Thursday, March 20, 2014

पान ६५. जिवंत आहे

प्रिय नैना,

मी अजुनही जिवंत आहे.  माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे दिसते आहे.  खूप दिवसात तुला काहीच लिहिता आले नाही आणि कारणच तसे होते गं.  थोडक्यात हे की आमच्या घरावर फार मोठे संकट आले होते ज्याने इतके महिने घेतले सगळे पहिल्यासारखे व्हायला. खरे म्हणजे आता सगळे पहिल्यासारखे कधीच होऊ शकणार नाही. हे संकट जे काही बदल शरीरात आणि मनात करून गेलेय ना ते आता कायमचे व्रण म्हणून राहणार माझ्याबरोबर.

रात्री झोपेत असताना आमच्या घरात घर फोडी झाली आणि ते दरोडेखोर राक्षसासारखे थैमान घालून गेले त्या दिवशी.  त्यांना जे किमती सामान हवे होते तेच फक्त न नेता त्यांनी माझ्यावर आईवर आणि बाबांवर हल्ला देखील केला.  ज्या सबलीने त्यांनी दरवाजा फोडला त्याच सबलीचे अनेक वार त्यांनी माझ्या आईच्या आणि बाबांच्या डोक्यात केले आणि आम्हाला रक्ताच्या थारोळ्यात ठेवून पसार झाले.  आम्ही जगलो कसे आणि काय हे एका बैठकीत सांगणे जमणार नाही गं. 

अश्या संकटाच्या वेळी आपले कोण आणि परके कोण ते नेमके कळते बघ.  अमित ने जी मैत्री निभावली आहे ना या वेळेत त्याला तोड नाही. अमित गं, तुला सांगितले होते ना रोहिणीच्या क्लास च्या सरांच्या मुलाशी मैत्री झाल्याचे, तोच हा अमित केमकर.  हा नसता तर आमचे काय झाले असते कुणास ठाऊक.  आणि हो प्रत्येक गोष्ट काही तरी चांगले पण देऊन जाते असे म्हणतात ना तसेच हास्पिटल मधे रोहिणी पण आली होती मला भेटायला.  खूप खूप सांगायचे आहे तुला पण आता आज अजून लिहिवत नाहीये.  ह्ळू हळू सगळे सांगेनच.

आता आम्ही जरा छंद प्रकाराकडून जाति प्रकाराकडे आमचा मोर्चा वळवला आहे बरका! फक्त अक्षरे न मोजता आता मात्रा मोजत रचना करायच प्रयत्न करणार आहे.

धन
(जाति: हरिभगिनी)

नकळत कोणी, असे अचानक, अती जवळचे, का वाटे
ओढ मनातुन, फुलते आणिक, हृदयी काहुर, का दाटे

जगणे सगळे, बदलुन जाई, जन्मच अवघा, बावरतो
मन आकाशी, विरती सगळे, एकच चेहरा, तो उरतो

थांबुन जाई, शोध मनाचा, धन हे जेव्हा, सापडते
विचार अपुला, मनी कुणाच्या, बागडतो जेव्हा कळते

~ रोहित

जाति: हरिभगिनी
[ प | प | प | - - +]
(छंदोरचना: ३६८) या जाति मधे बालकवींची गोड कविता आहे 'श्रावण मासी, हर्ष मानसी' आठ आठ मात्रांचे तीन गट आणि शेवटी सहा मात्रांचा एक गट अशी एक ओळ असते, आणि शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ असते.  याच जाति मधे उपदेशपर रचना केली तर तिला 'फटका' म्हणतात उदाहरणारर्थः 'पूर्वज ऐसे, पूर्वज तैसे, मिजाज केवळ, मिरवु नका'

(अजुनही जिवंत)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२० मार्च २०१४, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment