Monday, February 2, 2015

पान ६७. पुन्हा सिद्ध

प्रिय नैना,

कविता करणाऱ्यांचे किती प्रकार असतात तुला माहित आहे.  डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी 'नव्या निर्मिति्रक्रियेची कविता' या शीर्षकाच्या त्यांच्या प्रस्तावनेत पाश्चात्य कवी एझरा पाऊंड यांनी केलेले एक वर्गीकरण दिले आहे ते रोचक आहे.  एझरा पाऊंड म्हणतात की कवी तिन प्रकारचे असतात:

१) नकले कवी
२) युग कवी आणि
३) नवनिर्मितिप्रक्रियाशोधक कवी

बापरे केवढा मोठा शब्द तयार केलाय त्यांनी मराठीत त्याचे भाषांतर करताना नाही.  तर त्या लेखात [१] त्यांनी हे तिनही प्रकार विस्ताराने समजावून सांगितले आहेत.  त्यातले नकले कवी म्हणजे जे कवी प्रसिद्ध आहेत त्यांच्या शैलीचे अनुकरण करून तसेच लिहिल्याने आपणही प्रसिद्ध होऊ अशी भाबडी आशा असणारे कवी  म्हटले आहे.  बरेच काही आहे त्यात पण ते नंतर कधी तरी, मला तर सध्या वेगळ्याच दोन प्रकारचे कवी अधीक डोक्यात येताहेत.

१. कवी ज्यांना कवितांसाठी पुरस्कार मिळतात
२. कवी ज्यांना कवितांसाठी पुरस्कार मिळत नाहीत :)

यामिनी दळवी [२], विजय बेंद्रे [3] आणि आता तर पूजा भडांगे [४] सुद्धा, यांच्या सारखे सदैव पुरस्कार मिळणारे काही कवी सध्या माझ्या फेसबुक यादीत आहेत.  मला प्रचंड हेवा वाटतो या कवींचा.  मस्त थोड्या थोड्या दिवसांनी कुठल्यातरी कवितास्पर्धेत पटकावलेले पारितोषिक आपल्या भिंतीवर छापून जळवत असतात.

रोहिणीचा क्लास संपला पदवी पण झाली, आता तिने एमबीए साठी कालेज जाईन केले आहे.  पण रोज सकाळी जो सोहळा होता तो आता नाही.  आपचे बोलणे होत असते फोन वर, (म्हणजे मीच तिला अनेक वेळा फोन करतो).  मेल मधे, मेसेज मधे आणि व्हॉटसॅप गटावर पण बोलणे होतच असते.  ती कबूल करत नाही पण त्या घटनेनंतर ती माझी काळजी करायला लागली आहे, हे मला कळते सांगितले नाही तरी.  ती, मी आणि अमित असे त्रिकूट झाले आहे.  कधी एकत्र सिसिडीमधे भेटायचा प्लान होतो तेव्हा खूप धमाल येते.

१४ फेब्रुवारी पुन्हा जवळ येतोय. मागच्या १४ फेब्रुवारी ला काय काय मनातच बेत केले होते आठवते का? पण या १४ ला तिला पुन्हा सरळ सरळ थेट विचारायचे ठरवले आहे.  तिने आधी धुडकावून लावले असले तरीही मैत्री कायम ठेवली आहे आणि त्यामुळेच यावेळेस आपल्याला पुन्हा चांस आहे हे मी समजून घेतले आहे काय?

या १४ ला…
(मुक्तयमक)

तुझ्या मुळे माझ्या जगण्याला दिशा वेगळी मिळते
स्वतःसही विसरून कसे आनंद जगावे कळते
तू असलीस की रंगुन जातो क्षण क्षण मोहक बनतो
या १४ ला पुन्हा एकदा तुला विचारिन म्हणतो

तू म्हणजे उत्तर जगण्याचे तू म्हणजेच प्रयोजन
व्याकुळलेल्या वृक्षासाठी तू वळिवाचे सिंचन
हो म्हणशील तू या आशेने कितेक स्वप्ने विणतो
या १४ ला पुन्हा एकदा तुला विचारिन म्हणतो

~ रोहित

(पुन्हा सिद्ध)
रोहित

संदर्भ:
[१] समीक्षेची वल्कले, द. भि. कुलकर्णी, पद्मगंधा प्रकाशन, २००८
[२] https://www.facebook.com/yamini.dalvi.9
[३] https://www.facebook.com/vijay.bendre.52
[४] https://www.facebook.com/miss.puju

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०२ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment