काय गोड शैली आहे या त्यांच्या कवितेची. पहिली ओळ सारखी ठेवून तिची आवर्तने.  ही ओवीचीच पद्धत आहे आणि म्हणायला किती गोड वाटते आहे. 

तुझा विचार करता
उठे आनंदाची लाट
हवी तुझीच पहाट
आयुष्यात

तुझा विचार करता
होतो कासावीस जीव
तुझे झाल्याची जाणीव
काळजात

तुझा विचार करता
वाटे एक घर हवे
हवी नोकरी जाणवे
बऱ्यापैकी

तुझा विचार करता
भानावर येते मन
आहे आयुष्य कठीण
जाणवते

तुझा विचार करता
तरी चिंता होती दूर
कुठे विरते काहूर
कोण जाणे

तुझा विचार करता
धुंद अणुरेणु सारे
तुझ्यासाठी चंद्रतारे
आणावेच

(प्रांजळ)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०३ फेब्रुवारी २०१३, ११:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान २६. तुझा रोहित


प्रिय नैना,

डायरीलापण नाव असावे अशी तीव्र इच्छा असलेने मी तुला नैना म्हणायला लागलो आणि तू रोज माझे ऐकतेस आणि सर्वात जवळची वाटतेस म्हणून शेवटी तुझा रोहित असे लिहायला लागलो.  नैना, तुझे आणि माझे इतके जवळचे नाते आहे की मी त्या नात्याने नेहमीच तुझा राहीन.  मनात घर करून बसलेल्या मुलीचे जे आकर्षण आणि वेड लागलेय ना ते आता मला या पानाच्या शेवटीसुद्धा तुझा रोहित असे लिहिताना संकोचाचे कारण ठरते आहे.  उगाच माझी इच्छा कमी पडतेय असे व्हायला नको म्हणून मी आता फक्त रोहित असेच लिहिणार आहे आणि तू रागावणार नाहीस याची खात्री आहे कारण तुला मीच निर्माण केले आहे ना.

रणजीत पराडकर यांच्या कवितांवरचे 'बेफिकीर' यांनी लिहिलेले परिक्षण वाचले त्यातला एक मजकूर वाचून विचारात पडलोय.  ते म्हणतात, [१] 'रसिक गुरफटावा अशी यांच्या कवितेची मांडणी नाही. 'समजली, पण अजून समजेल काही दिवसांनी' किंवा 'समजली, पण काहीतरी नाही समजले असेही त्यात आहे असे वाटले' अशी भावना निर्माण करू शकणारी कविता रसिकमनाला अधिक भिडते कारण तिची निर्मीतीच मुळी काव्यात्मतेच्या गूढ पातळीवर झालेली असते.  मला तर सहज सरळ समजणारी कविताच आवडली आतापर्यंत, आणि म्हणूनच मंगेश पाडगावकर जवळचे वाटताहेत, पण हे परिक्षण वाचल्यावर इतकेच कळतेय की आपल्या पेक्षा वेगळे, कवितेत काही तरी गूढ आणि बिटविन द लाईन्स वाचता यावे असे वाटणारे पण काही काव्यरसिक असतात जगात.  मला कधी अश्या रसिकांसाठी कविता लिहायला जमेल का?  माहित नाही.  मुळात मी कविता करतो किंवा कविता लिहितो असे म्हणायच्या इतकी पण माझी पात्रता सध्या नाही.  कवितेचे वेड आहे इतके नक्की, आणि त्याचाच आनंद मला सध्या पुरेसा आहे. 

उर्जेची खाण

माझी कविता
मला आनंद देणारी रम्य सरिता
काळजी घेते
व्यक्त भावनां कराया जागा ती देते
सरळ साधी
अलंकारांनी ती नाही नटली कधी
रोज भेटते
जवळची माझी खरी सखी वाटते
ताजातवान
नेहमी मी असता ही उर्जेची खाण 

[१] http://www.maayboli.com/node/40548

(सरळसोट)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२९ जानेवारी २०१३, ०८:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान २५. पद्मानंद


प्रिय नैना,

आज मनात विचारांची रांग आहे.  गर्दी नाही बरं कारण वेगवेगळे असले तरीही ते विचार महत्वाचे आहेत.  काही आनंदी करणारे आहे, काही खट्टू करणारे तर काही हळवे करणारे.  एकेक सांगतो.

माधवराव पटवर्धन, तेच जे स्वतःला माधब जूलियन टोपण नावाने संबोधतात, त्यांचे 'पद्यप्रकाश' वाचून मी किती हुरळलो होतो हे मागच्या पानांवर कळलेच असेल, त्यांचा खरा प्रबंध 'छंदोरचना' मिळाला मराठी कविता समुहाच्या पानांमधे, https://www.facebook.com/groups/marathikavitasamooh/421131151255834/  खरेच या माणसाने मेहनत घेतली आहे आणि त्याची दाद द्यावीच लागेल.  यांच्या कविता कश्या असतील याची उत्सुकता होती म्हणून 'विदर्भ साहित्य संघाच्या' ग्रंथालयातून (या ग्रंथालयाचा मी आता सभासद झालोय, वो कहानी फिर सही) माधव जूलियन यांचे गज्जलांजली हे पुस्तक घेऊन आलो.  माझे नशीब म्हणजे या पुस्तकावर त्यांचे हस्ताक्षर आहे माहिताय!  तर या पुस्तकाला चाळून मन खट्टू झाले.  एकही कविता अशी नाही मिळाली जी मनात पोचेल, आवडेल.  एकच कविता ओळखीची असलेने (ऐकली असलेने) जरा बरी वाटली ती म्हणजे प्रेमस्वरून आई.  आता जुन्या प्रकारची मराठी वाचायची सवय आणि आवड नसलेने पण असे झाले असेल पण जे मला मंगेश पाडगावकर किंवा कुसुमाग्रज यांच्या कवितेतून मिळाले ते या कवितांमधे मिळाले नाही, ही जनरेशन गॅप आहे का कुणास ठाऊक.  गम्मत म्हणजे यांच्या पुस्तकात प्रत्येक कवितेत वृत्ताची अनेक जागांवर सूट घेतलेली दिसली आणि ते पण रूचले नाही.  कदाचित यांच्या कवितांवर फार कुठे वाचायला मिळत नाही याचेही कारण हेच असावे का? 

दुसरे आणि खूप आनंदाचे कारण म्हणजे माझे आवडते कवी 'मंगेश पाडगावकर' ज्यांचे बोलगाणी घेऊन मी  काही पाने आधीच नाचलो आहे त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहिर झाल्याची बातमी.  आपल्याला आवडलेला कवी सर्वांना आवडतो हे कळणे म्हणजे आनंदाची वृद्धीच नाही का?  आपण नकळत ज्यांना गुरू स्थानी ठेवले ते व्यक्तीमत्व देशाने मान्य केले आहे हे पाहून तर आपल्याला हे भेटले हे आपलेच भाग्य असे वाटते.  :)

जाता जाता हुरहिर लावणारी गोष्ट, म्हणजे 'तुमको देखा तो ये खयाल आया' हे गाणे ही गझल सुरू होती रेडियोसिटी वर आणि ती ऐकण्याचा अनुभव कसा असतो हे मी कसे सांगू गं शब्दात?  हे गाणे आपल्यासाठीच 'जावेद अख्तर' साहेबांनी लिहिलेय आणि आपल्यासाठीच 'जगजीत सिंग' यांनी गायलेय असे वाटावे इतके मनाला जाऊन भिडते, प्रत्येक वेळेस ते ऐकले की.  सध्या मनात जाऊन बसलेल्या एका खास व्यक्तीमुळे तर असे गाणे लागले की काय सांगू काय होते.

जावेद साहेबांचे शब्द असतात
जगजीत साहेबांचे स्वर आणि ताल
गीत हृदयात भरायला लागते तेव्हा
गतीशून्य होतो आयुष्यकाल

तुझे चित्र आपोआप समोर येते
माझे अस्तित्व हळूहळू विरघळत जाते
जावेद, जगजीत इतकेच काय स्वतःलाही
तुझ्या आठवणीत विसरायला होते

मग उरतात तुझे डोळे तुझे स्मित
मग उरतात तुझ्याच विचारांचे गंध
मग उरतात तू असून नसल्याच्या वेदना
यालाच म्हणत असावेत समाधीचा आनंद


पद्मानंदित,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२७ जानेवारी २०१३, २१:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान. २४ बोलगाणे


प्रिय नैना,

कविता लिहिता लिहिता चांगल्या कविता कश्या असतात, त्यातल्या कल्पना कश्या फुलवलेल्या असतात हे कळायला जेष्ठ आणि लोकप्रिय कविंच्या कविता वाचणे आवश्यक वाटायला लागले आहे.  भीती इतकीच वाटते की इतर कविता वाचून आपली विचारधारा त्यांच्यासारखीच तर नाही होणार?  पण चांगलं वाचलंच नाही तर आपल्या शब्दांवर आपल्या विचारांवर संस्कार तरी कसे व्हायचे? हो ना.  वाचल्यावर त्यातले आवडले ते मनात राहील न आवडले ते वाहून जाईल, जे चांगले आहे ते आपल्या शब्दात उमटले तर काय हरकत आहे नाही का?  शोधता शोधता http://sureshshirodkar.blogspot.in/  हा बालभारतीतल्या कवितांचा ब्लाग मिळाला.  अलिबाबाची गुहाच मिळाल्यासारखे झाले मला. 

आज कुसुमाग्रजांचे छंदोमयी आणि मुक्तायन, मंगेश पाडगावकरांचे 'बोलगाणी' ही पुस्तके विकत घेतली.  आज कवितामय दिवस झाला.  बोलगाणी घेउन तर अक्षरशः नाचलोच मी.  या गाण्याला या कवितांना छंद नाही पण टप्याटप्याने येणारे यमक आणि प्रवाही शब्दांची गुंफण मंत्रमुग्ध करते.  माझ्याही मनातलं एक बोलगाणं आज तुला ऐकवतो:

तुला ती आवडते ना?
दिवस असो की असो रात्र
तिचेच रूप एकमात्र
सतत सतत आठवते ना?
मग लेका वाट कशाची पाहतोस अजून
आधी सांग आधी सांग तिला जाऊन
.
तिच्याशी ओळख केलीच असशील
नसशील तर आधी कर
येता जाता तिचे लक्ष
जायलाच हवे तुझ्यावर
ओळख झाल्यावर तिच्यासाठी
काही विशेष करून पहा
उगाच तिचे लक्ष मिळवण्यासाठी
घसा मधेच खाकरून पहा
बघ तिचे डोळेसुद्धा
काहीतरी बोलतात ना
दुसरीकडे पाहण्या आधी
काही वेळ (तुझ्यावर) थांबतात ना
मग लेका वाट कशाची पाहतोस अजून
आधी सांग आधी सांग तिला जाऊन

कसे विचारू असा विचार
सतावत जर असेल फार
एकदिवस मनाला डावलून
तिला सांगून टाक पार
तू मला आवडतेस म्हणून
सांग तिच्याकडे बघून
ती हसेल, किंवा बघतच बसेल
किंवा तुला वेळ मागेल
तिला थोडा वेळ दे
तिचे उत्तर येइपर्यंत
शून्याचा अनुभव घे
दुसऱ्या दिवशी ती येईल
तिच्या डोळ्यात नेम असेल
तिचे काय उत्तर असेल?
विचारांचे वादळ उसळू दे
जो काही निर्णय असेल तो
ताठ मानेने अंगावर घे
चार वर्षे थांबून नकार मिळवण्यात काय अर्थ
चार वर्षे उसासत जायचे व्यर्थ
आताच विचार भुललीही असेल ती तुला पाहून
आधी सांग आधी सांग तिला जाऊन

बोलघेवडा,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
०२ मार्च फेब्रुवारी २०१२,
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान. २३ आहे नशेत


प्रिय नैना,

माधवराव त्यांच्या 'पद्यप्रकाश' पुस्तकात चार अक्षरांच्या समुहाला दाखवण्यासाठी 'प' हे अक्षर वापरतात.  ठेका घेण्यासाठी टाळी देउन कविता म्हणायला पण प्रवृत्त करतात आणि तसे करताना जिथे टाळी द्यायची ना तिथे '|' हे चिन्ह वापरतात.  पादाकुलक छंदातली कविता म्हणायची कशी आणि टाळी चा ठेका घ्यायचा कसा हे सांगायसाठी या चिन्हांनी लिहून दाखवले तर खूप मदत होते.  एक अक्षर दाखवायला '-' हे चिन्ह आणि यती म्हणजेच म्हणताना जिथे थांबणे आवश्यक आहे ती जागा दाखवायला '!' हे चिन्ह.

जसे पादाकुलक छंद/अष्टाक्षरी यासाठी ही चिन्हे बघ:[ | प | प ] अक्षरे ८

आता पर्यंत मी लिहिलेल्या कविता कोणकोणत्या प्रकारच्या होत्या सांगू:

बोलगाणे - अनियमित अंतराने यमक : कितीही अक्षरे :)
अष्टाक्षरी/पादाकुलक छंद [ | प | प ] अक्षरे ८
वैकुंठ छंद [ | प प ! - - - S - - - ] अक्षरे १४

आणि आज एक खूपच गोड छंद लिहिणार आहे. मला या छंदात लिहायला खूप मस्त वाटलं.  माधवरावांनी या छंदाला 'मूढा छंद' असे नाव दिलेय. हा अर्धसम छंद म्हटलाय म्हणजेच याच्यात दोन ओळींची लांबी वेगवेगळी असते.  हा छंद कसा असतो माहिताय?

[ | प | - ] अक्षरे ५
[ | प | प | प | -] अक्षरे १३

दत्त कवींची 'या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया' ही गोड कविता याच छंदात आहे, या छंदात लिहिताना खरच गुदगुल्या होतात, आणि लिहायचा विषय सध्या खासच असल्याने लिहिणे हा सुद्धा एक रम्य प्रवास ठरतोय.  बघ माझी आजची कविता:

माझे घड्याळ
तिच्या क्लास ला येण्याची दाखवे वेळ
माझे पाकिटं
तिच्या फोटोसाठी आहे आतुर बेटं
माझे कपडे
तिच्या साठी त्यांच्यावर अत्तर सडे
माझी लेखणी
आनंदते तिचे नाव लिहिता क्षणी
माझा विवेक
तिच्या साठी रंगवतो स्वप्ने अनेक
माझे नयन
वाट पाहतात कधी होते दर्शन
माझे जिवन
तिच्या अस्तित्वाने वाटे सुगंधी खाण
कागद वही
सुचवते तिच्यावर कविता लिही

आहे नशेत,
रोहिणीच्या कवितांनी तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२९ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान. २२ शेवटी


प्रिय नैना,

कालची (पान २१ वरची) कविता सहा ओळींची लिहायची म्हणून  ७, ७, ८, ७ अश्या अक्षरांच्या ओळींची झाली, आणि तिला आता कोणता छंद म्हणायचे हे कोडे पडले.  कसेही असले तरीही ती कविता म्हणायला एक ठेका धरता येतो.  ७ अक्षरांच्या ओळीत शेवटच्या अक्षरावर विलंबीत स्वर घेतला तर मस्त नाद तयार होतो.  अजून एक गम्मत सांगू माधवरावांनी म्हटलेला वैकुंठ छंद आहे ना त्या त्यांनी प्रत्येक दोन ओळीत सयमक दाखवले होते आणि मी आज एक कविता लिहिली त्यात २ आणि ४ थ्या ओळीवर यमक आणून पाहिले.  आता याला पण वैकुंठ छंदच म्हणावे लागेल कारण अक्षरे तशीच आहेत प्रत्येक ओळीत ४ ४ ! ३ ३. 

पहाटेचे कोळे उन, वाटते वेगळे
सकाळचा चहा आता, वाटतो वेगळा
तेच तेच तरी सारे, नवेच वाटते
अचानक बघा कसा, झालोय वेंधळा

कोंदट घर कोनाडे, सुगंधी वाटती
काय जादू झाली झाले, जगणे निराळे
नळातून पाणी येते, रोजच्या सारखे
तरी वाटे अमृतच, घरात खळाळे

आजकाल धुंदीतच, चालतो वागतो
दोस्त म्हणे गेला बेटा, हातून सुटला
घडी घडी उगाचच, गालात हासतो
कोण जाणे काय रोग, जडला कुठला

मला झाली बाधा काय, सांगावे कुणाला
मनातच आनंदतो, मनात ठेवतो
तरी पण तिचे चित्र, दिसते लोकांना
गुंतलेला जीव कुठे, लपून राहतो

कुसुमाग्रजांनी मुक्तायन आणि महावृक्ष सारखे कवितासंग्रह लिहून मुक्त कविता किती सशक्त असू शकते याची अनेक उदाहरणे आपल्यासाठी ठेवली आहेत.  कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांची काही पुस्तके चाळायची संधी मिळाली हे माझे भाग्यच होते.  'महावृक्ष' कविता शब्दाशब्दागणिक एक भव्य चित्र निर्माण करत जाते आणि शेवटी कडेलोट करावा तसे भानावर आणते.  मुक्त कविता लिहिणे म्हणजे छंदबद्ध कविता लिहिण्यापेक्षाही कठीण आहे हे जाणवू लागले आहे.  मुक्त कवितेत साथीला छंद, ताल किंवा समान ओळींची रचना काहिच नसते, यमकाचेही बंधन नसल्याने जो काही प्रभाव साधायचा आहे तो निव्वळ तुमच्या कल्पनेत तुमच्या कंन्सेप्ट मधे असावा लागतो.  मी पण मुक्त कविता लिहावी असे खूप वाटत होते आणि आज अचानक एका क्षणी ही कविता मनाच्या फांदिवर येऊन बसली.  मी रात्रभर तिच्या नशेतच राहणार आहे हे तुला वेगळे सांगायला नकोच.

शेवटी त्याला कळले!
त्याचे अस्तित्व पार धोक्यात आलेले आहे.
ज्या फांद्यांवर पानांवर;
घट्ट पकड मिळवून,
त्याने स्वतःचे राज्य स्थापन केले.
अंधाराचे सण,
ज्यांच्या सह साजरे केले रडून.
त्या फांद्या तीच पाने;
कशाच्यातरी विलक्षण प्रभावाने,
त्याच्याकडे लक्ष देईनाशी झाली आहेत.
श्वास गुदमरायला लागला त्याचा.
त्याने शेवटचेच म्हणून...
गलबलाट केला;
थयथयाट करून प्रकट होण्याची चेष्टा केली.
पुन्हा पुन्हा सर्वदूर..
करून पाहिला स्वतःचा नाद भरण्याचा प्रयत्न.
पण..
त्याची सत्ता संपलीये!
हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही.
शेवटी...
काल जेव्हा..
ती माझ्याकडे पाहून गो S ड हसली.
तेव्हाच सहन न होउन;
मन दगडाचे करून...
माझ्या एकटेपणाने,
गळफास लावून जीव दिला.

मुक्तपक्षी,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२८ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com