Thursday, February 12, 2015

पान ७०. प्रामिस


प्रिय नैना,

टेडी दिवसाला शारदा जनरल स्टोर्स मधे एक फेरफटका मारून आलो, त्याला विचारले एखादा छोटासा टेडी असलेली की चेन मिळेल का तेव्हा त्याने एक सुंदर शी टेडी असलेली की चेन दाखवली, ती विकत घेऊन स्वतःजवळच ठेवून घेतली.  खरे म्हणजे रोहिणी साठी घेतलेली पण तिला काय कारण सांगून देणार?  आणि तिने घेतली नाही तर?  तेव्हा ती पण १४ तारखेलाच देता आली तर बघुया म्हणून स्वतःजवळ ठेवून दिली.

कालच्या प्रामिस दिवसाचे प्रामिस मी स्वतःजवळच स्वतः केले आहे.  ते म्हणजे तुला रोज काही ना काही सांगणार, रोज एक पत्र तुला लिहिणार. अगदी नेमाने, शप्पथ.  बघच तू.

आजचा मिठी दिवस, आला ते खूप गोड स्वप्न घेऊन.  आज चक्क रोहिणी आपल्या मिठीत आहे असे स्वप्न पडलेले आणि ते उठल्यावर लक्षात राहिलेले म्हणजे पहाटेचे स्वप्न असणार नाही का?  पहाटेची स्वप्ने खरी होतात हे वाक्य मला आज खूप आवडायला लागले आहे, काय सुंदर म्हटले आहे ज्याने कुणी म्हटलेय. 

फेसबुकावर मिठीची मस्त धुमधाम सुरू आहे आज 'मिठी' शब्द जरी सर्च केला तरी मिठीची बरसात होते डोळ्यांपुढे.  त्यातले आवडलेले काही असे:

फेसबुकावरचे भन्नाट कवी अनिल आठलेकरांच्या वॉल वर:

सखे आज थोडा अबोला धरूया,
मिठीतच मुक्याने जरा मोहरूया...
~ अनिल आठलेकर

वा वा अनिल सर काय मनातले बोललात.  ते ओळींच्या पुढचे टिंब टिंब सुद्धा पोचले बघा माझ्या पर्यंत.  त्या टिंबांचेच रहस्य उलगडे पर्यत जिवाची घालमेल सुरूच राहणार.  टिंबांमधेही किती खोल अर्थ भरलेला असतो नाही, कवीला तो दिसतो बरोबर.

यामिनी दळवी या मालाड च्या कवयित्रीच्या भिंतीवर:

तुझ्या मिठीतली उब कैवल्याच्या गावी नेते...
तुझे चांदण आभाळ माझ्या धरणीला भेटे..!!
~ यामिनी

क्या बात है.  आणि अशी बात जेव्हा एक मुलगी लिहिते तेव्हा आपल्यालाच फुलून आल्यासारखे वाटते बुवा.  सिनेमात हे चांदणं पाहून पाहून थकलोय बुवा आता,  आपल्याही नशीबात असे चांदणे कधी येणार आहे, लवकर येऊ दे रे बाबा.

एकीकडे स्वाती शुक्ल यांच्या भिंतीवर

तुझे श्वास रेंगाळले रोमरोमी
मिठी सैल झाली तरी धुंद होते
~ स्वाती

सतीश दराडे यांनी मिठीतली वेगळी बाजू दाखवली आहे

एक उपरी मिठी मारल्यासारखे
दु:खही भेटते पाहुण्यासारखे...
~ सतीश

ममता सिंधूताई त्यांच्या हळव्या स्टाईल मधे

झुलावे असे जर कधी वाटले..
मिठी दे तुझी त्या झुल्यावर नको.!
~ ममता

प्रशांत वैद्य मिठी चे वैशिष्ठ्य सांगतात

अशी असावी मिठी तुझी की
मी व्हावे तू...! तू...माझ्यामय...!
~ प्रशांत

वा वा असे सगळे वाचून मी अगदी मिठीमय होऊन गेलोय आता.  माझ्या स्वप्नातली परी माझ्या मिठीत केव्हा येणार हे अजूनच छळायला लागलेय.  यालाच विरह म्हणतात का?  प्रेम कबूल करायच्या ही आधी विरह होऊ शकतो का?  काय का असेना आत्ता असे वाटतेय की एक मिठी पाहिजे बुवा सर्व काही विसरायला लावणारी.

चल गं मला १४ तारखेसाठी खूप तयारी करायची आहे.  रोहिणी ने अजून नक्की भेटण्याची तयारी दाखवलेली नाही पण जुजबी हो म्हणालीये तिला कसे पटवायचे की भेटणे खूप महत्वाचे आहे त्याची तयारी.  आणि ती १४ ला भेटेल; त्या दिवशी काय काय बोलायचे त्याची तयारी.  केवढे टेंशन आलेय काय सांगू तुला.  या अश्या गोश्र्टींसाथी कुठे गाईड किंवा २१ अपेक्षित सुद्धा मिळत नाही नाहीतर मी ते आधी घेतले असते. 

बरे हो ते माझे प्रामिस म्हणजे अगदीच पक्के प्रामिस आहे बरं. रोज तुला एक पत्र नक्की म्हणजे नक्की ठरले हं. 

मराठी कविता समुहावर 'सखे कसे सांग तुला' अशी ओळ सुचवली आहे आणि ती माझ्या मनात काल पासून पिंगा घालतेय. 

सखे कसे सांग तुला
(अष्टाक्षरी - पादाकुलक छंद)

सखे कसे सांग तुला
मनातले सांगायचे
हदयाला तुझ्या, तुझ्या
पासूनच मागायचे

ठरवून कितीतरी
शब्द पाठवले मागे
तुझ्या समोर येताच
चित्त वेड्या परी वागे
हरवती पुन्हा पुन्हा
शब्द कसे आणायचे

ठरवले आहे उद्या
सांगायचे, होवो काही
विरहात जळायचे
आता झुरायचे नाही
तुझ्या वर सारे जग
ओवाळून टाकायचे

(कटीबद्ध)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१२ फेब्रुवारी २०१५, २०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment