Sunday, September 15, 2013

पान. २१ खुळ्यावानी


प्रिय नैना,

एखादा छंद मनात भीनला की साधे बोलणे सुद्धा छंदात लिहिता येउ लागते याचा प्रत्यय येतो आहे आता.  अष्टाक्षरी, म्हणजेच माधवरावांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास पादाकुलक छंद असाच मनात भीनत चाललाय माझ्या.  म्हणूनच का असेना पण अष्टाक्षरी लिहिली की मन भरत नाही.  असं वाटतं काही तरी राहूनच गेलं.  नवे काहीतरी हवे.   मग असे म्हणूनच आज सहा अक्षरांनी एक कविता सुरू केली, पण ती खट्याळ पणे आपलेच खरे करून गेली आणि अशी शब्दात उतरली बघ:

मानेवर गोदणं
तिचं रूप देखणं
तिला बनवले त्याने
आता काय मागणं

आवडूच लागली
मनामधे साचली
तिला पाहताच वाटू
लागली ती आपली

तिच वेडं लागलं
मन पार गुंतलं
खुळ्यावानी वागे आता
होतं आधी चांगलं

हो.  आता तिच्या शिवाय अजून काय शब्दात उतरणार आहे म्हणा.  पण तिचा उल्लेख आल्याबरोबर शब्द पण कसे टवकारून बघतात माझ्याकडे. चल आता सकाळी लिहिलेली अष्टाक्षरी पण दाखवूनच टाकतो तुला:

विचारांच्या पायऱ्यांनी
हळूच मनात आली
मनाला चहूबाजुंनी
आत पोखरू लागली

हिचे काय करू आता
परतून जात नाही
एका कामावर चित्त
माझे ठरू देत नाही

आता तूच धाव बाई
धाव बाई तूच आता
हाकलून लाव माझ्या
मनाची अनिश्चितता

एकदा हसून बघ
माझ्या मनातले राणी
सोनाक्षरांनी लिहेन
आपली गोड कहाणी


खुळ्यावानी,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२७ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान २०. प्रार्थना


प्रिय नैना,

अक्षरांची समान संख्या असलेले छंद खरेच सोपे आहेत.  वैकुंठ छंद म्हणून माधवरावांनी जो छंद सांगितला आहे तो ४ + ४ + ३ + ३ अश्या अक्षर संख्येचा  म्हणून वर्णन केलाय.  प्रत्येक अक्षर दीर्घ असल्यासारखे जोर देउन म्हटले तर अष्टाक्षरी प्रमाणेच हा पण छंद मस्त म्हणता येतो, and I am loving it. 

पण मी जे काही लिहितो ना ते मला खूप साधे वाटते. असे वाटते की आपण अलंकारिक लिहू शकत नाहीये.  कधी कधी तर असे वाटते की आपले शब्द इतके खुजे आहेत की ते रोहिणी चे वर्णन आणि मनातल्या भावना धड व्यक्त पण करू शकत नाहीयेत.  कुठेतरी वाचलं की आपल्याला आवडलेल्या कवितांमधे काय आवडलं याचा विचार करावा म्हणजे आपल्या विचारपद्धतीत पण बदल घडतो.  मला कोणकोणत्या कविता आवडतात याचा विचार नक्की करणार आहे मी.

वर सांगितलेल्या वैकुंठ छंदात माझी कविता ऐकणार आहेस ना?

वारा येतो तिचे गूज, सांगतो कानात
तिच्या सौंदर्याचा गंध, भिनतो मनात

दिसू नये कोणालाच, किती मी जपावे
डोळे चुगली करता, हळूच कळावे

तिला आवडेन का मी? वा टते उगाच
अनिश्चीत हुर हुर, दाटते लगेच

तिचा होकार असावा, जगणे फुलावे
माझ्या स्वप्निल झोक्याने, खुशीत झुलावे

तिच्या साठी पहिलीच, 'वैकुंठ' रचना
तिने माझेच बनावे, एकच प्रार्थना

छंदमय,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२६ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान १९. चकोर


प्रिय नैना,

भावना आणि तंत्र माहित असणे सोपे पण कल्पकतेने, उत्कटतेने ते व्यक्त करता येणे फारच कठीण दिसतेय.  आज प्राजक्त देशमुख यांची एक छोटीशी कविता वाचली आणि अंतर्मुख झालो.

कुसुमाग्रजांच्या ते लिहितात:
"कविता एक एक वाचत गेलो
आशिर्वादासम भास होत गेले..
तात्याराव तुमच्या ‘विशाखेला’तेव्हापासुन चरण म्हणायला लागलो ॥" - प्राजक्त देशमुख

काय सुंदर कल्पना आणि त्याच्याच अनुषंगाने काय उत्कट भावना आहे.  या उंचीवर पोहोचायला किती जन्म घ्यावे लागतील कोण जाणे.  मला इतकेच समाधान आहे की कवितेच्या प्रवासात खूप मोठे मोठे यात्री होउन गेले आणि समोर दिसताहेत त्या वाटांवर मला चालायची संधी मिळतेय.  या प्रवासात किती उंची गाठता येइल हे काळच सांगेल पण या प्रवासातले टप्पे गाठण्यातही आनंद आहे हे अनुभवतो आहे. 

तुझ्या जाणिवेचा चंद्र
स्मरणात डोकावतो
माझ्या जिवाचा समुद्र
तुझ्याकडे झेपावतो

तुझ्या रूपाचा प्रभाव
नसानसात वाहतो
आरशातला रोहित
मला बघून लाजतो

कसे मनात येण्याने
कोणी आपलेसे होते
आता मनातले तिला
सांगायाचे गं कसे ते

मनामधेच ठेवणे
आता वाटते ना बरे
मुग्ध चकोर मनाचा
रोज एकटाच झुरे

झुरणारा,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२६ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

पान १८. रातराणी


प्रिय नैना,

फेसबुकवर एका समुहात मला पद्य लिहिणाऱ्यांची, वृत्त शिकणाऱ्यांची केलेली थट्टा दिसली.  खरच सांगतो मला राग आला.  मग विचार केला की ज्याला गाता येत नाही त्याला काय वाट्टेल ते गायची मुभा असते कारण काय चुकतेय हे समजण्याचा प्रश्नच नसतो.  काय वाट्टेल ते गाणे सोपे पण असते कारण त्याला वेळ द्यावा लागत नाही आणि रियाज पण लागत नाही.  पण एकदा गाणे शिकायला लागलो की दोन गोष्टी होतात, जे गाणे गातात त्यांच्या गाण्याचा अधिक खोल आस्वाद घेता येतो आणि स्वतः पण सुरात गाता येते.  आता माझ्या जवळ दोन पर्याय आहेत. एक म्हणजे हे पद्य, वृत्त सब झूट आहेत समजून त्यांच्याकडे कानाडोळा करणे आणि दोन म्हणजे मराठी कवितेला लाभलेल्या अनेक जेष्ठ कवींसारखे त्यांचा अभ्यास करून कवितांचा आस्वाद घेणे.  पहिला मार्ग फार सोपा आहे, दुसरा मार्ग कठीण आणि वेळखाऊ.  पण दुसऱ्या मार्गावर मला कवितेतली माणिक हिरे वेचण्याचे चक्षू प्रप्त होणार आहेत.  स्वतः फार चांगले लिहिता जरी नाही आले तरही छंदबद्ध, वृत्तबद्ध, तालबद्ध लिहिणाऱ्यांच्या कवितांचा आस्वाद मला अधिक खोलवर घेता येईल.  नैना, मी दुसरा मार्ग निवडायचे ठरविले आहे.

रास आनंदाची मोठी
राजस रत्नांच्या खाणी
रोहिणी सौंदर्य रवी
रोहिणीच रातराणी

रंगलो रंगात पार
रम्य रूप रेखाकृती
ठरले आयुष्य राधा
भावना गाती आरती

केस रेशमी बांधुन
स्वप्न रथात रिंगण
झाली सरस पारध
चित्त बिचारे हरीण

घेते प्रित रोहीणीची
अणू रेणूत आकार
अद्भुत त्याची रचना
दिव्य तो रचनाकार

('र' ची आवर्तने करण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते कवी सारंग भणगे यांना माझा सलाम.  मराठी कविता समुहावर शब्दालंकाराच्या चाहत्यांपैकी ते एक आहेत).  'पादाकुलक छंग' रक्तात भिनतोय आणि मनाला सुखावतोय गं. 

रंगरंगलेला,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ फेब्रुवारी २०१२, २१:३०
+९१-९८२२२-२०३६५

पान १७. पहिला पाउस


प्रिय नैना,

पावलो कोहेलो च्या 'द अर्केमिडिज' मधे वाचले होते की तुम्ही कशाची तरी उत्कटतेने कामना करायला लागता तेव्हा सारे जग तुम्हाला ते मिळावे यासाठी कट रचायला लागते, तसाच प्रत्यय आज आला.  मी ठरवत होतो की कविता अधिक छान कशी होइल हे शिकायचे.  भावनांसोबत कल्पना आणि तंत्र पण आत्मसात करायचे आणि आज माझ्या हातात डॉ. माधवराव पटवर्धन 'माधवज्युलियन' यांचं 'पद्यप्रकाश' पुस्तक पडलं.  कुणाकुणाला सांगू आणि किती किती नाचू असं झालं बघं.  एक कळलं ते पुस्तक चाळून की छंद म्हणजे 'अक्षरवृत्त' ज्या कवितेत प्रत्येक चरणात येणाऱ्या अक्षरांची संख्या सारखी असते, किंवा आलटून पालटून सारखी असते.  म्हणजे कविता लिहिताना प्रत्येक ओळीतली अक्षरे सारखी असली की त्याला छंद किंवा अक्षरवृत्त म्हणायचे.  अश्या कवितांना म्हणायची पण एक पद्धत असते जसे बहिणाबाईच्या ओव्या, प्रत्येक अक्षरावर जोर देउन म्हटल्या जातात.  त्यातल्या त्यात जो छंद ठेका घ्यायला सोपा पडतो तो म्हणजे 'पादाकुलक छंद' म्हणजेच ज्याला 'अष्टाक्षरी' पण म्हटले जाते.

तिला पाहुनिया किती
वेगे धडधडे जीव
दूर पळूनिया जाते
काळावेळाची जाणीव

तिचा छंद मनातून
काही केल्या जाईच ना
तिला पाहिल्या वाचून
मन वेडे राहीच ना

तिचे नाव लिहूनिया
किती वह्या संपविल्या
तिच्या हसण्याच्या छटा
लिहिताना आठवल्या

तिची आवड मनाला
वेड जगण्याचे देई
तिला आठवून माझे
जगणे सुंगंधी होई

नकळत तिचा झालो
तिच्या पाशीच थांबलो
तिचा विचार करता
कविता लिहू लागलो

(काव्यदेवतेला नमन करून माझी ही पहिली वहिली पद्य कविता)

माधवज्युलियन यांनी पद्याची एक छान व्याख्या दिलीय, ती अशी की जे पदांमधे तोडलेले असते, जे सम ठेक्याने आवर्तनातून व्यक्त होते ते पद्य.  या व्याख्येप्रमाणे माझी ही कविता नक्कीच पद्य कविता झाली ना गं.  हो म्हण.

आनंदित,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ फेब्रुवारी २०१२, ००:५१
+९१-९८२२२-२०३६५

पान १६. सुंदर


प्रिय नैना,

भुर्भुर्णारे केस..
अन निर्मळ हसताना
काय सुंदर दिसली रोहिणी
तू खूप सुंदर दिसतेस गं,
म्हणावे ...वाटले त्या क्षणी.
शब्द ओठतच राहीले...
काही ओळख नसताना
कसे एकदम म्हणायचे
तिला काय वाटेल
हे आपणहून कसे कळायचे?
तिला डोळ्यातले कौतुक
दिसत असेल का?
ते तिचे हसणे
तो डोळ्यातला नेम
माझ्यासाठीच असेल का?
हो.. हो..
कुणीतरी हृदयात मोठ्याने ओरडतय
मला गालातल्या गालात
हसायला येतय

- तुझा, रोहित

(तुष्की, नागपूर)

पान १५. जय विरू


प्रिय नैना,

मला जय व्हायला आवडेल गं
पण मला बसंती पण हवी
कदाचित मला लिहावी लागेल
संपूर्ण कहाणीच नवी
ही दिवास्वप्ने किती वेळ खातात
पण हीच तर मनाला
हवासा दिलासा देतात
तुला सांगू मी माझ्याच स्वप्नात
कित्तीदा नायक होतो
पण...
स्वप्नच ते.. .. संपते
मी पुन्हा धरेवर येतो
नेहमी वाटते हे स्वप्न संपू नये
सत्य व्हावे
एकदातरी मला हवे
अगदी तस्सेच घडावे
मी नशिबावर खट्टू आहे
पण निराश नाही
उद्याच्या गर्भात असणार
नक्कीच दिव्य काही

- तुझा, रोहित

(तुष्की, नागपूर)

पान १४. उचकी


प्रिय नैना,

माझा कवितांचा अभ्यास आज पासून खऱ्या अर्थाने सुरू झाला गं बाई.  अभ्यास कसा करणार?  सध्या तरी इंटरनेट वरूनच जे जे मिळेल ते निट मांडत जाणे आणि कवितांवर जी जी माहिती मिळेल ती ती नोंद करून ठेवणे. कदाचित त्यामुळे सर्व माहिती एका जागी तरी मिळेल.  तुला एक तुफान शोध सांगू, आज प्रसाद शिरगावकर यांची स्वतःची कवितांची मराठी साईट सापडली.  काय कविता आहेत यार, आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र साईट आहे "www.sadha-sopa.com", योजना बद्ध.  त्यांची एक हसवणारी कविता इथे लिहिण्याचा मोह आवरताच येत नाहीये म्हनून लिहितोय.

सगळ्या प्रेमकथांची अखेर - प्रसाद शिरगावकर

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!

(हे असलं तरी आपण काय करुया)

असंच जरी होत असलं
असं आता होणार नाही
तुझ्या माझ्या कथेला राणी
शेवट अता असणार नाही

तुझ्या माझ्या श्वासांमधे
रोज मोगरा गंध भरेल
मावळणाऱ्या दिवसासोबत
हृदयामध्ये चंद्र उरेल

रोजचा सूर्य आपल्यासाठी
नवी कथा घेऊन येईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल

(- प्रसाद शिरगांवकर, 'मटारा'ची प्रेरणाः दै. सकाळ मधील ब्रिटिश नंदी यांचा एक जुना लेख )

काय लिहितो हा माणूस, मन प्रसन्न होते आणि प्रचंड उर्जा मिळते काहीतरी लिहायला.  कधी तरी आपली पण एक अशीच साईट असावी हे स्वप्न प्रसाद यांनी माझ्या मनात आजच रूजवले आहे.  पण अशी साईट असली आणि तिथे वाचायला लोक कसे येतील?  फेसबुकवर च्या मराठी कविता समुहात सर्व लोक आधीच जमलेत म्हणून तिथे कविता टाकल्या तर काही लोक तर वाचतील असे वाटते, :) सध्या फेसबुकच बरे नाही का?

आता आमच्या मनातली बात.  आमच्या मोडक्या तोडक्या काव्यप्रकारात तुला ऐकवली नाही तर झोप कशी येणार?    मला एक सांग:

अनोळखी माणसाची
उचकी लागत नसते ना गं
नसावी, नाहितर
तिचे जगणे कठीण झाले असते ना गं
काय येडा झालोय मी आता
आयुष्यात समस्यांची
होती का काही कमतरता
ही आणिक एक नवी ओढ
घेउन बसलोय
फसलोय, नाही नाही
नाका तोंडात पाणी जाऊन बुडलोय
पण ही समस्या गोड आहे
जसा तळहातावरचा फोड आहे
ठसठसतोय पण वेड लावतोय
जगणं किती सुंदर आहे हे दावतोय
एक नोबडी, एका मुलीच्या
नुसत्या विचाराने जिवंत राहू शकतो
मनातल्या मनातच स्वतःला
प्रेमात पडलेलं पाहू शकतो
तो आता नोबडी नाही
तो तर राजा आहे
आपल्याच रियासतेचा
बेताज बादशा आहे
बादशा सलामत अब सोएंगे
रोहिणी के सपनो में खोएंगे

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

पान १३. परवानगी


प्रिय नैना,
प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडली ना की खूप उर्जा मिळते.  मराठी कविता समुहावर चार दोन अभिप्राय मिळाले तरीही कॉलर टाईट होतेच माझी.  मला कळते की मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या साध्या लिखाणाला पण काही जेष्ठ छान म्हणत असतील पण तरीही आवडते गं.  शाबासकीची थाप ही हवीच, त्यामुळे लिहायचा उत्साह मिळतो.  सध्या एका गंभीर प्रश्नाने वेडे केलेय मला.  बघ ना:

कशाचा विचार करावा
हे कधीच कुणाला विचारले नाही
तिथे माझीच सत्ता होती
अडथळा नाही कशाचाही
पण रोहिणीचा विचार येताच
का वाटते गुन्हा करतोय
ती एक प्रत्यक्षातली व्यक्ती आहे
तिला न कळताच तिच्यावर मरतोय
इतका कधीच कुणाचा विचार केला नाही
हा काय प्रकार आहे?
टाळतो म्हटले तरी टळत नाही
दिवास्वप्नांचा मी
चँपियन सध्या झालोय
सकाळ संध्याकाळ तिचाच विचार
डोळे उघडे असो वा बंद
डोळ्यांसमोर एकच आकार
का ती अनोळखी आहे?
का ती नाहिये जवळ
नागपूर शहर आहेच केव्हढे
एक संधी हवी केवळ
काश तिच्याशी ओळख असती
सांगितले असते मनात घुसलीयेस
माझी परवानगीही न घेता
माझ्या हृदयात जाऊन बसलीयेस

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५

पान १२. राजा


प्रिय नैना,
कविता ही एक नशा आहे गं.  समुहावर पण पाहतो ना लोक वेडे आहेत कवितेच्या पायी.  कविता लिहितातच कवितांवर अभिप्राय सुचना पण लिहितात.  त्यामुळे खूप शिकायला मिळते.  कवितेचे किती प्रकार आहेत हे अनेक कवितांकडे पाहून शिकायला मिळतेय मला.  खूप लोक गझल लिहितात तिथे, ती मात्र फार कळत नाही.  कळेल हळू हळू, आता कुठे माझी तुकडी सुरू आहे ना.  एक गम्मत सांगू?

ही माझी खोली
ही माझी रियासत आहे
मी इथला राजा
तिच्या आठवणी माझी दौलत आहे
पण या राजाला
पोट भरायला दुनियेत शिरावे लागते
रियासतेतून बाहेर पडून
झिजावे लागते
तिथे मी शून्य आहे
एक दुर्लक्षित नोबडी
म्हणून मला ईथे
रियासतेतच राहायची गोडी
ही रात्र, या कविता
आणि तिच्या आठवणी
रोज वाटते आयुष्य थांबावे
या ईथे याच क्षणी
त्या आठवणींना आता एक चेहरा आहे
एक नाव मिळालेय 'रोहिणी'
कुणाला ईतकं आठवणं
हा गुन्हा असतो का गं?
माझ्या समोर सतत
तिचाच चेहरा का यावा गं?

- तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
+९१-९८२२२-२०३६५