प्रिय नैना,
ते संत वॅलेंटाईन का कोण होऊन गेले ते हा सध्याचा चालू आठवडा म्हणजे अनेक जणांना स्वप्नपूर्तीची पर्वणी आणि अनेकांना जिवाला घोर देऊन गेलेत. मागच्या वर्षी जे स्वप्न पाहिले होते ते या वर्षी रहस्य होऊन समोर उभे राहील याची कल्पना नव्हती. आता एक एक दिवस जगताना प्रत्येक दिवसाचा उत्सव होतोय आणि त्यातही रोज काहीतरी वेगळे करून आमच्या मनातली परी सुद्धा छळ छळ छळतेय तुला काय सांगू.
पण त्याही आधी, इथे या वॅलेंटाईन आठवड्याच्या दिवसांचे वैशिष्ठ्य क्रमवार लिहून ठेवतो कसे (इंटरनेट चा गुगलदेव चिरायू होवो)
७ फेब्रुवारी २०१५ - गुलाब दिवस - आम्ही आपले व्हाटसॅप वरच गुलाब पाठवले, त्याला स्माईली उत्तर आले होते
८ फेब्रुवारी २०१५ - प्रपोज दिवस - हे यावर्षी नाही बरं, म्हणून आम्ही या दिवशी गप्प होतो
९ फेब्रुवारी २०१५ - चॉकलेट दिवस - या आजच्या दिवसाबद्दल खाली खूप खूप लिहायचे आहे तेव्हा या यादीत नको
१० फेब्रुवारी २०१५ - टेडी दिवस - या दिवशी काय होत बघुया
११ फेब्रुवारी २०१५ - प्रामिस दिवस - या ही दिवशी काय होते बघुया
१२ फेब्रुवारी २०१५ - मिठी दिवस - (हे सध्या स्वप्नातच)
१३ फेब्रुवारी २०१५ - किस दिवस - (हे पण सध्या स्वप्नातच)
१४ फेब्रुवारी २०१५ - वॅलेंटाईन दिवस - क्लाईमॅक्स चा दिवस गं आमचा या वर्षी
हा पूर्ण आठवडा म्हणजे रोज काही ना काही छळ करायचा चंग बांधून येतोय माहिताय. आज सकाळी उठत नाही तर रोहिणी च्या फेसबुक प्रोफाईल चित्र पाहून श्वास थांबला. अजूनही मी दीर्घ श्वासच घेतोय बघ. काय ठरवून ती रोज काही ना काही सूचक पोस्ट करते आहे म्हणून सांगू तुला. आजचा फोटो म्हणजे कहर कहर अगदी. म्हणजे 'ओम शांती ओम' मधे जसा 'शांती' ला पाहून तो 'ओम' शुद्ध हरवून पडतो तसाच मी पडतोय असा मला भास झालेला. या एका फोटो साठी मी आयुष्य कुर्बान करायला तयार आहे. आपण नेहमीच जिला बघतो तिच्यात असे अजून किती किती वार शिल्लक आहेत कोण जाणे, पण सध्या या वॅलेंटाईन आठवड्यात रोज घायाळ व्हायची तरतूद करण्यात येतेय तिकडून.
कविता समुहावर 'निरज कुलकर्णी' यांनी लिहिलेली एक खास कविता आवर्जून आणि सतत सतत आठवत राहीली आज. ऑरकुट बंद झाल्यामुळे कुठेच सापडत नव्हती मला एका साईट वर या काही ओळी सापडल्या आहेत. काही गोष्टी सर्व काही अर्पण कराव्या इतक्या महान असतात, त्यातलीच ही एक कविता आहे आणि तिचा आजचा फोटो पण त्यातलाच आहे आज.
फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे, अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे, अशी गोड तू...
सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...
अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...
ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्याशी झुरावे, अशी गोड तू...
जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू
जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...
तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...
यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...
असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...
कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...
शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...
सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...
तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...
कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...
मला स्पर्श साधा, तुझा भासतो, ’अमृता’च्यासवे;
’तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?’ अशी गोड तू...
कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू..
~ निरज कुलकर्णी
(मंत्रमुग्ध)
रोहित
(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०९ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com
No comments:
Post a Comment