Sunday, February 1, 2015

पान ६६. चिडलेला

प्रिय नैना,

आता आमचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत.  ३ ते ४ महिने लागले बरे व्हायला आणि हिंडू फिरू लागायला.  आधी कदाचित समाजव्यवस्था तयार होण्या आधी प्रत्येक माणसाला, कुटुंबप्रमुखाला स्वतःच्या घराची सुरक्षा स्वतःच करावी लागत असेल तेव्हा सर्व शक्ती लढणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणे यातच लावली जात असेल.

नंतर समाजव्यवस्था आल्या आणि कामांची वाटणी आली.  शहरीकरण आले आणि अधिक टप्पेदार कामांची विभागणी आली.  आता प्रत्येक व्यक्तीला तलवार बंदूक हातात घ्यायची गरज उरत नाही.  प्रत्येक व्यक्ती तिला हवे ते काम करते, जसे नोकरी, व्यवसाय आणि ते करता करता एक मोठी रक्कम 'कर' म्हणून सरकारात जमा करते आणि या करातून शहराची सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्था व्हावी म्हणून सरकारात अधिकारी आणि प्रतिनिधी नेमले जातात.  हे सगळे नागरिकशास्त्र फक्त कागदावरच असते का गं?

मला न कुणाला वेठीस धरता आले न कुणाला जाब विचारता आला.  माझ्या घरावर बळजबरीने हल्ला झाला, आम्ही सगळे जखमी झालो मरता मरता वाचलो पण त्या डरोडेखोरांचा तपास करणे आणि मला न्याय देणे हे कुणाचेच कर्तव्य नसल्यासारखे सगळे जणू परत कामाला लागलेले दिसतात.  मी नशीबाला का दोष देऊ, आपली यंत्रणा का काम करू शकत नाही?  मग मी इतका मोठा 'कर' का भरायचा?  कधी कधी नक्षल लोकांचा राग बरोबर आहे असे वाटायला लागते.  त्यांनाही या व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.

तुला सांगतो मला सध्या खूप चीड येतेय, आपण फसवल्या गेलोय असे सतत वाटत राहते.  ज्या क्षणी मला या व्यवस्थेची या सुरक्षेची खरी गरज होती तेव्हा ते काहीच करताना दिसत नाहीत.  आणि मी कुणाला जाऊन जाब देखील विचारू शकत नाही.  कधी कधी तर सगळे दुरून आपल्याकडे बघून हसताहेत असे वाटू लागते.  मजा बघताहेत असे वाटू लागते. 

जाती प्रकाराचा विचार सुरू केला खरा पण ते छंदांसारखे सोपे नाही असे दिसते.  छंदात मला जसा ठेका धरता येतो आहे, छंद पाहून त्याचा ठेका लक्षात आला की त्या ठेक्यावर लिहिणे पथकन जमते तसेच या जाती प्रकाराचा ठेका अजून डोक्यात भिनणे झालेले दिसत नाही.

छंदात कसे एक अक्षर म्हणजे नेहमी दीर्घ उच्चार तेव्हा [ प | ] म्हटले की चार अक्षरात काम निभते पण जाती मधे [ प | ] चा अर्थ होतो आठ मात्रा, आणि अक्षरे कमी अधीक चालतात पण त्यांची मात्राबेरीज आठ हवी असे लागते. 

चंद्रकांत किंवा पतीतपावन छंद मला खूप आवडला होता तो होता
[ | प | प | प | - ] आक्षरे १३

त्याची आता पतीतपावन जाती लिहायची म्हणजे
[ | प | प | प | + ] २६ मात्रा (८, ८, ८, २)
या जातीतले एखाचे गाणे गुणगुणायला मिळते का बघतो आहे म्हणजे त्या ठेक्यावर काही लिहिता येईल.

सध्या संतापाने इतके डोके भिणभिणते आहे की धड विचार करता येत नाहीये, सतत वाटत राहते की पुन्हा असेच संकट येणार नाही कशावरून आणि तेव्हा कोण आहे आपली सुरक्षा करायला?  हे शहर ही न्यायव्यवस्था, हे पोलीस सगळे कुचकामाचे निघाले, एखादे खेळणे आवडले नाही तर आपण लगेल चांगले नाही म्हणून बदलून घेतो, हे शहर ही व्यवस्था कुठे जाऊन बदलू?

(हतबल)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
२१ मार्च २०१४, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment