Friday, February 13, 2015

पान ७१. अधर


प्रिय नैना,

कालच्या भन्नाट अनुभवानंतर आज पण फेसबुकावर आजच्या दिवसाचे विशेष काही वाचायला मिळते का पाहण्यासाठी 'ओठ', 'अधर', 'किस' वगैरे शोधून पाहिले आणि रत्ने हाती लागली बघ:

काही बाप लोकांचे शेर असे सापडले

व्याकुळ माझ्या नजरेला दे नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या अधराना दे अधर प्राशिण्यासाठी
~ इलाही जमादार

ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना
--सुरेश भट....

काही कवीनी मागच्या वर्षी याच दिवशी जे  लिहिले ते सापडले

तू खोड ओठांनीच जे लिहिलेस या ओठांवरी
वृतांत भेटीचा मला सगळा लिहावा लागतो !..
~ सुधीर...(मुळीक)

नजरेचे हे कामच नाही म्हणून म्हणतो
ओठ तुझे मी माझ्या ओठांनी शोधावे..!
गोविंद ....(नाईक, १३ फेब्रुवारी २०१४)

नशा उतरण्याआधी अलगद पुन्हा उतरले..
त्या ओठांचे, या ओठांवर जहर गुलाबी...!!
~ सचिन (काकडे, १४ फेब्रुवारी २०१४)

आणि खास आजच्या दिवसासाठी लिहिणारे अनेक कलाकार भेटले त्यातले आवडलेले काही लिहून ठेवतो.

अधरावरती अधिर जाहली गुलाब रेषा
आणिक मौनाची उलगडली हळवी भाषा...
~ पूजा (भडांगे बेळगाव)

या डोळ्यांचा त्या डोळ्यांशी करार आहे...
त्या ओठांचा या ओठांवर थरार आहे...
- यामिनी (दळवी)

धुरकट झाल्या काही ओळी ,ज्या लिहील्या होत्या प्रेमाने
ओळी त्याच पुन्हा ओठांनी ,ये ....ओठावर गिरवू आपण
- स्वाती....(शुक्ल)

जरा, जरा गुलाबी चळवळ असु दे
फक्त ओठ ओठांवर बास होत नाही..!!
- सचिन (काकडे)

उरात सूर ताल भर, सुरेल जीवनास कर
हळूच छेडुदे अधर, तनूस तू सतार कर
~ अरूण (शुभानन चिंचकर)

तुझे लाजण्याचे ऋतू फार झाले,
तसे ओठ माझे निराधार झाले.....
~ अनिल...(आठलेकर)

सांगतो मी गूज माझ्या अंतरीचे
लाव तू ओठांस माझ्या कान आता...!
----प्रशांत (वैद्य)

ओठांनी ओठांवर वाचू...लिहायचे जे
शब्दांना अर्थाची घुसमट कळते कोठे?
- मनोज (दासुरी)

अता काढू कशाने पांढ-या पेशीतली मरगळ
तुझ्या तांबूस ओठांचा उतारा दे पुन्हा बोलू ..!!
~ सतीश (दराडे)

सांडते साखर मुखातुन, गोडवा शब्दात त्याच्या...
कैफ, धुंदी, दंश, बाधा, अन उतारा, ओठ त्याचे...!

- पूजा (फाटे)

आणि आजची विशेष बातमी म्हणजे हा खालचा व्हॉटसॅप चा संवाद:

मी: १४ च्या भेटीबद्दल तू सांगणार होतीस ना?
ती: आमच्या घरी एका कार्यक्रमाला जाण्याचे सुरू होते रे म्हणून नक्की काही होत नव्हते
मी: मग आता उद्याच १४ आहे ना, काय नक्की झाले मग
ती: तो कार्यक्रम रद्द झाला
मी: म्हणजे आपली भेट होऊ शकते ना?
ती: हो
मी: मग लवकर सांगायचे नाही का, किती तो सस्पेन्स
ती: (स्मायली)
मी: तू दुष्ट आहेस
ती: (स्मायली)
मी: दात काढणारी दुष्ट
पुन्हा मी: अजून एक विचारायचे होते
ती: काय
मी: उद्या तू एकटीच आलीस तर मला आवडेल, तुझी ती मैत्रीण जी मागच्या वेळेला आली होती तिला आणले नाही तर मला जास्त आवडेल
ती: अरे तिला अजून कुणालातरी भेटायला जायचे आहे
मी: (मनातच.. हुश्श)
मी (प्रकटपणे): सहा वाजता, फुटाळा [१] च्या सुरवातीला हं,
ती: बरं, तसा मेसेज करेन तुला निघाले की
मी: थॅंक्स, आज मी खूप आनंदात आहे
ती: (स्मायली) गुड नाईट मला आता टिव्हीत लागलेला सिनेमा पाहायचाय, चल बाय
मी: ओके

तर मग या संवादातून तुला कळलेच असेल की माझा ढिंका चिका प्लान पक्का झाला आहे.  उद्या तिला (पुन्हा) मनातले सांगणार आहे.  जे पत्रातून ;लिहिले होते तेच पण आता त्यानंतर आमचे बरेच बोलणे आणि पत्र लिहिणे झाले आहे त्यामुळे आता हे विचारणे काही तरी वेगळे असणार आहे असे वाटते आहे.  आणि तिने चक्क १४ तारखेला भेटशील का विचारल्यावर हो म्हटले यातच तिच्या मनातले कळते ना गं.  काय?

अमित ला सांगितल्याबरोबर महाराज पार्टी ची डिमांड करू लागले. त्याला सांगितले गप बास, आधी भेट होऊ तर दे, (मनातले) काही कळू तर दे, मग लेका तुला पाहिजे तेवढ्या पार्ट्या देईन मी. 

गुपित
(जाति: अनलज्वाला - [ | प | प | प ] )

बोट ठेवले फोटोमधल्या अधरांवरती
गोड शहारा फुलला रंध्रा रंध्रांवरती
भासहि मोहक आठव दाहक तव श्वासांचा
विचारही तो मादक हळव्या सहवासाचा

स्वप्न पाहिले तुला आपली जे म्हणण्याचे
गुपित उद्याच्या भेटित आहे त्या स्वप्नाचे
दिवस साजरा व्हावा आहे उत्कट आशा
तुझ्या मुखातुन हो यावे इतकी अभिलाषा

~ रोहित

(हुरळलेला)
रोहित

[१] फुटाळा, नागपुरातला एक तलाव ज्याला आमच्या नागपुरात नागपुरचा नरिमन पाईँट म्हटले जाते.  तो तरूण तरूणींचा स्वर्ग आहे, तिथे संध्याकाळी चौपाटी सारखी जत्रा असते पण सगळे आपल्या आपल्यात मस्त असतात.

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१३ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment