Thursday, October 24, 2013

पान ६४. किनारा


प्रिय नैना,

ज्या पत्राचे उत्तर काय येईल याची धाकधूक होती त्याचे उत्तर आले.  तिने काही प्रश्न उभे केले आहेत पण महत्वाचे हे की तिने नाही असे ठाम म्हटलेले नाही.  तिला मी आवडत नाही असेही तिने म्हटलेले नाही.  मी दिसायला तिला छान वाटतो असेही तिने म्हटले आहे. 

तिच्या एका प्रश्नामुळे मी अंतर्मुख झालो तो म्हणजे पाच मिनिटाच्या सकाळच्या पाहण्यावर तीचे मला आवडणे आधारित आहे असे तिचे म्हणणे.  मला एक मान्य आहे की मला सखी हवी आहे, पण मला दिवसातून दिसणाऱ्या मुली शंभर एक असतील.  त्यातून समोर सकाळी क्लास ला येणाऱ्याच पन्नास एक असतील.  त्यातून मला फक्त हिला पाहूनच का वेगळे वाटते याचे उत्तर खरेच माझ्याजवळ नाही ग नैना, तिला काय उत्तर देऊ?

त्या निर्मात्याने अंतर्मनात काय धागे विणून ठेवले आहेत कोण जाणे की समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींमधे माणसाला एखादीच आवडते, एखादीच अतिशय आवडते आणि ही आपल्यासाठीच जगात आली आहे असेही वाटते.  मग हे आवडणे दुकानातील ड्रेस आवडण्यासारखेच नाही का? असेलही पण त्यात वाईट ते काय असे मी म्हणतो.  तसे आवडणे असले तरीही आम्ही माणसे आहोत म्हणून त्या आवडण्याचे रूपांतर ओळखीत आणि मग प्रीतीत करायची निवड आपण करू शकतो ना.

मला तिला दुखवायचे पण नाही आणि तिला हवी तशी मैत्री पण करायची आहे, त्यामुळे फारच काळजीपूर्वक तिच्या पत्राला उत्तर द्यावे लागणार आहे.  ए पण तिच्या पत्रातून कळले की ती देवभक्त आहे म्हणजे आमच्या गणपती बाप्पा प्रेमाबरोबर तिची ही सवय पण जुळली म्हणायचे.  आता केव्हा तरी तिच्या बरोबर टेकडीच्या गणपतीला जायचे स्वप्न पाहायला मी मोकळा आहे.

खरे म्हणजे आयुष्य एखाद्या नौके प्रमाणे असते.  समोर जमीन दिसली की किनाला लागला असे वाटते आणि माणूस तिथे थांबतो, थांबल्यावर त्याला कधी कधी कळते की अरे हे तर बेट आहे हा आपला किनारा नाही मग पुन्हा त्याचा बोटीत प्रवास सुरू होतो, त्याचा किनारा शोधण्यासाठी.  समोर दिसेल त्या किनाऱ्यापाशी थांबले नाही तर त्याला तो त्याचा किनारा आहे की नाही हे कळणार कसे, त्यामुळे त्याला नव नव्या किनाऱ्यांवर थांबावेच लागणार ना.  त्याचा स्वतःचा किनारा मिळाला की मग त्याचा प्रवास संपणार.  कदाचित मैत्री करणे हे रोहिणीच्या पद्धतीने ती किनारा शोधते आहे असेच असेल नाही का.  मी तरी वेगळे काय करतोय, ज्याला मी ओळख करणे म्हणतोय तेच तिला मैत्री करून विचारांची देवाण घेवाण करून मग ठरवायचे आहे.  चला माझ्या आयुष्याची नौका एका किनाऱ्यावर तर पोचली आहेच, आता हा माझाच किनारा आहे का हे बघुया.

असो.

प्रशांत असनारे यांचा 'मीच माझा मोर' हा कवितासंग्रह मिळाला काल वाचायला आणि समजले की मुक्त कवितेमध्ये काय ताकत असते ते.  एक एक कविता वाचून मी अचंभित होत होतो.

किनारा
(मुक्त)

किनारा दिसतोय
आपलाच आहे
की वेगळेच बेट आहे
हे इथून कळणार नाही.

किनाऱ्याला बोट लावावीच लागेल
नंतर कळेल की
आयुष्याचा शोध संपला
की हे अजून एक विश्रांतीस्थळ झाले
प्रवास संपलेलाच नाही.

त्या विधात्याने
आयुष्याच्या सागरात आम्हाला
सोडून दिले आहे
आणि किनारा शोधण्याची ओढ टाकली हृदयात
आता गम्मत बघत असेल
कोण कधी किनाऱ्याला लागतोय याची

~ रोहित

(आशावादी)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२५ ऑक्टोबर २०१३, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment