Sunday, September 15, 2013

पान १३. परवानगी


प्रिय नैना,
प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडली ना की खूप उर्जा मिळते.  मराठी कविता समुहावर चार दोन अभिप्राय मिळाले तरीही कॉलर टाईट होतेच माझी.  मला कळते की मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या साध्या लिखाणाला पण काही जेष्ठ छान म्हणत असतील पण तरीही आवडते गं.  शाबासकीची थाप ही हवीच, त्यामुळे लिहायचा उत्साह मिळतो.  सध्या एका गंभीर प्रश्नाने वेडे केलेय मला.  बघ ना:

कशाचा विचार करावा
हे कधीच कुणाला विचारले नाही
तिथे माझीच सत्ता होती
अडथळा नाही कशाचाही
पण रोहिणीचा विचार येताच
का वाटते गुन्हा करतोय
ती एक प्रत्यक्षातली व्यक्ती आहे
तिला न कळताच तिच्यावर मरतोय
इतका कधीच कुणाचा विचार केला नाही
हा काय प्रकार आहे?
टाळतो म्हटले तरी टळत नाही
दिवास्वप्नांचा मी
चँपियन सध्या झालोय
सकाळ संध्याकाळ तिचाच विचार
डोळे उघडे असो वा बंद
डोळ्यांसमोर एकच आकार
का ती अनोळखी आहे?
का ती नाहिये जवळ
नागपूर शहर आहेच केव्हढे
एक संधी हवी केवळ
काश तिच्याशी ओळख असती
सांगितले असते मनात घुसलीयेस
माझी परवानगीही न घेता
माझ्या हृदयात जाऊन बसलीयेस

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

No comments:

Post a Comment