Tuesday, February 3, 2015

पान ६८. सखी

प्रिय नैना,

माझी तळटीपा द्यायची सवय कशी वाटली.  हो म्हणजे अजून तिला सवय म्हणायसाठी तसे अजून काही वेळा करावे लागणार आहे पण मला हे खूप आवडले आहे हं.  कालच्या पानावर मी ज्या तळटीपा दिल्या त्या मला खूपच आवडल्या आहेत.  चालू संदर्भाचा ओघ न घालवता अधिक माहिती टिपून ठेवण्यासाठी ही पद्धत खूपच छान आहे.  दुसऱ्यांदा किंवा नंतर वाचताना त्या टिपा वाचायला मजा येते आणि अधिक माहिती पण साठवून थेवता येते.  बरं असो.

आज धम्माल झाली.  कापा झोन [१] मधे आम्हा तिघांची भेट ठरली आणि घडली.  मी, अमित आणि रोहिणी (म्हणजे तिच्या बरोबर एक तिची मैत्रीण पण आलेली पण मी तिला मोजत नाहीये).  व्हॉटसॅप वर भेटूया का असे बोलणे सुरू होते तेव्हाच मी शक्कल काढली की आजच भेटूया का?  कापा झोन नावाचे नवे हॉटेल उघडले आहे ते छान आहे म्हणतात. त्यावर धाड घालूया का?  आणि चक्क अमित आणि रोहिणी देखील तयार झाले.  आज ती पांढरा सलवार कमीज घालून आली होती.  तिने कानात मोत्यांचे डूल घातले होते, त्या पांढऱ्या ड्रेस वर ते मोत्यांचे डूल इतके खुलून दिसत होते की मी बराच वेळा त्यांना पाहताना पकडल्या जातो की काय असे वाटले होते मला. 

बोलता बोलता विषय निघाला एका नव्या जाहिरातीचा.  सध्या फेसबुकवर आणि अनेक जागांवर एक जाहिरात फिरते आहे.  त्यात तरूण मुलीला जेवणाच्या टेबल वर रुसलेले बघून आजोबा त्यांच्या वेळेसच्या कहाण्या सांगू लागतात, बाबांना किती जणींनी नाही म्हटले, काकाला किती जणी सोडून गेल्या आणि त्यात आजीही जोडते की आजोबांच्या आयुष्यात किती मुली तिच्या आधी आल्या आणि गेल्या.  मग मुलगी हसायला लागते आणि घरचे सगळे मिळून खेळीमेळीत हसू लागतात.  मी माझे मत मांडले की आजकाल प्रेम किती तकलादू दाखवले जाते.  ब्रेकप होतो याचाच अर्थ प्रेम तकलादू होते असा नाही का?

रोहिणी चे मत असे होते की ते प्रेम असते असे म्हणायलाच नको.  कुणीतरी आवडते म्हणून त्याच्याबरोबर काही काळ घालवून मैत्री पेक्षा जास्त काहीतरी समजून घ्यावे पण त्याला प्रेम म्हणून नये.  प्रेम काही काळानंतरही ती व्यक्ती सहन होत असेल तर त्या नात्यात येते असे समजावे.  तसे झाले नाही तर थांबावे आणि पुढे जावे move on.  तिच्या म्हणण्या प्रमाणे मुळात माझे तुझ्यावर प्रेम आहे हे जो काही तासात किंवा कधीही न भेटता कुणाला म्हणतो ते प्रेम नसते.  असूच शकत नाही.  आवड असते, आकर्षण असते असे म्हणूया की.  आकर्षण हा शब्द वाईट का वाटायला हवा, ते स्वीकार करून त्या आकर्षणाचे रूपांतर प्रेमात करता येते का ते बघावे.

माझ्या मनातल्या प्लुटानिक प्रेमाच्या [२] तिने चिंध्याच केल्या बोलता बोलता.  मी पण म्हणालोच की कुणाला जर मनापासून आपले कुणावर प्रेम जडले आहे हे पटले असेल तर?  त्यावर तिचे उत्तर ठरलेले होतेच की असे म्हणणारा स्वतःलाच फसवत असतो.  मला नाही पटले.  असे असते तर माझे रोहिणीवरचे प्रेम खोटेच ठरते ना?  एक मला पटले की जे ब्रेकप होते ते प्रेम असू शकत नाही. पण ब्रेकप च्या आधी ती दोघे त्याला प्रेमच म्हणत असतात ना?  काय भुगा होतोय डोक्याचा, ही रोहिणी म्हणजे तापच आहे विचारांचा.  पण एक मात्र मला नक्की माहित आहे की मला तिच्या बद्दल जी ओढ वाटते ते निव्वळ आकर्षण नाही.  हो म्हणजे अगदीच नाही कसे म्हणणार ना, ती दिसतेच इतकी कातिल की आकर्षण असणारच पण फक्त तेवढेच नाही.  त्यात काळजी आहे, त्यात वेड आहे, त्यात तिला हसताना बघायची ओढ आहे, तिला हसताना आणि आनंदात असली की डोळे मिटून वर बघायची सवय आहे ती अदा पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवायची ओढ त्यात आहे.  फक्त आकर्षण नाही गं.  तिला कसे सांगणार आहे कुणास ठाऊक.

अमित म्हणाला थांबा रे दोघे, बरं ब्रेकप होऊ शकतो आणि त्याचा स्वीकार करावा म्हणजे पुढे जाता येते असेच ना.  मला पण दोच चार ब्रेकप करायचे आहेत.  पण ब्रेकप च्या आधी काही तरी लागते की नाही लोकहो?  आधी ते तर होऊ द्या.  माझे म्हणणे होते असे असे असेल तर ते आधी जे होते त्याला म्हणायचे काय?  पाश्चात्य देशात तर त्याला बायफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून मोकळे [३] होतात आणि नंतर ब्रेकप करतात आणि तसे झाले की पुढच्या बॉय किंवा गर्लफ्रेंड च्या शोधात निघतात. आपल्या भारतात ज्या लैला मजनू चे किस्से प्रसिद्ध आहेत त्यात आदर्श असा आहे की एकदा लैला मजनू भेटले की ते आजन्म असलेले नातेच असायला हवे तरच ते महान असते.  त्यांचा आदर्श ठेवून जे घडते ते प्रेम आहे हेच तर आपण म्हणायला जातो आणि मग त्यात ब्रेकप होणे समाविष्ट नसते, किमान आदर्शात तरी नाही. 

हेच, रोहिणी मधे पडली पुन्हा,आपण हे आदर्श बदलायला हवेत.  तिच्या मते मित्र च्या पुढे सखा असा शब्द वापरावा. हे तिने बोलता बोलताच तयार केलेले सिद्धांत आहेत हे कळत होते पण विचार मस्त होता.  बॉयफ्रेंड साठी शब्द 'सखा' मस्त होता.  म्हणजे ती माझी कोण झाली - सखी नाही का.  वा मी मनातल्या मनातच खूष झालो.  हो पण तिच्या म्हणण्या प्रमाणे असा सखा आपले सखेपण हरवू शकतो हे ही आपण लक्षात ठेवायला हवे आणि तसे झाले तर पुन्हा कोण सखा होणार हे शोधायला लागायचे (हे पचवणे अवघड होते, म्हणूनच फक्त ऐकले आणि मनात कुठेतरी ठेवून दिले पुन्हा न बघण्यासाठी). 

त्या सखा सखी वर बरेच विनोद झाले मग.  पण आजची मिळकत आहे तिची ती कल्पना सखा होण्याची.  ती मला तिचा सखा म्हणून कबूल करणार की नाही याची धाकधूक आता लागलेली आहे.  पण येत्या १४ ला कार्डावर तुझा सखा लिहायचेच असे ठरवले लगेच.

सखी
(चाल: सखे कसे सांग तुला)

माझी सखी तूच तुला सांगू कसे सांगू कसे
तुझ्या मुळे झाले माझे जिणे लख्ख सोने जसे

तुझे हसणे भरते माझ्या मधे प्राण नवा
तुला स्मरताच पेटे काळजात एक दिवा
तुझा भास जागोजाग माझे मन वेडे पिसे

तूच सखी तूच सखी नको दुजे कुणी अाता
तुझ्या कडे वळतात सगळ्याच माझ्या वाटा
तुझा सखा होण्यासाठी करू काय करू कसे

~ रोहित

[१] कापा झोन, अभ्यांकर नगर मधे उघडलेले नवे हॉटेल
[२] रविकिरण मंडळाच्या माधव ज्यूलियन यांनी वैचारिक प्रेमाचा पुरस्कार केला होता.  शेक्सपियर ने पण दोन मनांचे मिलन असे लिहून ठेवले आहेच ना
[३] पाहिलेले कितीतरी इंग्रजी सिनेमे हीच शिकवण देतात ना

(मनापासून तिचा सखा)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०३ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment